फायरब्रँड कामगार नेता

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 02:47 AM2019-01-30T02:47:50+5:302019-01-30T02:48:53+5:30

वयाच्या १९व्या वर्षी ते कामगारांचे नेते झाले. रात्री १२ ते पहाटे ४ या वेळेत हॉटेल कामगारांचे संघटन केले. त्यानंतर टॅक्सी व मग रेल्वे. त्यांच्या कर्तृत्वाला आकाशही ठेंगणे वाटू लागले.

Firebrand workers leader | फायरब्रँड कामगार नेता

फायरब्रँड कामगार नेता

Next

- कुमार सप्तर्षी

जॉर्जचा एकदा फोन आला. कुमार, पुण्यात येतो आहे, तीन महत्त्वाची कामे करायची आहेत. त्याची तीन महत्त्वाची कामे काय होती, तर त्याला कटिंग करायची होती, दात दुखत होता तो काढून घ्यायचा होता व माझ्या घरी भाकरी, पालेभाजी हे जेवण करायचे होते. इतका साधा होता जॉर्ज!

त्यांचा हा साधेपणाच अनेकांना आकर्षित करत असे. मी त्यांच्याबरोबर बिहारमध्ये काम केले आहे. आमची अनेक वर्षांची ओळख होती. तत्त्वांना ते पक्के होते व मीही. त्यातूनच आम्ही जवळ आलो. स. का. पाटील यांना त्यांनी मुंबईत हरवले होते. जायंट किलर अशी प्रतिमा तयार झाली होती, पण त्याचा कधीही त्यांनी गर्व केला नाही.

ते एक विलक्षण व्यक्तिमत्त्व होते. वयाच्या १९व्या वर्षी ते कामगारांचे नेते झाले. रात्री १२ ते पहाटे ४ या वेळेत हॉटेल कामगारांचे संघटन केले. त्यानंतर टॅक्सी व मग रेल्वे. त्यांच्या कर्तृत्वाला आकाशही ठेंगणे वाटू लागले. कन्नड, मराठी, इंग्रजी व बायको बंगाली असल्यामुळे बंगाली इतक्या भाषा त्यांना यायच्या. मी त्यांच्याबरोबर दौऱ्यावर जायचो त्या वेळी पाहयचो, समोर ज्या भाषेतील व्यक्ती यायची त्याच्याबरोबर जॉर्ज त्याच्याच भाषेत बोलायचे. यामुळे कामगारांना त्यांच्याविषयी कायम प्रेम वाटत असे.

आधी त्यांनी देशभर संचार केला. कामगारांची नस जाणून घेतली. त्यानंतरच ते राष्ट्रीय कामगार नेता झाले. आणीबाणीच्या विरोधात त्यांचे काम फार मोठे आहे. मला त्यांनी सत्याग्रह किंवा मनुष्यहानी न करणारे बॉम्बस्फोट असे दोन पर्याय दिले होते. मी सत्याग्रह निवडला व ते
भूमिगत झाले. आणीबाणीच्या विरोधात देशभरात वातावरण निर्माण करण्यात त्यांचाही फार मोठा वाटा होता. गेली काही वर्षे स्मृतिभ्रंश झाल्यामुळे ते राजकीय, सार्वजनिक जीवनातून बाजूलाच गेले होते. आता शरीरानेही ते गेले. या विलक्षण व्यक्तिमत्त्वाला माझी श्रद्धांजली.

(लेखक ज्येष्ठ समाजवादी विचारवंत आहेत)

Web Title: Firebrand workers leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.