सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणी संग्रहालयातील ‘समृद्धी’ वाघिणीची प्रकृती खालावली

By मुजीब देवणीकर | Published: April 11, 2024 06:32 PM2024-04-11T18:32:48+5:302024-04-11T18:33:38+5:30

रक्ताच्या अहवालानुसार प्राणी संग्रहालय पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार समृद्धी वाघिणीवर उपचार करण्यात येत आहेत

'Samruddhi' tigress at Siddharth Udyan Zoological Museum has deteriorated | सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणी संग्रहालयातील ‘समृद्धी’ वाघिणीची प्रकृती खालावली

सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणी संग्रहालयातील ‘समृद्धी’ वाघिणीची प्रकृती खालावली

छत्रपती संभाजीनगर : सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणी संग्रहालयातील १४ वर्षांची पिवळी वाघीण समृद्धी आजारी आहे. तिला तातडीने पिंजऱ्यातून प्राणी संग्रहालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. समृद्धीच्या किडनी फंक्शन चाचणीमध्ये क्रिएटिन आणि ब्लड युरियामध्ये वाढ झाल्याने ती अत्यंत कमी अन्न खात आहे. ती कमजोर असून, प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

प्राणी संग्रहालयात सुरुवातीला आणण्यात आलेल्या दीप्ती आणि गुड्डू या वाघांच्या जोडीने २०१० मध्ये समृद्धी वाघिणीला जन्म दिला. त्यानंतर समृद्धी वाघिणीने आतापर्यंत तीनदा दहा बछड्यांना जन्म दिला आहे. गेल्या आठवडाभरापासून समृद्धीचे खाणे कमी झाल्यामुळे ती आजारी पडली. त्यामुळे तिला ४ एप्रिलपासून प्राणी संग्रहालयातील दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आले. समृद्धीच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असता, त्यात किडनी फंक्शन चाचणीमध्ये क्रिएटिन आणि ब्लड युरियामध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.

रक्ताच्या अहवालानुसार प्राणी संग्रहालय पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार समृद्धी वाघिणीवर उपचार करण्यात येत असून, यामध्ये सलाईन व प्रतिजैविक इंजेक्शन देण्यात येत आहेत. समृद्धीच्या देखभालीसाठी काळजीवाहक नेमण्यात आले आहेत. सध्या समृद्धी वाघिणीची तब्येत नाजूक, पण स्थिर असल्याची माहिती मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील यांनी दिली.

Web Title: 'Samruddhi' tigress at Siddharth Udyan Zoological Museum has deteriorated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.