मनपाची उलटतपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 01:17 AM2017-12-18T01:17:13+5:302017-12-18T01:17:16+5:30

पालकमंत्री रामदास कदम यांनी रविवारी अधिवेशनातून वेळ काढून मनपाच्या सुमारे २५ उपक्रमांसाठी दिलेल्या अनुदानातून काय काम केले, याचा आढावा घेतला.

 Cross examination | मनपाची उलटतपासणी

मनपाची उलटतपासणी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : पालकमंत्री रामदास कदम यांनी रविवारी अधिवेशनातून वेळ काढून मनपाच्या सुमारे २५ उपक्रमांसाठी दिलेल्या अनुदानातून काय काम केले, याचा आढावा घेतला. रविवारी पालकमंत्री अचानक तुळजापूरहून औरंगाबादमार्गे मुंबईला रवाना झाले. सुभेदारी विश्रामगृहात एका तातडीच्या बैठकीत त्यांनी पालिकेची उलटतपासणी केली. आठवड्यात डीपीसीतून दिलेल्या निधीतून काय कामे केली, याचा अहवाल देण्याचे आदेश त्यांनी कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांना दिले. पालिकेला एवढ्या प्रमाणात निधी देऊनही कामे होत नसतील तर माझा नाईलाज आहे. दोन वर्षांपासून कुठलेही काम गतीने पूर्ण केलेले नाही. मनपातील अधिकारी काम करीत नसल्याचा आरोप पालकमंत्र्यांनी केला.
एकेक प्रस्ताव पुढे येण्यासाठी वर्ष लावले जात असल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले, मराठवाडा मुक्तिसंग्राम दुसºया टप्प्याचे काम रेंगाळले आहे. विमानतळासमोर लेण्यांचे म्युरल्स लावण्याचे काम केले नाही. चिकलठाणा येथील २०० बेडस्च्या हॉस्पिटलला पाणीपुरवठा करण्याचे काम झाले नाही. सफारी पार्कसाठी जागा मनपाच्या ताब्यात दिली. परंतु पुढे काहीही केले नाही. १५० हेक्टर जागा नव्याने प्रस्तावित केली. ५० खाटांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलचे काम कुठंपर्यंत आले आहे. जिल्हा नियोजन समितीने अनुदान दिले, परंतु कामाचे काय झाले, असा सवाल पालकमंत्र्यांनी केला.
शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाच्या कामाचे घोडे पुढे का सरकत नाही. संत एकनाथ रंगमंदिरासाठी समिती गठीत करणे, तसेच मुंबईतील कालिदास नाट्यगृहाप्रमाणे ते सुशोभित करण्याबाबतचा प्रस्ताव का दिला नाही. २ कोटी रुपये मार्चपर्यंत खर्च करून २ कोटी एप्रिलमध्ये देण्याचे सांगितले तरी मनपा काम करीत नाही, यावरून त्यांनी कार्यकारी अभियंत्यांना खडसावले.
जांभूळवनामध्ये केलेल्या वृक्षारोपणाचे काय झाले. कटकटगेटमधील किती रस्त्यांचे डांबरीकरण करणे बाकी आहे. डीपीसीतून निधी दिलेल्या हॉस्पिटल्सची कामे का झाली नाहीत. शासकीय दूध डेअरीची जागा हॉस्पिटल्ससाठी आजवर ताब्यात का आली नाही. १०० कोटींच्या रस्त्यांच्या निधीचे काय नियोजन केले. मनपाची करवसुली किती झाली.
पर्यटनस्थळ विकासाचे काय झाले. कटकटगेट हॉस्पिटलला १ कोटी दिले, त्याचे काय केले, अशा अनेक कामांची त्यांनी माहिती घेतली. यावेळी जि. प. अध्यक्षा देवयानी डोणगावकर, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, राजेंद्र जंजाळ, गजानन मनगटे, बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती होती.
‘समांतर’ बाबत तडजोड नको
मनपाचे मुख्यालय व इतर मालमत्ता गहाण ठेवण्याबाबत कुणाचे डोके चालते आहे. जनाची नाहीतर मनाची ठेवा, असा टोला लगावत सगळ्या प्रकरणांचा खुलासा देण्याचे आदेश कदम यांनी अभियंत्यांना दिले. समांतरच्या कामाला तीव्र विरोध असल्याचे सांगून कदम म्हणाले, निलंबित केलेले अभियंते कोणत्या मुद्यावर परत घेतले, याचा खुलासा करा. भविष्यात समांतर जलवाहिनीच्या योजनेबाबत मनपाची भूमिका काय आहे. १० टक्के वाढीव वसुलीमुळे जनतेचे नुकसान होणार आहे. कार्यकारी अभियंता सिकंदर अली म्हणाले, कंपनी कोर्टाबाहेर वाटाघाटी करण्याच्या प्रयत्नात आहे. समांतरबाबत काहीही तडजोड करू नका, असे कदम यांनी मनपाला सांगितले.

Web Title:  Cross examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.