२८ लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 10:25 PM2019-04-29T22:25:18+5:302019-04-29T22:25:33+5:30
येथील विवेकानंद वॉर्डात एका गोडावूनजवळ बल्लारपूर पोलिसांनी २८ लाख रूपये किंमतीचा सुगंधित तंबाखू जप्त केला. ही कारवाई सोमवारी सकाळी करण्यात आली. या कारवाईत चारचाकी वाहनही ताब्यात घेण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : येथील विवेकानंद वॉर्डात एका गोडावूनजवळ बल्लारपूर पोलिसांनी २८ लाख रूपये किंमतीचा सुगंधित तंबाखू जप्त केला. ही कारवाई सोमवारी सकाळी करण्यात आली. या कारवाईत चारचाकी वाहनही ताब्यात घेण्यात आले.
येथील विवेकानंद वार्डातील वैशाली चौकात जयसुखलाल अंजाराम ठक्कर यांचे पान मटेरीयल विक्रीचे दुकान असून त्यालाच लागून त्याच्याच मालकीचे गोडावून आहे. सोमवारी सकाळी १० वाजता एका ट्रकमधून सुगंधित तंबाखू गोडावूनमध्ये उतरवित असल्याची माहिती बल्लारपूर पोलिसांना मिळाली. यावरून लगेचच बल्लारपूरचे पोलीस निरीक्षक नवनीत कावत यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक संदीप घोळे, पोलीस उपनिरीक्षक अचल कपूर, फरताडे, सहायक फौजदार विजय मुके, राजेंद्र खनके, चंद्रकांत जीवतोडे यांनी घटनास्थळ गाठून तंबाखू आणि ट्रक (क्रमांक एच एम ४० वाय ३९६१) जप्त केला.
सोबतच गोडावूनचा मालक जयसुखलाल याला ताब्यात घेतले. जप्त केलेला तंबाखू वेगवेगळ्या नावांनी वेगवेगळ्या डब्यात पॅक केला होता. यासंदर्भात अन्न व सुरक्षा मानके कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा तंबाखू आणला कुठून, याच्या तपासाला पोलीस लागले आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून येथील पान मटेरीयल दुकान व पानठेले, यावर सुगंधित तंबाखूची विक्री सुरू आहे. या कारवाईनंतर त्यावर काहिसा वचक बसू शकतो.