परभणीचे दारासिंग खुराणा आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकले, इंग्लंडच्या महाराणींनी केला सत्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 07:17 PM2024-04-15T19:17:01+5:302024-04-17T18:05:01+5:30

कोविड १९च्या काळात मित्र, सहकारी अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या दुःखद मृत्यूच्या पार्श्वभूमीवर दारा सिंग खुराणा यांनी ‘Pause.Breathe.Talk’ फाऊंडेशनची स्थापना केली.

parbhanis darasing khurana shine internationally felicitated by queen camilla of england | परभणीचे दारासिंग खुराणा आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकले, इंग्लंडच्या महाराणींनी केला सत्कार

परभणीचे दारासिंग खुराणा आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकले, इंग्लंडच्या महाराणींनी केला सत्कार

छत्रपती संभाजीनगर : मॉडेल, अभिनेता दारा सिंग खुराणा यांची लंडन येथे जागतिक पातळीवरील ‘कॉमनवेल्थ युवा चॅम्पियन २०२४’ साठी निवड करण्यात आली आहे. यावेळी महाराणी कॅमिला, सरचिटणीस बॅरोनेस पॅट्रिशिया (स्कॉटलंड), प्रिन्स चार्ल्स हे उपस्थित होते. या सोहळ्यात ५६ देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. खुराणा यांच्यासह युकेच्या प्रिन्स एडवर्ड यांना देखील हा मान मिळाला आहे. सोहळ्यात बोलताना युवा पिढीच्या मानसिक आरोग्यावर काम करणार असल्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. ते मूळचे परभणी जिल्ह्यातील आहेत.

मानसिक आरोग्यावर काम :
कोविड १९च्या काळात मित्र, सहकारी अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या दुःखद मृत्यूच्या पार्श्वभूमीवर दारा सिंग खुराणा यांनी ‘Pause.Breathe.Talk’ फाऊंडेशनची स्थापना केली. सर्वसामान्यांना परवडणारा खर्च आणि योग्य सुविधा मिळावी, या उद्देशाने ही फाऊंडेशन सुरू केली. संस्थेच्या माध्यमातून युवा पिढीला ताण-तणाव, सोशल मीडियाचे व्यसन, नैराश्य यातून बाहेर काढण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. थेरपी, काऊन्सेलिंग यांच्याद्वारे मानसिक आजारांवर उपचार करण्यात येतात.

डिजिटल डिटॉक्स थेरपी :
मानसिक आरोग्य स्थिर ठेवायचे असेल तर शाळाशाळांत ‘डिजिटल डिटॉक्स थेरपी’ राबवायला हवी, कारण शिक्षण घेताना मुलांनी सोशल मीडियाचा, टीव्हीचा वापर कसा करावा हे त्यांना समजलं पाहिजे. ही लहान मुलेच भावी आयुष्यात देशाचे भवितव्य घडवणार आहेत. बदलासाठी कोणीतरी आवाज उठवायचा आहे, आणि मी ठरवलं की तो जागतिक आवाज मी होईल.

परभणीचा मुलगा थेट लंडनला...
महाराष्ट्राच्या परभणी जिल्ह्यातील दारा सिंग खुराणा यांच्यासाठी इथपर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हता. ज्या मुलाला इंग्रजीत नीट बाेलता येत नव्हते, तो जेव्हा थेट लंडनच्या राणीला भेटतो, तेव्हा ती बाब प्रशंसनीय असते. यामागे स्वकीयांची साथ आणि प्रोत्साहन हेच यशाचे गमक असल्याचे ते सांगतात. संघर्ष, परिश्रम, मेहनत, सचोटीच्या बळावर दारा सिंग खुराणा यांनी त्यांचे नाव कमावले. ते ‘युनिसेफ’चे गुडविल ॲम्बेसेडर आणि ‘DATRI’ या संस्थेचे ब्रँड ॲम्बेसेडर देखील आहेत. लंडनच्या महाराणी कॅमिला यांना भेटण्याची संधी मिळणं ही माझ्यासाठी सुवर्णसंधी होती, असे ते मानतात. ते म्हणतात, माझी ड्रेसिंग स्टाईल, दृष्टीकाेन यांचे महाराणी कॅमिला यांनी कौतुक केले. 

‘कागज २’ मधून हिंदीत डेब्यू :
दारा सिंग खुराणा यांनी २०१७ मध्ये ‘मिस्टर इंडिया इंटरनॅशनल अवॉर्ड’ हा किताब पटकावला. २०२३ मध्ये त्यांनी २०२१ ची मिस युनिव्हर्स हरनाज संधूसोबत पंजाबी चित्रपट ‘बै जी कुतंगे’ मधून काम केले. मल्याळम चित्रपट ‘बांद्रा’ मध्ये त्यांनी काम केले, तसेच ‘कागज २’ चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत डेब्यू केला.

Web Title: parbhanis darasing khurana shine internationally felicitated by queen camilla of england

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.