औरंगाबाद विद्यापीठाच्या कुलगुरू दालनात प्रचंड राडा, अभ्यास मंडळाच्या सदस्य नेमणुकीवरून दोन गट भिडले; शिवीगाळसह हामरीतुमरी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2017 09:59 PM2017-12-30T21:59:16+5:302017-12-30T21:59:23+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या दालनात शनिवारी सायंकाळी प्रचंड राडा झाला. अभ्यास मंडळाच्या मध्यरात्री केलेल्या नेमणुकींवरून दोन्ही गट अपसात भिडले.

Ruckus in Aurangabad University over appointment | औरंगाबाद विद्यापीठाच्या कुलगुरू दालनात प्रचंड राडा, अभ्यास मंडळाच्या सदस्य नेमणुकीवरून दोन गट भिडले; शिवीगाळसह हामरीतुमरी

औरंगाबाद विद्यापीठाच्या कुलगुरू दालनात प्रचंड राडा, अभ्यास मंडळाच्या सदस्य नेमणुकीवरून दोन गट भिडले; शिवीगाळसह हामरीतुमरी

googlenewsNext

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या दालनात शनिवारी सायंकाळी प्रचंड राडा झाला. अभ्यास मंडळाच्या मध्यरात्री केलेल्या नेमणुकींवरून दोन्ही गट अपसात भिडले. एकमेकांच्या अंगावर धावून जाणे, शिवीगाळ, आरडाओरडीने हे कुलगुरू दालन आहे की, राजकीय अड्डा, असा प्रश्न उपस्थित झाला होता. मागील काही महिन्यांपासून कुलगुरू दालनात गोंधळाचे प्रकार नित्याचेच झाले आहेत.

विद्यापीठाच्या अधिसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. यानंतर अभ्यास मंडळाच्या निवडणुका काही दिवसात जाहीर करण्यात येणार आहेत. या अभ्यास मंडळांवर एकूण ९ पैकी ६ जणांच्या नेमणुका होतात. तर उर्वरित ३ जण निवडणुकीच्या माध्यमातून निवडले जातात. एकू ण ३१ अभ्यास मंडळांवर प्रत्येकी सहा सदस्यांच्या नेमणुका प्राध्यापकांची शैक्षणिक पात्रता न पाहताच केल्या असल्याचा आक्षेप घेत उत्कर्ष पॅनलच्या नवनिर्वाचित अधिसभा सदस्यांनी घेतला होता. तसेच चुकीच्या पद्धतीने होणाºया नेमणुका थांबविण्यासाठी सर्व सदस्य कुलगुरू दालनात दुपारपासून कुलगुरूंची वाट पाहत होते. कुलगुरू साडेतीन वाजेदरम्यान दालनात आले. तेव्हा उत्कर्ष पॅनलचे प्रतिनिधी आतमध्ये होते. कुलगुरूंशी त्यांचा संवाद सुरू असतानाच विद्यापीठ विकास मंचच्या पदाधिकाºयांनी या लोकांना किती वेळ देणार? असा सवाल उपस्थित केला. यावरून दोन्ही गटाच्या सदस्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री उडाली. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यासह शिवीगाळ करण्यापर्यंत दोन्ही गटाच्या सदस्यांची मजल गेली. हा सर्व प्रकार कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे हताशपणे पाहत होते. हातघाईवरची परिस्थिती मारामारीवर येण्याची शक्यता असतानाच सुरक्षारक्षकांनी हस्तक्षेप केल्यामुळे अनर्थ टळला. हा सर्व प्रकार पाहून गोंधळ घालणारे हे प्राध्यापक असू शकतात? असा सवाल उपस्थित झाला आहे.

आधी त्यांनी करून घेतले आता दुस-या गटाने
विद्यापीठाच्या कुलसचिव डॉ. साधना पांडे म्हणाल्या, चार अधिसभा सदस्यांची नेमणूक करून घेतली. तेव्हा उत्कर्ष गटाने नियमांची मागणी केली नाही. मात्र आता नियमांची, बायोडाटा मागवून नेमणुका करण्याची मागणी करीत आहेत. एका वेळी दुसरी आणि आता वेगळीच भूमिका घेतात. या दोन्ही नेमणुकांमध्ये कुलगुरूंना अधिकार आहेत. विद्यापीठ कायद्याचा कोठेही भंग केलेला नाही. ज्यांना आक्षेप आहेत त्यांनी राज्यपाल, न्यायालयाकडे खुशाल जावे. आम्हाला काहीही देणे-घेणे नसल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.

एकाच कॉलेजच्या अकरा जणांच्या नियुक्त्या
अभ्यास मंडळांवर एकाच महाविद्यालयातील अकरा जणांच्या नेमणुका केल्या आहेत. यातील अनेक जण पात्रसुद्धा नाहीत. राज्यातील इतर सर्व विद्यापीठांनी नेमणुकांसाठी अर्ज मागविले आहेत. याच विद्यापीठात रात्रीच्या अंधारातून सर्वांना मेलवर पत्रे पाठविली जातात. काही लोक गुंडागर्दी करून यादी घेऊन येतात आणि तीच यादी मान्य केली जाते. हे चुकीचे असल्याचे अधिसभा सदस्य डॉ. राजेश करपे यांनी सांगितले.

एका गटाचा आक्षेप तर दुस-याचा विरोध
च्कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी अभ्यास मंडळावर नियुक्त केलेल्या  सदस्यांमध्ये अनेकांनी शैक्षणिक पात्रताच पूर्ण केलेली नाही. एकाच महाविद्यालयातील १० ते ११ जणांना संधी देण्यात आलेली आहे. ही सर्व महाविद्यालये संघ आणि भाजपच्या विचारसरणीची असल्याचा आरोप उत्कर्षच्या सदस्यांनी केला. तर विद्यापीठ विकास मंचने कुलगुरूंच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. सर्व प्रक्रिया नियमानुसारच झाली असल्याचे मंचच्या सदस्यांचे म्हणणे आहे.

हा दुर्दैवी प्रकार 
या सर्व गोंधळाविषयी बोलताना कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी हा दुर्दैवी प्रकार असल्याचे सांगितले. प्राध्यापकांना कसे वागावे याचे भान असले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच अधिसभा आणि अभ्यास मंडळावर केलेल्या नेमणुका अधिष्ठाता, कुलसचिव यांच्याशी चर्चा करूनच केल्या असल्याचेही कुलगुरूंनी स्पष्ट केले.

पोलिसात तक्रार
कुलगुरूंच्या दालनात विद्यापीठाच्या शैक्षणिक धोरणावर नवनिर्वाचित अधिसभा सदस्य चर्चा करत असताना विद्यापीठ विकास मंचच्या पदाधिकाºयांनी आत घुसखोरी करत काही अधिसभा सदस्यांना धमकावले असल्याची तक्रार उत्कर्ष पॅनलतर्फे बेगमपूरा पोलीस ठाण्यात दिली आहे.

आम्हीही गुंडागर्दी करू शकतो
कुलगुरूंच्या दालनात शाळेतील शिक्षक येऊन शिवीगाळ करतो. कुलगुरू दालनाच्या सर्व मर्यादा ओलांडतो. हे निषेधार्ह आहे. जर त्यांना वाटत असेल की कुलगुरूंच्या दालनात येऊन गोंधळ घालून नेमणुका थांबवता येतात. तर आम्हीही ठोशास ठोसा देऊ शकतो. गुंडागर्दी करू शकतो. हे लक्षात ठेवावे, असे विद्यापीठ विकास मंचचे डॉ. शंकर अंभोरे यांनी कुलगुरू दालनात गोंधळानंतर बोलताना स्पष्ट केले.
 

Web Title: Ruckus in Aurangabad University over appointment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.