आयुक्त हटावच्या तलवारी म्यान

By Admin | Published: September 12, 2016 11:21 PM2016-09-12T23:21:41+5:302016-09-12T23:24:47+5:30

औरंगाबाद : महापालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्यावर अविश्वास ठराव आणून त्यांना परत शासन दरबारी पाठविण्यासाठी शिवसेना-भाजपने कंबर कसली होती.

The Commissioner of the Removal of the Sword Sheath | आयुक्त हटावच्या तलवारी म्यान

आयुक्त हटावच्या तलवारी म्यान

googlenewsNext

औरंगाबाद : महापालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्यावर अविश्वास ठराव आणून त्यांना परत शासन दरबारी पाठविण्यासाठी शिवसेना-भाजपने कंबर कसली होती. युतीच्या नेत्यांनी अविश्वास ठरावाकडे न जाता विद्यमान आयुक्तांकडून व्यवस्थित काम करून घ्या, अशा कानपिचक्या देण्यात आल्या. त्यामुळे अविश्वास ठरावासाठी प्रयत्नशील असलेल्या पदाधिकाऱ्यांनीही आपल्या तलवारी म्यान केल्या. ‘एमआयएम’ पक्षात उघडपणे दोन गट पडले. या पक्षानेही अविश्वासाच्या मुद्यावर अगोदर युतीसोबत ‘विश्वास’ दाखविला आणि नंतर यू-टर्न घेतला.
६ सप्टेंबर रोजी मनपाची विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. शहरातील खड्ड्यांसाठी आयोजित सभेत एमआयएमच्या एका नगरसेवकाने अधिकाऱ्यांना ‘गेंड्याची कातडी’ झाली आहे, असा वाक्यप्रचार केला. त्यामुळे मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्यासह अधिकाऱ्यांनी चक्क सर्वसाधारण सभेवर बहिष्कार घातला. या घटनेमुळे मनपा पदाधिकारीही क्षणभर अवाक् झाले होते. महापालिकेच्या सर्वोच्च सभागृहाचा आयुक्तांसह अधिकाऱ्यांनी अवमान केला. आयुक्तांनी माफी मागावी, उद्यापासून आयुक्तांना मनपात न येऊ देणे आदी मनसुबे पदाधिकाऱ्यांनी आखून ठेवले. सेनेचे दोन पदाधिकारी दुसऱ्याच दिवशी कोकणमध्ये पालकमंत्री रामदास कदम यांना भेटायला गेले. भाजपचे एक पदाधिकारी भोकरदनला प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना भेटायला गेले.
युतीच्या दोन्ही नेत्यांनी अविश्वास ठराव नको, आहेत त्या आयुक्तांकडून काम करून घेण्याचा कानमंत्र दिला. सभागृह नेते राजेंद्र जंजाळ यांनी सांगितले की, एमआयएमच्या नगरसेवकाने सभागृहात तो शब्दप्रयोग केला होता. त्यांनाच मान-सन्मान नसेल तर युतीलाही काही देणे-घेणे नाही. आम्ही असा कोणताच ठराव यापुढे तरी आणणार नाही.
भाजपची स्वतंत्र बैठक
सोमवारी भाजपच्या कार्यालयात सर्व नगरसेवकांची बैठक घेण्यात आली. यावेळी विधानसभेचे सभापती तथा ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे, आ. अतुल सावे, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी आदी उपस्थित होते. यावेळी नगरसेवकांनी वॉर्डात विकासकामे होत नसल्याची तक्रार केली. रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा आदी तक्रारीच जास्त होत्या. उपस्थित नेत्यांनीही नगरसेवकांचे दु:ख ऐकून घेतले. १७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहरात येणार आहेत. त्यांच्या कानावर वस्तुस्थिती टाकण्यात येईल, असा सल्ला ज्येष्ठ नेत्यांनी दिला. यावेळी हरिभाऊ बागडे यांनी सर्व नगरसेवकांना अविश्वास ठरावाच्या भानगडीत अजिबात पडू नका. विद्यमान आयुक्तांसोबत काम करा, असा ‘बुजुर्ग’पणाचा सल्ला दिला.

Web Title: The Commissioner of the Removal of the Sword Sheath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.