नव्या अभ्यासक्रमाच्या पेपरला जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका; दीड तास चालला गोंधळ

By राम शिनगारे | Published: April 4, 2024 11:07 AM2024-04-04T11:07:46+5:302024-04-04T11:08:53+5:30

सुधारित प्रश्नपत्रिका पाठवल्यानंतर झाली परीक्षा

old syllabus exam with paper of new syllabus; The chaos lasted for an hour and a half | नव्या अभ्यासक्रमाच्या पेपरला जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका; दीड तास चालला गोंधळ

नव्या अभ्यासक्रमाच्या पेपरला जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका; दीड तास चालला गोंधळ

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयात बी. काॅम. अभ्यासक्रमाच्या द्वितीय सत्राच्या द्वितीय भाषा हिंदी विषयाच्या नवीन अभ्यासक्रमाचा पेपर बुधवारी सकाळी १० वाजता होता. या पेपरला हिंदी द्वितीय भाषा विषयाच्या जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका पाठविण्यात आल्याचा प्रकार घडला. विद्यार्थ्यांनी प्रश्नांची उत्तरे लिहिण्यास सुरूवात केल्यानंतर जुन्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका आल्याचे स्पष्ट झाले. तेव्हा एकच धावपळ सुरू झाली. विविध महाविद्यालयांतून परीक्षा विभागाला कळविण्यात आले. दीड तासांच्या गोंधळानंतर नव्या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका केंद्रांवर पाठविण्यात आली. त्यानंतर पेपर सुरळीतपणे पार पडल्याची माहिती महाविद्यालयातून देण्यात आली.

विद्यापीठाच्या पदवी परीक्षांना मंगळवारपासून सुरूवात झाली. बुधवारी बी. कॉम. प्रथम वर्षाच्या द्वितीय सत्राच्या द्वितीय भाषा हिंदी विषयाचा पॅटर्न-२०२२ या अभ्यासक्रमाचा पेपर सकाळी १० वाजता होता. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने जुन्या अभ्यासक्रमांची म्हणजेच पॅटर्न-२०१८ कोड क्र. २०१६ ही प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रांवर पाठवली. त्याच प्रश्नपत्रिकेवर पॅटर्न-२०२२ असेही लिहिण्यात आले होते. मात्र, परीक्षेला सुरूवात होताच विद्यार्थ्यांना प्रश्नांमध्ये बदल झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ या विषयाच्या प्राध्यापकांना कळवले. त्यानंतर अर्ध्या तासातच परीक्षा विभागाने झालेली चूक मान्य करत काही वेळातच नवीन पॅटर्न-२०२२ या अभ्यासक्रमाचा पेपर पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यानुसार ११:३० वाजता नवीन अभ्यासक्रमाचा पेपर संबंधितांना मिळाला. त्यानंतर ११:३० ते १:३० यावेळेत परीक्षा सुरळीतपणे पार पडली.

पेपर सेटरचा निष्काळजीपणा
विषयाच्या प्रश्नपत्रिका सेट करताना त्यावर ओल्ड, न्यू अभ्यासक्रम असे स्पष्टपणे लिहावे लागते. मात्र, द्वितीय भाषा हिंदी विषयाच्या प्रश्नपत्रिकेवर पॅटर्न-२०१८, पॅटर्न-२०२२ असे लिहिलेले नव्हते. त्यामुळे परीक्षा विभागाकडून प्रश्नपत्रिका पाठवली गेली.

दुरुस्त प्रश्नपत्रिका पाठविण्यात आली
हिंदी विषयाची पॅटर्न-२०१८ व पॅटर्न-२०२२ या दोन्ही अभ्यासक्रमांच्या विषयाचे नाव व अभ्यासक्रम एकच असल्यामुळे सर्व संबंधित परीक्षा केंद्रांना प्रश्नपत्रिका पाठवली होती. मात्र, काही विद्यार्थ्यांनी पॅटर्नचा अभ्यासक्रम वेगळा असल्याचे कळवल्यानंतर संबंधितांना दुरुस्त प्रश्नपत्रिका पाठविण्यात आली. या प्रकरणात झालेल्या विलंबामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी वाढीव वेळ दिला. परीक्षा सुरळीत पार पडली.
- डॉ. भावना गवळी, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ

Web Title: old syllabus exam with paper of new syllabus; The chaos lasted for an hour and a half

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.