कचरा उचलण्यासाठी दोन महिन्यांत दीड कोटींचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 01:41 PM2019-04-27T13:41:39+5:302019-04-27T13:42:40+5:30

खाजगी कंपनीने नेमणूकीनंतर फक्त सहा वॉर्डांतच केले काम

The cost of one and a half crores for lifting the waste in two months from Aurangabad city | कचरा उचलण्यासाठी दोन महिन्यांत दीड कोटींचा खर्च

कचरा उचलण्यासाठी दोन महिन्यांत दीड कोटींचा खर्च

googlenewsNext
ठळक मुद्देकंपनीला ९ पैकी ६ ठिकाणी काम सुरू करण्यात यश आले आहे. कंपनीला बिल कोठून द्यावे, असा प्रश्न मनपाला पडला आहे. 

औरंगाबाद :  शहरातील कचरा संकलनाचे काम मनपाने बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या खाजगी कंपनीला दिले आहे. कंपनीने शुक्रवारी प्रभाग १ आणि प्रभाग ८ मध्येही काम सुरू केले. आतापर्यंत कंपनीला ९ पैकी ६ ठिकाणी काम सुरू करण्यात यश आले आहे. कंपनीने मागील दोन महिन्यांत काम केल्याचे बिल मनपाला सादर केले. १ कोटी ५६ लाख रुपयांचे बिल पाहून लेखा विभाग संकटात सापडला आहे. कंपनीला बिल कोठून द्यावे, असा प्रश्न मनपाला पडला आहे. 

पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला मनपाने घरोघरी जाऊन कचरा संकलन आणि वाहतुकीचे काम दिले आहे. या कंपनीने फेबु्रवारीपासून झोन २, ७ आणि ९ मध्ये काम सुरू केले. त्यानंतर दीड महिन्याने झोन ३ मध्ये कचरा संकलनाचे काम सुरू केले. त्यानंतर मनपाने वारंवार सूचना देऊनही कंपनी इतर झोनमध्ये काम करीत नव्हती. कधी मजुरांची तर कधी वाहनांची अडचण पुढे करून कंपनीने टाईमपास सुरू केला. अखेर शुक्रवारी झोन १ मनपा मुख्यालय व ८ म्हणजेच सातारा-देवळाई येथे कचरा संकलनाचे काम सुरू केले. शहरातील तीन ते चार झोनमध्येच कंपनी काम करीत होती. या कामाचा मोबदला म्हणून कंपनीने मनपाकडे दोन महिन्यांचे तब्बल १ कोटी ५६ लाख रुपयांचे बिल सादर केले. कंपनीने एक मेट्रिक टन कचरा उचलला तर मनपा १८६३ रुपये कंपनीला देणार आहे. 

कंपनीने तीन टप्यात नऊपैकी सहा झोनमध्ये कचरा संकलन व वाहतुकीचे काम सुरू  केले आहे. आता झोन ४, ५ आणि ६ मध्ये काम सुरू होणे बाकी आहे. त्यामुळे या राहिलेल्या तिन्ही झोनमध्ये घरोघरी कचरा संकलन करण्यास कंपनी किती दिवस लावते याची प्रतीक्षा आहे. आजही मनपा तीन झोनमध्ये कचरा उचलण्यासाठी लाखो रुपये महिना खर्च करीत आहे. एकीकडे कचऱ्यातील खर्च कमी करण्यासाठी मनपाने खाजगी कंपनीला आणले. कंपनीने काम सुरू केले तरी खर्च कमी होण्याऐवजी उलट वाढत चालला आहे. 

Web Title: The cost of one and a half crores for lifting the waste in two months from Aurangabad city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.