पीडित बालिकेचे फोटो व्हायरल; अॅडमिनसह एकावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 03:37 PM2020-08-10T15:37:05+5:302020-08-10T15:37:30+5:30
दोन्ही आरोपींवर पॉस्को तसेच आयटी कायद्यांतर्गत विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत
नांदुरा : शहरातील अत्याचार पिडित चिमुकलीचे फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर प्रसारित केल्याने त्याविरूद्ध दाखल तक्रारीनुसार नांदुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पीडित बालिकेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार संग्रामपूर तालुक्यातील निवाणा येथील सोपान सोळुंके व बुलडाणा येथील राजेश टारपे यांनी २९ आॅगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता भेटीचे फोटो काढले. तसेच व्हाटसअॅप ग्रुप आरक्षण बचाव कृती समितीवर संबंधित मुलीचे नाव, फोटो प्रसिद्ध केले. अत्याचार झालेल्या पिडितेबाबतची माहिती कुठल्याही वर्तमानपत्र, प्रसारमाधम्ये, तसेच समाजमाध्यमांमध्ये प्रसारित करण्यास सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. तरीही आरोपीने फिर्यादीच्या पीडित मुलीसोबत नकळत फोटो मोबाईल मध्ये घेतले. ते फोटो मोबाईलवरून आरक्षण बचाव कृती समिती या व्हाट्सअॅप ग्रुपवर व्हायरल केले. त्यामुळे पीडित मुलगी व फिर्यादीच्या परिवाराची बदनामी झाली. तसेच व्हाट्सअप ग्रुपवर प्रसारित झालेल्या या बाबीची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक असताना ग्रुप अॅडमीनने तसे केले नाही, त्यामुळे दोन्ही आरोपींवर पॉस्को तसेच आयटी कायद्यांतर्गत विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास ठाणेदार अनिल पाटील करीत आहेत.