दोन हजारांच्या नोटेचे नव्हे, दहा रुपयांच्या नाण्यांचे टेन्शन

By प्रशांत तेलवाडकर | Published: June 3, 2023 10:41 PM2023-06-03T22:41:15+5:302023-06-03T22:45:01+5:30

छत्रपती संभाजीनगरात १० कोटींची नाणी बँकांच्या तिजोरीत

Not the tension of 2000 notes, but the tension of ten rupees coins | दोन हजारांच्या नोटेचे नव्हे, दहा रुपयांच्या नाण्यांचे टेन्शन

दोन हजारांच्या नोटेचे नव्हे, दहा रुपयांच्या नाण्यांचे टेन्शन

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : दोन हजारांच्या नोटा बँका बदलून देत आहेत. बँकांना या गुलाबी नोटांची चिंता नाही. पण दहा रुपयांच्या नाण्याची चिंता सतावत आहे. शहरातील चार करन्सी चेस्टमध्ये सुमारे १० कोटींची १० रुपयांची नाणी साठली आहेत. आता तिजोरीही कमी पडत आहे. या साठलेल्या नाण्यांचे करायचे काय, असा प्रश्न व्यवस्थापनाला पडला आहे.

ग्रामीण भागात दहा रुपयांची नाणी चालेनात
शहरातील बाजारपेठेत दहा रुपयांचे नाणे व्यापारी व ग्राहक स्वीकारतात. मात्र अडचण आहे ग्रामीण भागात. कारण, तिथे व्यापारी - ग्राहक दैनंदिन व्यवहारात दहा रुपयांची नाणी स्वीकारायला तयार नाहीत. यामुळेच ग्रामीण भागातील बँकांच्या शाखांमधून शहरातील करन्सी चेस्टमध्ये मोठ्या प्रमाणात १० रुपयांची नाणी येत आहेत.

बँकांकडेही नाणीच नाणी
भारतीय रिझर्व्ह बँकेने जाहीर केले आहे की, १० रुपयांची नाणी चलनात आहेत. बँकांनी ती नाणी आरबीआयकडे न पाठविता ग्राहकांना द्यावी व चलनात आणावी. मात्र, शहरात नव्हे पण ग्रामीण भागातील ग्राहक नाणे घेण्यास तयार नाहीत. यामुळे शहरातील एसबीआय, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक व आयडीबीआय बँक यांची करन्सी चेस्टमध्ये मिळून सुमारे १० कोटींपेक्षा अधिक मूल्याची १० रुपयांची नाणी साठली आहेत.

दोन हजारांची नोट पाहून अनेक महिने झाले
दोन हजारांची नोट व्यवहारातून बाद होणार, याची माहिती आधीच होती. यामुळे बाजारातून ही नोट गायब झाली होती. एटीएममधून मिळत नव्हती. ही गुलाबी नोट मी अनेक महिन्यांपासून पाहिली नाही.
-वैभव मिटकर, ग्राहक

शहरात स्वीकारताहेत नाणी
सर्वसामान्यांकडे १० रुपयांची नाणी कमीच आहेत. व्यापाऱ्यांच्या गल्ल्यात जास्त आहेत. शहरात नाणी स्वीकारण्यास कोणी नाही म्हणत नाही.
- प्रीतम जाधव, ग्राहक

ऑनलाईनमुळे नाण्याचे महत्त्व कमी
आता बहुतांश जण डिजिटल पेमेंटकडे वळले आहेत. जिथे सुट्यांचा प्रश्न येतो, तिथे सरळ ऑनलाईन पेमेंट केले जाते. याने नाण्यांचे महत्त्व कमी झाले.
 - नीलेश माहेश्वरी, व्यापारी

कोणाकडे कराल तक्रार ?
एखाद्या दुकानदाराने किंवा व्यक्तीने १० रुपयांचे नाणे स्वीकारण्यास नकार दिल्यास त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करु शकता. जिल्हाधिकाऱ्यांकडेही तक्रार देऊ शकतात. किंवा जिल्हा व्यापारी महासंघाच्या अध्यक्षांकडे त्या व्यापाऱ्याविरोधात तक्रार देता येऊ शकते.

Web Title: Not the tension of 2000 notes, but the tension of ten rupees coins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.