...अखेर महानगरपालिकेला मिळाले आयुक्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 01:27 AM2018-05-16T01:27:46+5:302018-05-16T01:28:02+5:30

महापालिका आयुक्त म्हणून डॉ. निपुण विनायक यांनी मंगळवारी रात्री उशिरा पदभार स्वीकारला. मागील तीन महिन्यांपासून हे पद रिक्त होते.

Corporation finally got the commissioner | ...अखेर महानगरपालिकेला मिळाले आयुक्त!

...अखेर महानगरपालिकेला मिळाले आयुक्त!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महापालिका आयुक्त म्हणून डॉ. निपुण विनायक यांनी मंगळवारी रात्री उशिरा पदभार स्वीकारला. मागील तीन महिन्यांपासून हे पद रिक्त होते. आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविला होता. शहरात कचरा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर असताना महापालिकेला आयुक्त नसल्याने राजकीय मंडळींकडून बरीच ओरड करण्यात येत होती.
१६ फेब्रुवारीपासून शहरात कचराकोंडी निर्माण झाली आहे. त्यानंतर मिटमिटा येथे कचरा टाकण्यास नागरिकांनी प्रचंड विरोध दर्शविला होता. पोलीस विरुद्ध नागरिक अशी दंगलही भडकली होती. दंगलीनंतर राज्य शासनाने आयुक्त डी.एम. मुगळीकर यांची तडकाफडकी बदली केली होती. दंगलीस कारणीभूत ठरवून पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनाही सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते, तेव्हापासून आजपर्यंत महापालिका आयुक्तपद रिक्तच होते. या पदावर वेगवेगळ्या अधिका-यांची वर्णी लागणार असल्याची अफवा अधूनमधून पसरत होती. आठ दिवसांपासून राज्य शासनाने डॉ. निपुण विनायक यांच्या नियुक्तीचे आदेश काढले. नवनियुक्त आयुक्त दिल्लीत उपसचिव म्हणून कार्यरत होते. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानात ते कार्यरत होते. घनकचरा व्यवस्थापनात त्यांनी उल्लेखनीय काम केलेले आहे. त्यामुळे शासनाने खास डॉ. विनायक यांची नियुक्ती केली.
मंगळवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास ते महापालिकेत दाखल झाले. त्यानंतर लगेच पदभारही स्वीकारला. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, स्वीय सहायक सुनील ढेकळे उपस्थित होते. नवनियुक्त आयुक्तांनी फुलांचा बुके स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे कच-यात अधिक भर पडते, असेही त्यांनी अधिका-यांना सांगितले. यापुढे अभ्यागतांनीही आपल्याकडे येताना फुलांचा बुके अजिबात आणू नये, असे आवाहन करण्यात आले.

Web Title: Corporation finally got the commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.