‘झेडपी’त नवे गडी, नवे ‘राज’ !

By Admin | Published: March 29, 2017 12:12 AM2017-03-29T00:12:45+5:302017-03-29T00:14:35+5:30

उस्मानाबाद : गुढी पाडव्याचा मुहूर्त साधात जिल्हा परिषदेचे नूतन अध्यक्ष नेताजी पाटील, उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील आणि विषय समित्यांच्या सभापतींनी मंगळवारी पदाची सूत्रे हाती घेतली

New Zee, new 'Raj' in ZP! | ‘झेडपी’त नवे गडी, नवे ‘राज’ !

‘झेडपी’त नवे गडी, नवे ‘राज’ !

googlenewsNext

उस्मानाबाद : गुढी पाडव्याचा मुहूर्त साधात जिल्हा परिषदेचे नूतन अध्यक्ष नेताजी पाटील, उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील आणि विषय समित्यांच्या सभापतींनी मंगळवारी पदाची सूत्रे हाती घेतली. त्यामुळे आता जि.प.मध्ये ‘नवे गडी, नवे राज’ सुरू झाले असून या पदाधिकाऱ्यांसमोर आता प्रामुख्याने शाळांचा दर्जा उंचाविणे, शाळांचा वीजपुरवठा पूर्ववत करणे, दप्तर दिरंगाई दूर करून प्रशासनात सुसूत्रता आणणे आदी आव्हाने असणार आहे. नूतन पदाधिकारी ही आव्हाने कशाप्रकारे पेलावितात, हे येणाऱ्या काळात दिसून येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या २६ जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. बहुमतासाठी त्यांना अवघ्या दोनच जागा कमी पडल्या होत्या. भाजपाच्या सहकार्याने राष्ट्रवादीने सत्तेच्या चाव्या हाती घेत अध्यक्षपदी वडगाव सिद्धेश्वर गटातील नेताजी पाटील तर उपाध्यक्षपदी तेर गटातून विजयी झालेल्या अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांना संधी देण्यात आली. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीनंतर अवघ्या तीन दिवसांत म्हणजेच २४ मार्च रोजी निवड करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीने भाजपाच्या उपकाराची परतफेड दोन ‘तगडी’ सभापतीपदे देवून केली. अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सभापतींच्या निवडी होवूनही संबंधित पदाधिकाऱ्यांकडून पदाची सूत्रे हाती घेतली गेली नव्हती. गुढी पाडव्या दिवशी सूत्रे हाती घेण्याचे त्याच दिवशी निश्चित झाले होते. ठरल्यानुसार मंगळवारी नेताजी पाटील यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. तर अर्चनाताई पाटील यांनी उपाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. अध्यक्ष, उपाध्यक्षांसोबतच सभापतींनीही पदभार स्वीकारला. त्यामुळे खऱ्याअर्थाने मंगळवारपासून जिल्हा परिषदेत ‘नवे गडी, नवे राज’ सुरू झाले आहे. असे असले तरी या नूतन पदाधिकाऱ्यांना वेगवेगळ्या आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे. एकीकडे जि.प.च्या शाळांमध्ये ‘ई-लर्निंग’ उपक्रम सुरू करण्यात येत आहे. तर दुसरीकडे विद्युत बिलाचा भरणा करण्यासाठी पैैसे नसल्याने कनेक्शन खंडित केले जात आहे. अशा शाळांची संख्या तब्बल साडेचारशेवर जावून ठेपली आहे. त्यामुळे या शाळांतील ई-लर्निंग सुविधा अक्षरश: धूळखात पडून आहे. केंद्र आणि राज्यात सत्ता असलेली भाजपा सध्या जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीच्या सोबतीने सत्तेत आहे. त्यामुळे हा प्रश्न तातडीने मार्गी लागेल, अशी अपेक्षा पालकांतून व्यक्त होत आहे. प्रशासनातील दप्तर दिरंगाईचा प्रश्नही तितकाच गंभीर आहे. एकेक फाईल, अनेक महिने फिरूनही त्यावर वेळीच तोडगा निघत नाही. यामध्ये विशेषत: सर्वसामान्यांची प्रचंड फरफट होते. ही बाब लक्षात घेवून सत्ताधाऱ्यांनी यातून तोडगा काढण्याचीही तितकीच गरज आहे. अन्यथ ‘पहिले पाडे पंचावन्न’, या म्हणीचा प्रत्येय नागरिकांना आल्याशिवाय रहाणार नाही. मागील पाच वर्षात राष्ट्रवादी विरोधी बाकावर होती. तेव्हा जि.प. सदस्य महेंद्र धुरगुडे यांनी अधिकारी, पदाधिकाऱ्यांचे कक्ष बांधकामातील अनियमितता चव्हाट्यावर आणली होती. निविदा न काढताच कामे पूर्ण केल्याचा प्रकार घडला होता. हा प्रश्न आजही कायम आहे. त्यामुळे विद्यमान सत्ताधाऱ्यांना याचाही विचार करावा लागणार आहे.(प्रतिनिधी)

Web Title: New Zee, new 'Raj' in ZP!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.