नांदुरा अर्बन बँकेचा कर्मचारी क्रिकेट सट्ट्यात हरला साडेपाच कोटी

By सदानंद सिरसाट | Published: March 29, 2024 07:50 PM2024-03-29T19:50:19+5:302024-03-29T19:50:31+5:30

आरोपीवर विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले आहेत.

Nandura Urban Bank employee lost five and a half crores in cricket betting | नांदुरा अर्बन बँकेचा कर्मचारी क्रिकेट सट्ट्यात हरला साडेपाच कोटी

नांदुरा अर्बन बँकेचा कर्मचारी क्रिकेट सट्ट्यात हरला साडेपाच कोटी

नांदुरा (बुलढाणा) : नांदुरा अर्बन बँकेतून कर्मचारी प्रतीक गजानन शर्मा याने साडेपाच कोटी रुपयांपेक्षाही अधिक रक्कम क्रिकेट सट्ट्यावर लावत ती हरल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी तक्रारीवरून नांदुरा पोलिसांनी आरोपीवर विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले आहेत.

दी नांदुरा अर्बन को ऑप. बँकेच्या वतीने राजेन्द्रप्रसाद रामकेवल पांडे यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यामध्ये आरोपी २०१८ पासून बँकेत कायमस्वरूपी कर्मचारी आहे. कनिष्ठ संगणक अधिकारी म्हणून बँकेने जबाबदारीचे कामकाज सोपविले होते. १४ ऑगस्ट २०२३ ते २६ मार्च २०२४ पर्यंत त्याने पदाचा, तसेच गोपनीय माहितीचा दुरुपयोग करणे, तसेच बँकेतील इतर कर्मच्याऱ्यांशी संगनमत करून बँकेची आर्थिक फसवणूक केल्याचे म्हटले. कोणतीही पूर्वपरवानगी न घेता बँकेच्या एचडीएफसी बँकेतील खात्यामधून अंदाजे पाच कोटी पंचेचाळीस लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेची अफरातफर केल्याचेही नमूद केले.

याप्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम ४२०, ४०६, ४०९, ४६७, ४६८, १२० ब, सहकलम आय टी ॲक्ट ६६ ब, क, ड नुसार गुन्हे दाखल केले. पुढील तपास ठाणेदार विलास पाटील करीत आहेत. ठेवीदारांचा पैसा सुरक्षित असून त्याला कोणताही धक्का लागलेला नाही. एनपीए शून्य असून बँक नफ्यात आहे. ठेवीदारांनी काळजी करू नये, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष चंपालाल झंवर, उपाध्यक्ष दत्तात्रय सुपे व कार्यकारी संचालक राजेंद्रप्रसाद पांडे यांनी केले.

कर्मचाऱ्याला क्रिकेट सट्ट्याचा नाद
आरोपी शर्मा याला क्रिकेट सट्टा खेळण्याचा नाद आहे. त्यातच साडेपाच कोटी रुपये हरल्याची नांदुरा शहरात चर्चा आहे. ती रक्कम त्याने सट्टेबाजांच्या खात्यात वर्ग केल्याची प्राथमिक माहिती आहे. नांदुरा शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात क्रिकेटचा सट्टा सुरू असूनही पोलिस त्यापासून अनभिज्ञ आहेत.

Web Title: Nandura Urban Bank employee lost five and a half crores in cricket betting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.