सिल्लोड तालुक्यात गांजा पेरणाऱ्या शेतकऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 07:01 PM2018-10-04T19:01:36+5:302018-10-04T19:02:07+5:30
रेलगाव येथे एका शेतकऱ्यांने गांजा पेरल्या प्रकरणी गुन्हे शाखा व ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली.
सिल्लोड (जि. औरंगाबाद) : तालुक्यातील रेलगाव येथे एका शेतकऱ्यांने गांजा पेरल्या प्रकरणी गुन्हे शाखा व ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली. यावेळी शेतकऱ्याला अटक करून 5 लाख 12 हजाराचा ओला गांजा जप्त करण्यात आला आहे.
अशोक खेमसिंग मुंढे असे अटकेतील शेतकऱ्याचे नाव आहे. ग्रामीण पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा यांना गुप्त माहिती मिळाल्याने पोलिसांनी रेलगाव येथील गट नंबर 184 मध्ये बुधवारी शेतात जाऊन छापा मारला. यावेळी कापसाच्या पिकात एकूण 82 गांजाची झाडे वजन 102 किलो ( किंमत जवळपास 5लाख 12हजार ) चा मुद्देमाल जप्त केला. विशेष म्हणजे त्याने गांजाच्या पिकाला ठिबक यंत्रणासुद्धा लावली होती. शेतकरी मुंढे याला अटक करून बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश बिरादार यांनी दिली.
ही कारवाई औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधिन उपअधीक्षक जगदीश पांडे, पोलिस उपनिरीक्षक विवेक जाधव, सचिन कापुरे, सिल्लोड ग्रामीणचे विश्वास पाटील, संदीप सावळे, कर्मचारी विठ्ठल राख, रंगराव बावस्कर, राजेंद्र जोशी, रमेश अप्सनावाड, धीरज जाधव, संजय भोसले, ज्ञानेश्वर मेटे, विनोद तांगडे, गणेश गांगवे, संजय तांदळे यांनी केली आहे.