मोर्चेबांधणी

By Admin | Published: July 7, 2014 11:29 PM2014-07-07T23:29:49+5:302014-07-08T01:00:13+5:30

उस्मानाबाद : उस्मानाबादसह जिल्ह्यातील आठही नगर परिषदांच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचा कार्यभार संपला असून, येत्या १७ जुलै रोजी नव्या कारभाऱ्यांची निवड होणार आहे.

Front-end | मोर्चेबांधणी

मोर्चेबांधणी

googlenewsNext

उस्मानाबाद : उस्मानाबादसह जिल्ह्यातील आठही नगर परिषदांच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचा कार्यभार संपला असून, येत्या १७ जुलै रोजी नव्या कारभाऱ्यांची निवड होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असल्याने अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडताना सर्वच पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा कस लागण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, इच्छुकांनीही यासाठीची मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
उस्मानाबाद आणि तुळजापूर नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे येथे माजी मंत्री राणाजगजितसिंह पाटील सांगतील त्याच उमेदवाराची वर्णी लागणार आहे. उस्मानाबाद पालिकेत राष्ट्रवादी २३, काँग्रेस ५ तर सेना ४ असे पक्षीय बलाबल आहे. यंदा अध्यक्षपद खुले असून, यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. यात नंदू राजेनिंबाळकर, सुनील काकडे यांच्यासह संपत डोके यापैकी एकाची वर्णी लागण्याची शक्यता आहे. तुळजापूर नगरपालिकेतही सर्वच्या सर्व १९ सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचेच आहेत. यावेळी नगराध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव आहे. अ‍ॅड. मंजुषा मगर, डॉ. स्मिता लोंढे आणि जयश्री कंदले यांची नावे चर्चेत आहेत. मात्र तरीही अ‍ॅड. मगर यांचे नाव आघाडीवर आहे. दरम्यान, तुळजापूर पालिकेत कोणाला केव्हा संधी मिळणार हे यापूर्वीच ठरलेले असल्याने येथे अध्यक्ष निवडीसाठी केवळ पक्षश्रेष्ठींच्या हिरव्या कंदीलाची प्रतीक्षा आहे.
परंडा पालिकेत शिवसेना ९, काँग्रेस ३, राष्ट्रवादी काँग्रेस ४ आणि भाजपा १ असे पक्षीय बलाबल आहे. पुढील नगराध्यक्ष अनुसूचित जाती या प्रवर्गातील असणार आहे. येथे राजश्री शिंदे आणि आदिका पालके यांची नावे चर्चेत असली तरी आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आदिका पालके यांना अध्यक्षपदाची संधी मिळू शकते. विशेष म्हणजे या निमित्ताने बौद्ध समाजातील व्यक्तीला पालिका इतिहासात पहिल्यांदाच हे पद मिळू शकते. पदाधिकारी निवडीमध्ये माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचा निर्णय अंतिम राहणार आहे.
भूम पालिकेची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. राष्ट्रवादी १२, मनसे १ आणि आघाडी ४ असे येथे पक्षीय बलाबल आहे. ओबीसी प्रवर्गातील जिजाबाई रोकडे विद्यमान अध्यक्षा आहेत. आगामी नगराध्यक्ष महिला खुल्या गटासाठी राहणार असल्याने विद्यमान उपाध्यक्ष संयोगिता गाढवे यांचीच या पदावर वर्णी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
उमरगा नगर पालिकेवर शिवसेनेचा भगवा आहे. शिवसेना १२, काँग्रेस ८ असे पक्षीय बलाबल असलेल्या या पालिकेत ओबीसी राखीव प्रवर्गातील रज्जाक अत्तार अध्यक्ष आहेत. आगामी नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव आहे. त्यामुळे नेमकी कोणाची वर्णी लागते. याबाबतची उत्सुकता आहे. केवळबाई औरादे, सुनीता मगर यांची नावे चर्चेत आहेत. येथे खा. प्रा.रवींद्र गायकवाड सांगतील तोच नगरसेवक अध्यक्षपदी विराजमान होईल अशी स्थिती आहे.
मुरुम पालिकेत शिवसेना १, राष्ट्रवादी काँग्रेस १ आणि काँग्रेस १५ असे पक्षीय बलाबल आहे. सध्या काँग्रेसचे दिंडेगावे हे अध्यक्षपदी विराजमान आहेत. मुरुममध्ये काँग्रेसची एकहाती सत्ता असल्याने बापूराव पाटील यांच्या निर्देशानुसारच अध्यक्षपदाची निवड अपेक्षित आहे.
कळंबमध्ये चत्मकाराची शक्यता
कळंब पालिकेत १७ पैकी १० सदस्य काँग्रेसचे असल्याने पुढील अडीच वर्षासाठीही पालिकेवर काँग्रेसचेच वर्चस्व राहण्याची शक्यता आहे. विरोधकांनी काँग्रेसमधील नाराजांची मोट बांधली तर मात्र होणाऱ्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत येथे चमत्कार घडू शकतो. पालिकेत काँग्रेस १०, राष्ट्रवादी ५ तर सेनेचे २ सदस्य आहेत. येथे काँग्रेस-सेनेत युती असून, विद्यमान अध्यक्ष म्हणून काँग्रेसचे शिवाजी कापसे तर उपाध्यक्षपद सेनेच्या पांडुरंग कुंभार यांच्याकडे आहे. मात्र पुढील अडीच वर्ष पालिकेत काँग्रेसच्या विरोधात काम करण्याची भूमिका कुंभार यांनी मांडलेली असल्याने राष्ट्रवादी, सेना व काँग्रेसमधील नाराज नगरसेवक अशी आघाडी पालिकेमध्ये उदयास येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. आगामी अध्यक्षपद महिलेसाठी राखीव आहे. काँग्रेसकडून मीराताई चोंदे, योजना वाघमारे यांची नावे चर्चेत आहेत. आणि राष्ट्रवादी, सेना व नाराज एकत्र आले तर अनिता लोमटे, काशीबाई खंडागळे, आतिया शेख, गीता पुरी अथवा सेनेच्या कीर्ती अंबुरे यांची लॉटरी लागू शकते.

Web Title: Front-end

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.