गटशेती व यंत्र बँकेच्या संकल्पनेतून शेतक-यांच्या उन्नतीचा मार्ग प्रशस्त - भाऊसाहेब फुंडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 12:55 AM2018-02-17T00:55:23+5:302018-02-17T00:55:49+5:30

शेतक-यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा, यासाठी कृषी महोत्सवाचे आयोजन प्रत्येक जिल्ह्यात होत आहे. त्यामधूनच शेतकरी नवी उमेद घेतील व उन्नतीचा मार्ग साधतील, असा आशावाद कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी व्यक्त केला. खामगाव येथे आयोजित कृषी महोत्सवाच्या पूर्वसंध्येला त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.

group farming and banking concept progressive for to the farmer - Bhausaheb Phundkar | गटशेती व यंत्र बँकेच्या संकल्पनेतून शेतक-यांच्या उन्नतीचा मार्ग प्रशस्त - भाऊसाहेब फुंडकर

गटशेती व यंत्र बँकेच्या संकल्पनेतून शेतक-यांच्या उन्नतीचा मार्ग प्रशस्त - भाऊसाहेब फुंडकर

googlenewsNext
ठळक मुद्दे कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांचा आशावाद

राजेश शेगोकार
खामगाव : ‘उन्नत शेती व समृद्ध शेतकरी’ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने शेती विकासाचे धोरण आखले आहे. त्या अनुषंगानेच नवनवीन तंत्रज्ञान, बी-बियाणे, यांत्रिकीकरण अशा मुद्यांवर भर दिला जात आहे. यासोबतच पारंपरिक शेतीचा बाज कायम ठेवून त्याला आधुनिकतेची जोड देण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे. त्यामध्ये गटशेती, शेतीचे यांत्रिकीकरण व गटशेतीला मिळणा-या अनुदानातून शेती यंत्रांची बँक निर्माण करण्याची संकल्पना कृषी विभागाची आहे. या संकल्पनेला अधिक चालना मिळावी, शेतक-यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा, यासाठी कृषी महोत्सवाचे आयोजन प्रत्येक जिल्ह्यात होत आहे. त्यामधूनच शेतकरी नवी उमेद घेतील व उन्नतीचा मार्ग साधतील, असा आशावाद कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी व्यक्त केला. खामगाव येथे आयोजित कृषी महोत्सवाच्या पूर्वसंध्येला त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.

प्रश्न : यंत्र बँक ही संकल्पना अधिक स्पष्ट कराल का?
उत्तर :
हो.. यंत्रांची बँक अर्थात यंत्र बँक ही संकल्पना कृषी विभागाने हाती घेतली आहे. गटशेतीच्या माध्यमातून जे शेतकरी एकत्र येतील अशा शेतक-यांना यांत्रिकीकरणासाठी जे १ कोटी रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. त्या अनुदानातून ट्रॅक्टर, रोटावेटर, थ्रेशर, कल्टीवेटर अशाप्रकारच्या यंत्रांची खरेदी केली जाईल व या शेतकºयांकडे असलेले यंत्र इतर शेतकºयांना त्यांची गरज भागविण्यासाठी माफक दरात उपलब्ध करून दिले जातील. त्यामुळे इतर शेतकºयांना उत्पादन खर्च बचत करता येईल.

प्रश्न : गटशेतीमध्ये काय अभिप्रेत आहे ?
उत्तर :
बेभरवशाच्या पावसामुळे शेती अडचणीत येत आहे. शेतीचा उत्पादन खर्च वाढत आहे. तो कमी करायचा असेल तर गट शेती हा उत्तम पर्याय आहे. अशा या गटशेतीला चालना देण्याचे काम कृषी विभागाने सुरू केले आहे. किमान २० शेतक-यांनी एकत्र येऊन १०० एकर जमीन एकत्ररीत्या कसली तर अशा गटशेतीला तब्बल १ कोटी रुपयांचे अनुदान यांत्रिकीकरणासाठी देण्याची भूमिका शासनाने घेतली आहे. राज्यभरात असे ४०० गट निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. शेती बदलत आहे, हे आपण आता स्वीकारले पाहिजे. आपल्या परिसरातही अशा गटशेतीचा प्रयोग शेतक-यांनी राबविण्याकरिता पुढाकार घेण्यासाठी अशा महोत्सवातून जनजागृती केली जाणार आहे.

प्रश्न : ‘बदलती शेती’ या संकल्पनेमध्ये आपणास काय अभिप्रेत आहे ?
उत्तर :
जल व्यवस्थापन व गटशेती यावर सर्वाधिक भर देत आहोत. आपल्या परिसरात अपुरा व अनियमित पाऊस हे आपले प्राक्तन ठरले आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रात पाण्याचे नियोजन आधी केले जाते. तेथील शेतकरी ठिबक सिंचनावर भर देत आहे. त्यामुळे जमिनीचा पोत खराब होत नाही व कमी पाण्यात अधिक पीक घेता येते. सोबतच आता कृषी प्रक्रिया उद्योगांनाच अधिक चालना देण्याची गरज आहे. अशा उद्योगांसाठी कृषी विभागाकडून अनुदान देण्याचेही धोरण सरकारने हाती घेतले आहे.

प्रश्न : कृषी महोत्सवातून शेतकºयांचा फायदा होतो का?
उत्तर :
हमखास फायदा होतो. या महोत्सवामध्ये राज्याच्या विविध भागात शेतीमध्ये होणा-या नवनवीन प्रयोगांची माहिती शेतकºयांपर्यंत पोहचते. प्रत्येक शेतकरी हा अशा प्रयोगांना प्रत्यक्ष पाहण्यासाठी जाऊ शकत नाही. त्यामुळे या प्रयोगांची माहिती व्हावी, त्यासंदर्भात असणा-या शंकांचे निरसन व्हावे आणि अशा प्रयोगांची फलश्रुती प्रगतीशील शेतक-यांच्या तोंडूनच अनुभवाचे बोल रूपात अशा महोत्सवामधून ऐकायला मिळते. यामधून शेतक-यांना नवीन उमेद, नवी पे्ररणा निश्चित मिळते. त्यामुळेच असे महोत्सव फायदेशीर ठरतात. म्हणूनच आमच्या कृषी विभागाने प्रत्येक जिल्ह्यात हे महोत्सव आयोजित केले आहेत.

प्रश्न : खामगावातील कृषी महोत्सवात कोणत्या बाबींवर भर दिला आहे ?
उत्तर :
‘बदलती शेती’ ही संकल्पना आता शेतकºयांपर्यंत पोहचवली पाहिजे. परंपरागत शेतीमध्ये मिळणारे उत्पन्न हे उत्पादन खर्चही भरून काढू शकत नाही. त्यामुळे शेतीला आधुनिकतेची जोड देण्याची गरज आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून शेतीचे यांत्रिकीकरण व पाणी व्यवस्थापन हे प्रामुख्याने बिंबवले जाणार आहे. कोरडवाहू शेतीच्या आपल्या या परिसरात आता नव्या युगाची शेती करण्याची वेळ आली आहे.

प्रश्न : सध्याच्या बिकट परिस्थितीत कृषी महोत्सवांवर खर्च करणे संयुक्तिक वाटते का ?
उत्तर :
हा खर्च वायफळ नाही हे आधी लक्षात घ्या, कृषी महोत्सवासाठी प्रत्येक जिल्ह्याकरिता शासनाने २० लाखांच्या निधीची तरतूद आधीच करून ठेवली आहे. यासाठी जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित केली आहे. तसेच महोत्सवासाठी शेती यंत्र निर्माण करणाºया कंपन्या, बी-बियाणे उत्पादक कंपन्या, कृषी विद्यापीठे, प्रगतशील शेतकरी हे स्वत:हून त्यांच्या उत्पादनाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी अशा महोत्सवात सहभाग घेतात. सोबतच बचत गटांनाही या महोत्सवासोबत जोडल्या जाते. त्यामुळे शेतीचे ज्ञान, तंत्रज्ञानाची ओळख व कृषी प्रक्रिया उद्योगांसोबतच बचत गटांनी निर्मित केलेल्या वस्तूंची माहिती शेतकºयांना एकाच ठिकाणी होते. त्यामुळे हे महोत्सव खर्चीक नाहीत तर ती गरज आहे. शेती व शेतक-यांवर नैसर्गिक संकटे येतात अशा संकटांना सामोरे जाण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाची कास धरण्याची गरज आहे व या तंत्रज्ञानाची माहिती अशा महोत्सवातूनच मिळते.

Web Title: group farming and banking concept progressive for to the farmer - Bhausaheb Phundkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.