चंद्रपूरच्या ‘भारतमाता’ शब्दाची ‘गिनीज’मध्ये नोंद

By राजेश मडावी | Published: March 2, 2024 06:54 PM2024-03-02T18:54:36+5:302024-03-02T18:57:23+5:30

चंद्रपूर येथे वनविभागाच्या वतीने १ ते ३ मार्च कालावधीत ‘ताडोबा महोत्सव’ सुरू आहे.

The word 'Bharatmata' of Chandrapur is recorded in Guinness | चंद्रपूरच्या ‘भारतमाता’ शब्दाची ‘गिनीज’मध्ये नोंद

चंद्रपूरच्या ‘भारतमाता’ शब्दाची ‘गिनीज’मध्ये नोंद

चंद्रपूर : राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात २६ प्रजातींच्या हिरव्याकंच ६५ हजार ७२४ रोपट्यांपासून ‘भारतमाता’ शब्दांची निर्मिती करून वनविभागाने ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नाव नोंदविण्याचा विक्रम शनिवारी (दि. २) राज्याच्या वन विभागाने प्रस्थापित केला आहे.

चंद्रपूर येथे वनविभागाच्या वतीने १ ते ३ मार्च कालावधीत ‘ताडोबा महोत्सव’ सुरू आहे. या महोत्सवांतर्गत विविध प्रजातींच्या रोपट्यांपासून ‘भारतमाता’ हा शब्द लिहून वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा संकल्प वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला होता. हा संकल्प शनिवारी चंद्रपुरातील रामबाग येथे प्रत्यक्षात साकारण्यात आला. २६ प्रजातींच्या ६५ हजार ७२४ रोपट्यांनी ‘भारतमाता’ या शब्दाची निर्मिती केली आणि ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’चे प्रमाणपत्र प्राप्त केले. कार्यक्रमाला वनविभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसरंक्षक (वन्यजीव) तथा वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मिक) शोमिता विश्वास, महिप गुप्ता, ताडोबाचे क्षेत्रीय संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड टीमचे स्वप्निल डांगरीकर, वनअधिकारी प्रशांत खाडे, मिलिंद वेर्लेकर, आदी उपस्थित होते.

रोपट्यांचे उद्यान तयार होणार

ग्रीन भारतमातेच्या शब्दातील सर्व रोपट्यांचे चंद्रपूर येथे ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ या नावाने वनविभागाने एक चांगले उद्यान साकारावे. प्राप्त झालेले प्रमाणपत्र दर्शनी भागात लावावे, अशा सूचना दिल्या. राज्याचा वनविभाग असाच अग्रेसर राहणार असून, या विभागाच्या प्रगतीत कोणतीही अडचण येऊ देणार नाही, अशी ग्वाही वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपक्रमाप्रसंगी दिली.

महाराष्ट्र वन विभागाने आतापर्यंत चार ‘लिम्का रेकॉर्ड’वर मोहोर उमटवली. आता प्रथमच वनविभागाने ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ केले आहे. यासाठी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अधिकारी व कर्मचारी अभिनंदनास पात्र आहेत. चंद्रपुरात ६५ हजार ७२४ रोपट्यांनी लिहिलेल्या ‘ग्रीन भारतमातेचा’ संकल्प जगात पोहोचला. ही एक फोटो फ्रेम नसून प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचा महामार्ग आहे.

-सुधीर मुनगंटीवार, वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री, चंद्रपूर

Web Title: The word 'Bharatmata' of Chandrapur is recorded in Guinness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.