परीक्षेपूर्वी पेपर फोडण्याचे प्रकरण; प्राचार्य, सहकेंद्रप्रमुख, प्राध्यापकांसह परीक्षा केंद्रांवर बंदी

By राम शिनगारे | Published: April 16, 2024 06:44 PM2024-04-16T18:44:13+5:302024-04-16T18:44:44+5:30

परीक्षा मंडळाच्या बैठकीतील निर्णय, गोपनीय माहितीनुसार दोन प्राध्यापकांच्या पथकाने दोन परीक्षा केंद्रांवर १० एप्रिलला सर्जिकल स्ट्राईक करीत गैरप्रकार उघडकीस आणला होता.

Case of Paper leak Before Examination; Ban on examination centers including principal, co-head, professors | परीक्षेपूर्वी पेपर फोडण्याचे प्रकरण; प्राचार्य, सहकेंद्रप्रमुख, प्राध्यापकांसह परीक्षा केंद्रांवर बंदी

परीक्षेपूर्वी पेपर फोडण्याचे प्रकरण; प्राचार्य, सहकेंद्रप्रमुख, प्राध्यापकांसह परीक्षा केंद्रांवर बंदी

छत्रपती संभाजीनगर : परीक्षेला सुरुवात होण्यापूर्वीच परीक्षा विभागाकडून मिळणारी प्रश्नपत्रिका डाऊनलोड करीत संस्थाचालकाच्या मोबाईलमध्ये पाठविण्यात येत होती. याविषयी परीक्षा विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दोन प्राध्यापकांच्या पथकाने दोन परीक्षा केंद्रांवर १० एप्रिलला सर्जिकल स्ट्राईक करीत गैरप्रकार उघडकीस आणला होता. या प्रकरणात आता परीक्षा मंडळाने केंद्राचे प्रमुख तथा प्राचार्य, केंद्रातील संबंधित प्राध्यापकांवर परीक्षेच्या कामकाजासाठी ५, सहकेंद्रप्रमुखास तीन आणि केंद्रांवर तीन वर्षे बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याची माहिती प्रभारी कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांनी दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षांना २ एप्रिलला सुरुवात झाली. या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका परीक्षा विभागाकडून परीक्षेपूर्वी दोन तास अगोदर ऑनलाईन पाठविण्यात येतात. त्यासाठी केंद्रात एक स्ट्राँगरूम बनविलेली असून, त्या ठिकाणी सीसीटीव्हीची निगराणी असते. मागील सत्रात परळी येथील केंद्रात झालेल्या गैरप्रकारामुळे यावेळी सुरक्षा फिचर्समध्ये वाढ केली आहे. त्यानुसार काम करणाऱ्या गोपनीय टीमला रांजणगाव येथील गुरुकुल महाविद्यालयाच्या केंद्रातील स्ट्राँगरूममधून प्रश्नपत्रिका फोडण्यात येत असल्याचे समजले. त्याशिवाय कन्नड तालुक्यातील आमदाबाद येथील पद्मावती महाविद्यालयातही असाच प्रकार घडत होता. त्यामुळे परीक्षा संचालकांनी कुलगुरूंच्या आदेशानुसार दोन प्राध्यापकांना केंद्राची झडती घेण्यासाठी पाठविले. त्यानुसार दोन प्राध्यापकांनी मारलेल्या छाप्यात धक्कादायक माहिती उघडकीस आली.

रांजणगावच्या गुरुकुल महाविद्यालयातून प्रश्नपत्रिका संस्थाचालकाच्या मोबाईलवर पाठविण्यात येत होत्या. त्या केंद्रातून चार मोबाईल जप्त केले. त्यात मागील विषयांच्याही प्रश्नपत्रिका आढळल्या. त्याशिवाय कन्नड तालुक्यातील पद्मावती महाविद्यालयाच्या क्लर्कच्या मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिका आढळली. त्याने स्वत:च्या नातेवाइकास प्रश्नपत्रिका पाठविल्याचेही दिसून आले. याविषयीचा अहवाल दोन प्राध्यापकांनी परीक्षा संचालकांना दिला. हा अहवाल परीक्षेतील गैरप्रकाराच्या संबंधित ४८ (५) ग समितीसमोर ठेवला. समितीने महाविद्यालयांना बाजू मांडण्यास संधी दिली. त्यानंतर महाविद्यालयातील परीक्षा केंद्र, केंद्रप्रमुख, सहकेंद्रप्रमुख आणि संबंधित प्राध्यापकांवर कारवाईची शिफारस केली. त्यास परीक्षा मंडळाने मंजुरी दिली.

परीक्षांच्या तारखांमध्ये बदल
यूपीएससीची परीक्षा २० एप्रिलला असल्यामुळे त्या दिवशीचा पेपर व परभणी लोकसभा मतदारसंघात २६ एप्रिलला मतदान होणार आहे. त्यामुळे २५, २६ आणि २७ एप्रिल दरम्यान असणारे पेपरही पुढे ढकलण्यास परीक्षा मंडळाने मंजुरी दिल्याचेही डॉ. अमृतकर यांनी सांगितले.

Web Title: Case of Paper leak Before Examination; Ban on examination centers including principal, co-head, professors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.