बाबासाहेब आमची प्रेरणा : ‘ही तुझीच कमाई आहे गं भीमाई’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 06:45 PM2019-04-14T18:45:29+5:302019-04-14T18:47:08+5:30

एका विद्यार्थ्याने प्रश्न केला, बाबासाहेब आम्हाला तर एकच सदरा व पायजमा आहे; यावर बाबासाहेब म्हणाले...

Babasaheb is our inspiration: 'It is your earning,' milind's student confession | बाबासाहेब आमची प्रेरणा : ‘ही तुझीच कमाई आहे गं भीमाई’ 

बाबासाहेब आमची प्रेरणा : ‘ही तुझीच कमाई आहे गं भीमाई’ 

googlenewsNext

‘या कॉलेजमध्ये उच्चशिक्षण घेण्यासाठी तुम्ही खेड्यापाड्यांतून आला आहात... तुमच्या राहणीमानात बदल झाला पाहिजे... नियमित अभ्यास करून तुम्ही शैक्षणिक प्रगती साधली पाहिजे’, महामानवाचे हे बोल पहिल्यांदाच कानी पडले... त्यांना जवळून पाहण्याचे भाग्य लाभले आणि आमचे जीवन सार्थक झाले, प्रज्ञासूर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘मिलिंद’मधील आठवणी सांगताना समाजकल्याण विभागाचे निवृत्त सहसंचालक त्र्यंबक दिगंबरराव डेंगळे हे भावविवश झाले.

तत्कालीन निजाम राजवटीत मागासवर्गीय समाजाला अत्यंत हालअपेष्टा भोगाव्या लागत होत्या. त्याच काळात अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर गावात माझा जन्म झाला. लहानपणीच वडील वारल्यामुळे पुढे आजोळी दर्जी बोरगाव, ता. रेणापूर, ता. लातूर येथेच आईसोबत लहानपण गेले. तेथेच प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर लातूर येथे चौथी ते सातवीपर्यंत व उस्मानाबाद येथे आठवी ते दहावीपर्यंत शिक्षण घेतले. १९५२ साली दहावी पास झालो. तेव्हा औरंगाबादेत बाबासाहेबांनी सुरू केलेल्या कॉलेजमध्ये वसंतराव धावरे हे शिकत होते. ते उस्मानाबादला सुटीवर आल्यानंतर त्यांनी बाबासाहेबांच्या महाविद्यालयाची आम्हाला माहिती दिली. त्यानुसार मी, एम.एस. सरकाळे व तुकाराम गायकवाड आम्ही तिघांनी पुढील शिक्षणासाठी औरंगाबादला जाण्याचा निश्चय केला; परंतु एकुलता एक मुलगा शिकण्यासाठी एवढ्या दूर जाणार म्हणून आईचे मन कासावीस झाले; पण गावातील बाबासाहेबांच्या चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते व काही सवर्ण मंडळींनी आईची समजूत काढत मुलाला शिकू द्या, तो हुशार आहे, तुमचे नाव कमावील, असा धीर दिला. शेवटी आई तयार झाली.

जून १९५२ मध्ये आम्ही तिघांनीही पीईएस कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. कॉलेच्या मुलांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था छावणीत मिलिटरी अधिकाऱ्यांच्या रिकाम्या मेसमध्ये; अर्थात कुकरी होस्टेलमध्ये होती. तिथे सुटीच्या दिवशी बाबासाहेब यायचे व आम्हाला मार्गदर्शन करायचे. एकदा बाबासाहेबांनी मार्गदर्शन केल्यानंतर एका विद्यार्थ्याने प्रश्न केला, बाबासाहेब आम्हाला तर एकच सदरा व पायजमा आहे. तेव्हा रोज बदलून कपडे कोठून घालावे. तेव्हा बाबासाहेब म्हणाले, कॉलेज आटोपल्यावर तुम्ही होस्टेलवर येता, तेव्हा सायंकाळी रोज कपडे धुवायचे. सकाळी तांब्यात कोळसा भरायचा व इस्त्री करायची. रोज स्वच्छ कपडे घातल्यास तुमच्यासोबतच्या अन्य जाती-धर्मांच्या मुलांवर तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. तुमच्याबाबत त्यांच्यात आपुलकी व स्नेहभाव वाढेल. इंग्रजी भाषा आत्मसात करा. ती अवघड आहे, हा न्यूनगंड मनातून काढून टाका. 

बाबासाहेबांनी कॉलेजमध्ये पहिल्यांदा ‘को- एज्युकेशन’ अर्थात मुले आणि मुलींनी वर्गात एकत्र बसून शिकण्याची प्रथा सुरू केली. मुलींसाठी बाबासाहेबांनी सर्वात अगोदर ‘कॉलेज बस’ची प्रथा सुरू केली. त्यामुळे सुरुवातीला कॉलेजमध्ये मुलींना पाठविण्यासाठी धजावत नसलेले पालक नंतर मुलींना उत्स्फूर्तपणे कॉलेजला पाठवू लागले. पीईएस कॉलेज इमारतीच्या बांधकामावर बाबासाहेब बारकाईने लक्ष देत असत. ते जेव्हा केव्हा औरंगाबादला येत तेव्हा ते कॉलेजमध्ये प्राध्यापकांच्या शिकविण्याचे बारकाईने अवलोकन करीत. अनेकदा अध्यापनातील बारकावे ते प्राध्यापकांना सांगत. तेव्हा वर्गातील प्राध्यापक बाबासाहेबांना पाहून गर्भगळीत होत असत. विद्यार्थ्यांसोबत प्रश्नोत्तराच्या माध्यमातून ते संवाद साधत असत.  पुढे बी.ए. पास झाल्यावर नोकरीच्या शोधात होतो. यासंदर्भात चिटणीस सरांना भेटलो. तेव्हा ते म्हणाले, नोकरी लागेपर्यंत आपल्या कॉलेजच्या ‘गेस्ट हाऊस’मध्ये रेक्टरची नोकरी कर. सध्याच्या ‘राऊण्ड होस्टेल’ला तेव्हा ‘गेस्ट हाऊस’ या नावाने ओळखायचे. पुढे समाजकल्याण विभागात सुपरिंटेंडेंटची नोकरी मिळाली. त्यानंतर औरंगाबाद व मुंबई येथे विभागीय समाजकल्याण अधिकारी, सहायक संचालक, उपसंचालक व सहसंचालक पदावरून निवृत्त झालो. बाबासाहेबांचे आमच्या समाजाबरोबर या देशावरही फार मोठे उपकार आहेत.

‘ही तुझीच कमाई आहे गं भीमाई, 
इथे कुणाचेच काही कष्ट नाहीत...’

( संकलन : विजय सरवदे ) 

Web Title: Babasaheb is our inspiration: 'It is your earning,' milind's student confession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.