रेझ्युमे लिहिताय? मग ह्या चुका करू नका.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 04:41 PM2017-08-09T16:41:02+5:302017-08-09T16:45:03+5:30

रेझ्युमे लिहितानाच पोटात गोळा येतो, आणि काहीतरी खरडायचं म्हणून आपण तो खरडतो.

writing a resume? check this.. | रेझ्युमे लिहिताय? मग ह्या चुका करू नका.

रेझ्युमे लिहिताय? मग ह्या चुका करू नका.

Next
ठळक मुद्देरेझ्युमे लिहिणं हे एक स्किल आहे, प्रॅक्टिसने ते शिकता येतं.

कुठल्याही जॉब ओरिएण्टेड ट्रेनिंग देणार्‍या व्यक्तीला जर विचारलं की चांगला जॉब मिळवण्यासाठीची पहिली पायरी कुठली, तर प्रत्येकजण एकच गोष्ट सांगेल. चांगला रेझ्युमे लिहिणं. कारण तुमचा रेझ्युमे हे तुमच्या एम्प्लोयर वर पडणारं तुमचं पाहिलं इम्प्रेशन असतं. अगदी तुमचा फॉर्मल ड्रेसिंगचा सेन्स आणि इंटरव्ह्यूच्याही आधीचं. तुमच्या रेझ्युमेकडे बघून कंपनी हे ठरवते की तुम्हाला मुळात इंटरव्ह्यूला बोलवायचं का नाही..

पण हा रेझ्युमे लिहायचा कसा हे फार कोणी सांगत नाही.  खरंतर फार लोक सांगतात आणि कन्फ्युज करतात. आणि शेवटी आपल्याला हे कळेनासं होतं की त्यात आपल्या हॉबीज लिहायच्या की नाही? शिक्षण लिहायचं त्याची सुरुवात शाळेच्या नावापासून करायची का कॉलेजपासून केली तर ती पुरेशी असते? काही वेळा ‘अदर स्किल्स‘ चा एक कॉलम असतो, त्यात नेमकं काय लिहायचं? आणि मुळात आपण जे लिहितो आहे तो बायोडाटा आहे, सी.व्ही. आहे का रेझ्युमे?

रेझ्युमे लिहितांना आपली क्रिएटीव्हिटी दाखवायची का नाही?

रेझ्युमे लिहायला घेतला की दर ओळीत या प्रश्नांना अडखळायला होतं. पण यातली सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे, की  या सगळ्या प्रश्नांची उत्तरं स्टाण्डर्ड असतात. थोड्याफार फरकाने बहुतेक सगळ्या कंपन्यांची रेझ्युमे बद्दलची अपेक्षा एकसारखीच असते. त्याचे ’डू’ज आणि डोण्ट्सही सारखेच असतात. काही बेसिक नियम लक्षात ठेवले तर रेझ्युमे लिहिणं सोपं होऊन जातं.

 

 

रेझ्युमे चे मुख्य घटक कुठले?

 

तुमचं नाव

संपर्काचे डीटेल्स

शिक्षण (यात युनिव्हर्सिटी चं नाव लिहिलं पाहिजे. आणि तुम्ही जर कुठल्या प्रसिद्ध कॉलेजमधून शिक्षण घेतलं असेल, तर त्याचंही नाव लिहायला हरकत नाही.)

शिक्षणात तुमच्या कामाशी संबंधित कुठला कोर्स तुम्ही केला असेल तर त्याचा उल्लेख जर करा.

अनुभव - यामध्ये तुम्ही खरंच जो अनुभव घेतला आहे तेवढाच लिहा.

सगळ्यात आधी तुम्ही ज्या जॉब साठी अप्लाय करताय त्याच्याशी संबंधित अनुभव लिहा. त्यातही लेटेस्ट अनुभव सगळ्यात आधी आणि मग उतरत्या क्रमाने जुने अनुभव लिहा.

त्यानंतर तुम्ही केलेल्या इतर क्षेत्रतल्या कामाबद्दल थोडक्यात लिहा. यातून तुम्हाला इतर कुठल्या क्षेत्राच एक्स्पोजर आहे ते कंपनीच्या लक्षात येतं.

त्यानंतर तुम्ही केलेले सुट्टीतले जॉब्ज, व्हॉलण्टेअर म्हणून केलेलं काम याबद्दल थोडक्यात लिहा.

त्यानंतर तुम्हाला मिळालेले पुरस्कार, बक्षिस हे लिहा.

त्यानंतर अदर अचीव्हमेंट्स बद्दल लिहा. मात्र यात केवळ समोरच्या कंपनीशी आणि तुमच्या जॉबशी संबंधित आणि महत्वाच्या गोष्टी लिहा. (अगदी गणेसोत्सवातली बक्षिस नकोत.)

सगळ्यात शेवटी रिलेटेड स्किल्स बद्दल लिहा. ही जागा म्हणजे तुमच्याकडे असलेली सॉफ्ट स्किल्स दाखवण्याची जागा असते. यात तुमच्याकडे असलेली नेमकी कौशल्य लिहा. ‘मॅनेजमेण्ट स्किल्स’ इतकं व्यापक काहीतरी लिहून काही उपयोग होत नाही. पण तुमच्याकडे असलेलं संवाद साधण्याचं कौशल्य, एखादी संकल्पना चित्रातून मांडण्याची कला, प्रेझेन्टेशन्स बनवण्यासाठी तुम्हाला कुठली सॉफ्टवेअर्स येत असतील तर ती या गोष्टी जर लिहा.

‘डू’ज

रेझ्युमे लिहितांना या गोष्टी जर करा.

 

सगळा रेझ्युमे साधा, फॉर्मल फॉण्ट्स (टाइम्स न्यू रोमन, एरियल अशा) मध्ये लिहिलेला, स्वच्छ पांढर्‍या, जमल्यास एक्झिक्युटीव्ह पेपरवर प्रिण्ट केलेला असला पाहिजे.

रेझ्युमे इमेल करणार असाल तर त्याची मार्जिन्स प्रिंटेबल एरियाचा विचार कन सेट करा. हे मार्जिन्स शक्यतो 1 इंच ठेवा.

नवीन सेक्शनच नाव बोल्ड, इटालिक किंवा अंडरलाईन करा. म्हणजे शिक्षण संपून अनुभव कुठे सुरु झाला ते वाचणार्‍याला सहज कळेल.

नवीन मुद्द्यासाठी बुलेट पॉइण्ट्स वापरा.

टेक्स्ट चा साईझ 11 पॉइण्ट साईझ पेक्षा कमी ठेऊ नका.

तुम्ही जर कॉलेजमधून आत्ताच बाहेर पडलेले असाल तर तुमचा रेझ्युमे एक पानात संपला पाहिजे. आणि तो जास्तीत जास्त दोन पानंच असला पाहिजे.

रेझ्युमे पाठवण्यापूर्वी त्यातल्या स्पेलिंग आणि ग्रामरच्या चुका तपासा. भाषा आणि शुद्धलेखन चांगलं असणार्‍या ओळखीच्या व्यक्तीकडून ते तपासून घ्या.

रेझ्युमे थोडक्यात आणि मुद्देसूद लिहा.

डोण्ट्स-हे करू नका.

 

न केलेल्या गोष्टी रेझ्युमे मध्ये लिहू नका.

ज्या गोष्टींचं तुम्ही प्रमाणपत्र दाखवू शकता अशाच गोष्टी लिहा, खोट्या गोष्टी लिहू नका.

रेझ्युमे कधीही रंगीत नोटपेपरवर किंवा कार्टूनसारख्या दिसणार्‍या फॉण्ट्स मध्ये लिहू नका.

तुमचे छंद, आवडीनिवडी रेझ्युमे मध्ये लिहू नका.

तेच तेच शब्द वापरायचं टाळा. एकाच बायोडाटा मध्ये दहा वेळा ’साध्य केलं’ असं लिहू नका. त्याच्या जागी वेगळे शब्द, वेगळी वाक्यरचना करा.

तुमचं लग्न झालेलं आहे का, तुम्ही कुठल्या क्लबचे सदस्य आहात ही माहिती लिहू नका.

बायोडाटा, सी.व्ही. आणि रेझ्युमे यात काय फरक?

 

बायोडाटा मध्ये अगदी प्राथमिक माहिती असते. आणि बायोडाटा हा शब्द आता ओल्ड फेशंड समजला जातो.

 

रेझ्युमे हा फ्रेंच शब्द आहे आणि त्याचा शब्दश अर्थ आहे ’समरी’. त्यामुळे रेझ्युमे म्हणजे तुमच्याबद्दलची संबंधित माहिती थोडक्यात लिहिणं. यामध्ये प्रत्येक कामाचे, अनुभवाचे डीटेल्स लिहायचे नसतात, तर कुठल्या क्षेत्रातला किती अनुभव आहे हे लक्षात येण्यापुरतेच डीटेल्स लिहायचे असतात.रेझ्युमे भर हा त्या डीटेल्स वर नसतो तर यामध्ये त्या अनुभवातून किंवा शिक्षणातुन मिळालेल्या कौशल्यांवर असतो. त्यामुळेच आजकाल कंपन्यांमध्ये रेझ्युमे मागितलेला असतो. कारण कंपनीला तुमच्याकडे किती अनुभव आहे यापेक्षा तुमच्याकडे किती कौशल्य आहेत यामध्ये जास्त रस असतो.

 

सी. व्ही. हा लॅटिन शब्द आहे. त्याचा शब्दश अर्थ आहे ’कोर्स ऑफ लाइफ’. त्यामुळेच सी.व्ही. हा रेस्युमे पेक्षा जास्त डिटेल्ड असतो. त्यात तुम्ही घेतलेलं शिक्षण, अनुभव आणि त्यातून मिळालेली कौशल्य हे सगळं विस्ताराने लिहिलेलं असतं. रेझ्युमे फार तर 2 पानांचा असतो, मात्र सी. व्ही. 2-3 किंवा त्याहूनही जास्त मोठा असू शकतो.

Web Title: writing a resume? check this..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.