अवनी वाघिणीनंतर आता वाघाची दहशत; चंद्रपूर जिल्ह्यात महिलेचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 10:11 IST2018-11-10T10:10:05+5:302018-11-10T10:11:22+5:30
यवतमाळ जिल्ह्यातील अवनी या वाघिणीच्या मृत्यूबाबत उलटसुलट चर्चा गरम असतानाच चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात एक महिला ठार झाल्याची घटना घडली आहे.

अवनी वाघिणीनंतर आता वाघाची दहशत; चंद्रपूर जिल्ह्यात महिलेचा बळी
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: यवतमाळ जिल्ह्यातील अवनी या वाघिणीच्या मृत्यूबाबत उलटसुलट चर्चा गरम असतानाच चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात एक महिला ठार झाल्याची घटना घडली आहे. सावली तालुक्यातील पेंढरा मक्ता येथील सखुबाई कस्तुरे (५५) ही महिला वाघाच्या हल्ल्याला बळी पडली आहे. शुक्रवारी ही महिला शेतात कामासाठी गेली होती. रात्री उशीरापर्यंत ती घरी न परतल्याने शनिवारी सकाळी घरच्यांनी तिचा शोध घेतला असता, तिचा मृतदेह शेतात आढळून आला. तिच्या शरीरावरील जखमांवरून वाघाने हल्ला केल्याचे स्पष्ट दिसत होते.
अवनीच्या मृत्यूनंतर गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास नुकताच टाकला होता. त्यात अशी घटना घडल्याने गावकऱ्यांमध्ये पुन्हा भयाचे वातावरण निर्माण झाले आहे व त्यांनी या वाघाच्या बंदोबस्ताची मागणी केली आहे.