शासकीय दूध डेअरी पूर्ण क्षमतेने चालावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 11:14 PM2018-03-26T23:14:47+5:302018-03-26T23:14:47+5:30
येथील शासकीय दूग्धशाळा अद्ययावत सोयी-सुविधांनी युक्त असताना दुग्धशाळेद्वारा दुग्धोत्पादन क्षमतेपेक्षा अत्यंत कमी होत आहे. त्यामुळे उपलब्ध साधनांचा योग्य वापर करून हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवावा, असे निर्देश केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले. दुग्धशाळेला भेट देवून आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : येथील शासकीय दूग्धशाळा अद्ययावत सोयी-सुविधांनी युक्त असताना दुग्धशाळेद्वारा दुग्धोत्पादन क्षमतेपेक्षा अत्यंत कमी होत आहे. त्यामुळे उपलब्ध साधनांचा योग्य वापर करून हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवावा, असे निर्देश केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले. दुग्धशाळेला भेट देवून आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते.
ना. अहीर यांनी शितकरण केंद्र आणि युनिटची पाहणी करून महत्त्वाच्या सुचना केल्या. दुग्धशाळेच्या माध्यमातून दुग्धोत्पादन क्षमतेची माहितीही जाणून घेतली. चंद्रपुरातील दुग्धशाळेची क्षमता ५० हजार लिटरची असताना केवळ ५ ते ७ हजार लिटर उत्पादन होत आहे. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही दुग्धशाळा अधिकाधिक लोकाभिमुख कशी करता येईल. दुग्धशाळेतील दुधाचे उत्पादन अधिकाधीक ग्राहकांपर्यंत कसे पोहोचेल, याबाबत आग्रही राहून तसे प्रयत्न करावे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. ना. अहीर म्हणाले, दुग्धशाळेतील दुग्धोत्पादन पूर्ण क्षमतेने होण्याकरिता शासन स्तरावरून विशेष पुढाकार घेण्यात आला आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांचेशी चर्चा केली आहे. जिल्ह्याच्या दूध उत्पादन वाढीसाठी मदत करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
दुधाची आवश्यकता आणि जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या दुधाची आवक लक्षात घेता, या क्षेत्राला चालना देण्याची गरज आहे. दुधाचे उत्पादन कमी होत असल्याने स्थानिक उत्पादीत दुध संकलन केंद्रांची संख्या अल्प आहे. मात्र, उत्पादन वाढल्यास केंद्रांची संख्या वाढविण्यात येईल. प्रतीदिन किमान एक हजार लिटर दूध संकलन होईल, अशा प्रकारचे नियोजन शासकीय दुध डेअरीच्या माध्यमातून करावी, असेही ना. अहीर यावेळी म्हणाले.
केंद्रातील प्रतिनियुक्तीवरील कर्मचाऱ्यांना परत बोलाविणे, विक्री केंद्रात वाढ करण्यासाठी पाच सेंटरची स्थापना करणे आणि प्रलंबित अन्य प्रश्नांवरही ना. अहीर यांनी जिल्हा दुग्धविकास अधिकारी ज्ञानेश ढोके व व अन्य अधिकाºयांशी चर्चा केली. यावेळी विजय राऊत, खुशाल बोंडे, राजेश मून, राजू घरोटे अॅड. प्रशांत घरोटे तसेच दुग्ध विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.