३३ गावे टँकरग्रस्त

By Admin | Published: July 7, 2014 11:00 PM2014-07-07T23:00:18+5:302014-07-08T01:02:18+5:30

जालना : जिल्ह्यात यंदा मान्सूनचे आगमन विलंबाने झाल्याने ग्रामीण भागातील शेकडो गावांमध्ये पाणीटंचाईच्या झळा कायम आहे.

33 villages tanker | ३३ गावे टँकरग्रस्त

३३ गावे टँकरग्रस्त

googlenewsNext

जालना : जिल्ह्यात यंदा मान्सूनचे आगमन विलंबाने झाल्याने ग्रामीण भागातील शेकडो गावांमध्ये पाणीटंचाईच्या झळा कायम असून तेथे टँकरद्वारे तसेच विहिरींचे अधिग्रहण करून टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाकडून होत आहे. २६ गावे व १२ वाड्यांमध्ये ३३ टँकर सुरू आहेत. तर ८७ गावे आणि १४ वाड्यांसाठी १०१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
ग्रामीण भागात पावसाअभावी पेरण्यांची कामे खोळंबली. मात्र पिण्याच्या पाण्यासाठीही अनेक ठिकाणी ग्रामस्थांना भटकंती करण्याची वेळ आली आहे. जालना तालुक्यात निपाणी पोखरी, पिंप्री डुकरी, उटवद, हडप, नसडगााव या गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. तर या गावांसह गैबांशा वाडी, आनंदनगर या वाड्यांवर विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. बदनापूर तालुक्यात नानेगाव, कुसळी, कडेगाव, राजेवाडी, वंजारवाडी, मांजरगाव, धोपटेश्वर येथे टँकरद्वारे तसेच विहिरींचे अधिग्रहण करून टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
भोकरदन व जाफराबाद तालुक्यातील कुंभारी या गावांमध्ये एका ठिकाणी खाजगी विहीर अधिग्रहण करून तर दुसऱ्या ठिकाणी शासकीय उद्भव तसेच टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. अंबड तालुक्यात कौचलवाडी, लालवाडी, किनगाव, पारनेर, पिंपरखेड, रोहिलागड, सारंगपूर, जामखेड, नागझरी, चंदनापुरी ख./ रेणापुरी तसेच मसई तांडा, विठ्ठलवाडी/ नारळेवाडी, घुंगर्डे हदगाव, गणपती नगर, शिंदेवाडी, भगवाननगर, गहिनीनाथनगर या ठिकाणी टँकर व खाजगी विहिरीद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. घनसावंगी तालुक्यात कोठी, बोरगाव खुर्द, शिंदखेड तांडा येथेही दोन टँकर व खाजगी विहिरींचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा सुरू असल्याचे सांगण्यात आले.
काही गावांमध्ये मेपासून तर काही गावांमध्ये जून व जुलै महिन्यापासून टँकर सुरू करण्यात आले आहेत.
बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. पाऊस नसल्याने पेरणीची कामे खोळंबली आहेत. तर पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. पाणीपुरवठा करणारे जलाशय, तलाव कोरडे पडले आहेत. काही विहिरींची पाणीपातळीही कमी झाल्याने ग्रामीण भागात दुष्काळाचे ढग दाटून आल्याचे चित्र दिसून येत आहे. (प्रतिनिधी)
आवश्यक उपाययोजना सुरू
जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक हे जिल्ह्यातील टंचाईच्या परिस्थितीवर स्वत: लक्ष ठेवून आहेत. ज्या गावांमध्ये टँकर किंवा विहिरींचे अधिग्रहण आवश्यक असेल, तेथे त्याची व्यवस्था केली जाईल, असे जिल्हाधिकारी नायक यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.
जिल्ह्यात एकूण ६४ हजार लोकांना या टंचाईचा सामना करावा लागत असून गेल्या दोन महिन्यांमध्ये टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरच्या ७७ फेऱ्या झालेल्या आहेत. या गावांमधील ८० टक्के टंचाई दूर करण्यात आल्याचा दावा प्रशासनातर्फे केला जात आहे. ग्रामीण भागात १५ शासकीय तर १८ खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
जालना तालुक्यात ४५, बदनापूर २३, भोकरदन ७, जाफराबाद १, अंबड २२ व घनसावंगी तालुक्यात ३ खाजगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. या विहिरींमधील पाणी उपसा करून त्याद्वारे गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. येत्या आठवडाभरात समाधानकारक पाऊस न झाल्यास अधिग्रहण करण्यासाठी विहिरींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही

Web Title: 33 villages tanker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.