मानवरहित रेल्वे क्रॉसिंग धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 00:30 IST2017-12-04T00:29:29+5:302017-12-04T00:30:17+5:30
दळणवळणाची अनेक साधने आहेत. असे असले तरी प्रवास करण्यासाठी रेल्वेला प्रथम प्राधान्य देण्यात येते.

मानवरहित रेल्वे क्रॉसिंग धोकादायक
रवी जवळे ।
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : दळणवळणाची अनेक साधने आहेत. असे असले तरी प्रवास करण्यासाठी रेल्वेला प्रथम प्राधान्य देण्यात येते. मात्र रेल्वे फाटक बंद असतानाही वाहनधारकांची बंद फाटकातून धोकादायक वाहतूक सुरू आहे. चंद्रपुरातील बाबुपेठ रेल्वे फाटक असो की जिल्ह्यातील इतर फाटक, केवळ दुर्लक्षामुळेच यात अनेकांचे बळी गेले आहेत. यावर प्रभावी उपाययोना करण्याची गरज आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात पोंभूर्णा, गोंडपिपरी, जिवती व सावली तालुका सोडला तर सर्वच ठिकाणी रेल्वेचे जाळे पसरले आहे. अनेक ठिकाणी रेल्वे फाटक लावले आहेत. तर काही रेल्वे क्रॉसिंग मानवरहित आहेत. चंद्रपुरात बाबुपेठ रेल्वे फाटक अलिकडे असेच धोकादायक झाले आहे. एकाच ठिकाणी एक्स्प्रेस व बीएनआर रेल्वे लाईनचे दोन फाटक आहेत. दिवसातून अनेकदा हे फाटक बंद राहत असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. या त्रासातूनच अनेक वाहनधारक फाटक बंद असतानाही लोखंडी रॉडखालून आपली दुचाकी वाहने काढून पुढे जातात. एका वाहनधारकाने हा प्रकार केला की लगेच दुसरा करतो, मग तिसरा, चौथा, अगदी भरधाव रेल्वे जवळ येईपर्यंत हा प्रकार सुरूच असतो. या धोकादायक प्रकार बाबुपेठमध्ये अनेकदा अंगलट आला आहे. तरीही हा प्रकार थांबलेला नाही.
वरोरा तालुक्यात चैन्नई- नवीदिल्ली रेल्वे मार्ग जातो. ही रेल्वे लाईन रेल्वे गाड्यांच्या अवागमनाने नेहमी व्यस्त असते. या रेल्वे लाईनवर मोहबाळा, डोंगरगाव (रे.), नागरी या गावाजवळ रेल्वे गेट आहे. गेट बंद असताना येथून नागरिक जाणेयेणे करतात. मूल, सिंदेवाही, राजोली, मारडा, कोंढा, ताडाळी, राजुरा, नागभीड, भद्रावती या तालुक्यातही बंद रेल्वे फाटकातून वाहनांची वाहतूक सुरू राहते.
उंच असलेले ट्रक व क्षमतेपेक्षा अधिक भार वाहणारे ट्रक रेल्वे लाईनमध्ये अडून धोका होण्याची शक्यता मोहबाळा रेल्वे गेटवर अधिक आहे. या गेटमधून औद्योगिक वसाहतीमधील उद्योगात ट्रक जात असतात.
नागभीड तालुक्यातील अनेक रेल्वे क्रॉसिंगवर भूमिगत बोगदे तयार केले आहेत. त्यामुळे रेल्वे रुळावरून नागरिकांचे जाणेयेणे कमी झाले आहे. भद्रावती, वरोरा व चंद्रपूर तालुक्यातही अनेक ठिकाणी मानवरहित रेल्वे क्रासींग आहेत.
भद्रावती तालुक्यात तेलवासा, चारगाव, कुनाडा येथे रेल्वे फाटक आहे. फाटक बंद असतानाही पायदळ नागरिक तिथून जातात. एनटीपीसीसमोरही रेल्वे फाटक आहे. विशेष म्हणजे, या मार्गावरून आयुधनिर्माणीतील स्फोटके भरून वाहने जातात. मात्र या ठिकाणी कोणतीही चौकी नाही वा कोणताही कर्मचारी राहत नाही.
उपस्थित कर्मचाऱ्यांना देणेघेणे नाही
चंद्रपुरातील बाबुपेठ फाटक असो की जिल्ह्यातील कुठलाही रेल्वे फाटक असो. तिथे २४ तास कर्मचारी तैनात असणे आवश्यक आहे. मात्र या कर्मचाºयाच्या डोळ्यादेखत बंद फाटकातून वाहनधारक धोकादायक क्रासींग करतात. मात्र कर्मचाºयांकडून त्यांना साधे हटकलेही जात नाही. जणू त्यांना त्याचे काही देणेघेणेच नसावे.
दरवाजाचे फाटक होऊ शकतो उपाय
साधारणत: लोखंडी रॉड खाली पाडून फाटक बंद केले जाते. त्यामुळे या रॉडखालून वाहनधारक आपल्या गाड्या काढण्याचे अनाठायी धाडस करतात. याऐवजी अशा रेल्वे क्रासींगवर दोन दरवाजाचे गेट बसविले तर तिथून वाहन काढणे वाहनधारकांना शक्य होणार नाही .