विमानतळाच्या विस्तारीकरणाचे ‘टेकऑफ’, भू- संपादनासाठी ५७८ कोटींची मान्यता

By संतोष हिरेमठ | Published: November 23, 2023 06:02 PM2023-11-23T18:02:20+5:302023-11-23T18:03:07+5:30

१३९ एकरांत होणार विस्तारीकरण : चिकलठाणा, मुकुंदवाडी, मुर्तूजापूरमधील जमीन होणार संपादित

578 crores approved for land acquisition of Aurangabad airport expansion | विमानतळाच्या विस्तारीकरणाचे ‘टेकऑफ’, भू- संपादनासाठी ५७८ कोटींची मान्यता

विमानतळाच्या विस्तारीकरणाचे ‘टेकऑफ’, भू- संपादनासाठी ५७८ कोटींची मान्यता

छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारीकरणाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. चिकलठाणा, मुकुंदवाडी, मुर्तूजापूरमधील ५६.२५ हेक्टर म्हणजेच १३९ एकरांत विस्तारीकरण होणार आहे. या विस्तारीकरणासाठी जमीन संपादित करण्यासाठी आणि त्यापोटी होणाऱ्या ५७८.४५ कोटी रुपयांच्या खर्चास शासन निर्णयाद्वारे प्रशासकीय व वित्तीय मान्यता मिळाली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून विमानतळाच्या विस्तारीकरणाची प्रतीक्षा केली जात आहे. विस्तारीकरणासाठी आधी १८२ एकर जागेच्या भूसंपादनाची प्रतीक्षा केली जात होती. जागेची मोजणीही झाली होती; परंतु नंतर १४७ एकर जागेचे भूसंपादन करण्याचा निर्णय झाला. यातील ८ एकर क्षेत्र हे भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अधिपत्त्याखालीच आहे. त्यामुळे १३९ एकर क्षेत्र संपादित करणे आवश्यक आहे. या १३९ एकर भूसंपादनासाठी निधीची प्रतीक्षा केली जात होती. अखेर निधीचा मार्ग मोकळा झाल्याने आता विस्तारीकरणाला गती मिळेल, अशी अपेक्षा आहे.

कोणत्या ठिकाणी किती भूसंपादन
गावाचे नाव - संपादित होणारे क्षेत्र

चिकलठाणा- ४९.१६ हेक्टर
मुर्तूजापूर - ४.२५ हेक्टर
मुकुंदवाडी - २.८४ हेक्टर
एकूण - ५६.२५ हेक्टर (१३९ एकर)

सर्वाधिक भूसंपादन होणार चिकलठाण्यात
विस्तारीकरणासाठी सर्वाधिक भूसंपादन हे चिकलठाण्यात होणार आहे. याठिकाणी ४९.१६ हेक्टर क्षेत्र संपादित होईल. तब्बल ३९१.५० कोटी रुपये या जमिनीचे मूल्यांकन आहे.

घरे, फळझाडे, विहिरी, बोअरवेल वाचणार
विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी १८२ एकर जागेची मागणी भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून करण्यात आली होती. त्यासाठी जागेची मोजणीही झाली होती; परंतु १८२ एकरऐवजी आता १४७ एकर जागेचे भूसंपादन होणार आहे. नागरिकांची घरे वाचविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. घरांबरोबर फळझाडे, विहिरी, बोअरवेलही वाचणार आहेत.

विमानतळाच्या विस्तारीकरणात काय-काय होणार?
- चिकलठाणा विमानतळाची धावपट्टी सध्या ९ हजार ३०० फूट म्हणजेच २८३५ मीटर लांबीची आहे. विस्तारीकरणात १२ हजार फुटांची म्हणजे ३६६० मीटर लांबीची धावपट्टी होईल.
- धावपट्टी विस्ताराने भविष्यात विमानतळावर मोठी कार्गो विमाने, तसेच जास्त प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या जम्बो विमानांची उड्डाणे शक्य होतील.
- विमानतळावर विमानाची वाहतूक सुरळीत होण्यासाठी समांतर ‘टॅक्सी वे’ आवश्यक असते. धावपट्टीचा विस्तारासह समांतर ‘टॅक्सी वे’देखील विस्तारीकरणात होईल.
- विमानांची पार्किंग व्यवस्था, नवीन इमारत

Web Title: 578 crores approved for land acquisition of Aurangabad airport expansion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.