गरिबांना केवळ घाटीतील सुपर स्पेशालिटीचाच आधार; खाजगीकडे हस्तांतरणास खंडपीठाची मनाई

By प्रभुदास पाटोळे | Published: February 29, 2024 11:03 AM2024-02-29T11:03:58+5:302024-02-29T11:04:49+5:30

श्रीमंतांना शहरात अनेक खाजगी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे पर्याय आहेत. गरिबांना मात्र घाटी परिसरातील सुपर स्पेशालिटीचाच आधार असल्याचा उल्लेख करीत खंडपीठाचे आदेश

Many options for the rich, only super specialty for the poor; Aurangabad Bench disallows transfer to private institution | गरिबांना केवळ घाटीतील सुपर स्पेशालिटीचाच आधार; खाजगीकडे हस्तांतरणास खंडपीठाची मनाई

गरिबांना केवळ घाटीतील सुपर स्पेशालिटीचाच आधार; खाजगीकडे हस्तांतरणास खंडपीठाची मनाई

छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालय परिसरातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे खाजगी संस्थेकडे हस्तांतरणासाठी निविदा मागविण्यास खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. आर.एम. जोशी यांनी बुधवारी मनाई केली.

१५० कोटी रुपये खर्च करून तयार केलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे सार्वजनिक भागीदारी पद्धतीने (पीपीपी) खाजगी रुग्णालय चालकांकडे हस्तांतरण करण्यात येणार असल्याचे व त्यानुसार निविदा प्रक्रिया सुरू होणार असल्याचे खा. इम्तियाज जलील यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर श्रीमंतांना शहरात अनेक खाजगी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे पर्याय आहेत. गरिबांना मात्र घाटी परिसरातील सुपर स्पेशालिटीचाच आधार असल्याचा उल्लेख करीत खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला.

राज्यात छत्रपती संभाजीनगर, लातूर, अकोला आणि यवतमाळ येथे चार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहेत. त्यापैकी केवळ छत्रपती संभाजीनगरमधील सुपर स्पेशालिटीची माहिती वैद्यकीय शिक्षण संचालकांनी मंगळवारी त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्याचे निवेदन करून खा. जलील यांनी ३१ पानांचे माहितीपत्रकच सादर केले. त्यात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची इत्थंभूत माहिती, उपलब्ध सोयी- सुविधा, तसेच मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रातील ९२ लाख रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्याची सोय असल्याची माहिती आहे. हे रुग्णालय ‘पीपीपी’ तत्त्वावर चालविण्यासाठी कोण निविदा दाखल करू शकतो, इच्छुकांना ७५ दिवसांत निविदा दाखल करता येईल, असा उल्लेख माहितीपत्रात आहे, असे जलील म्हणाले. त्यांनी ‘हीच बाब’ २५ एप्रिल रोजी निदर्शनास आणून दिली होती.

घाटी रुग्णालयातील उद्वाहन (लिफ्ट) बंद असल्यामुळे, ऑक्सिजनअभावी रुग्णाचा मृत्यू झाल्याची ‘लोकमत’ची बातमी जलील यांनी सादर केली. त्यावर घाटीच्या अधिष्ठातांनी सदर घटनेबाबत खुलासा करण्याचे, तसेच भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी काय उपाययोजना करणार, याबाबतची माहिती सादर करण्याचे निर्देश दिले. डॉ. आशिष भिवापूरकर यांना उत्तर दाखल करण्यासाठी १५ मार्चपर्यंत वेळ दिला.

गरीब रुग्णांना सेवा देता येईल
घाटी रुग्णालयाची सध्याची इमारत जीर्ण व धोकादायक असल्याचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’मध्ये स्पष्ट झाले. आज ना उद्या ती पाडावी लागणार आहे. अशा परिस्थितीत गरीब रुग्णांना सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय सेवा देता येईल, याचा उल्लेख खंडपीठाने केला.

Web Title: Many options for the rich, only super specialty for the poor; Aurangabad Bench disallows transfer to private institution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.