सोशल मीडियाला आवर कोण घालणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 04:37 PM2018-05-18T16:37:29+5:302018-05-18T16:37:29+5:30

इमोजी नावाचा एक प्रकार आहे. शब्दांपलीकडच्या भावना व्यक्त करण्यासाठी या व्हॉटस्अ‍ॅप इमोजीचा वापर केला जातो. अलीकडे या इमोजीची डोकेदुखी एवढी वाढली आहे की राज्य महिला आयोगालाही त्याची दखल घेणे भाग पडले.

Who will control social media? | सोशल मीडियाला आवर कोण घालणार?

सोशल मीडियाला आवर कोण घालणार?

Next


सविता देव हरकरे
नागपूर:
इमोजी नावाचा एक प्रकार आहे. शब्दांपलीकडच्या भावना व्यक्त करण्यासाठी या व्हॉटस्अ‍ॅप इमोजीचा वापर केला जातो. अलीकडे या इमोजीची डोकेदुखी एवढी वाढली आहे की राज्य महिला आयोगालाही त्याची दखल घेणे भाग पडले. भलताच अर्थ ध्वनित करणाऱ्या इमोजी सतत पाठविणाऱ्यांविरुद्ध आयोगाकडे असंख्य तक्रारी आल्या आहेत. मुलींचे मोबाईल क्रमांक मिळवायचे, त्यांना कोणत्याही वेळी व्हाटस्अ‍ॅपवर त्रास द्यायचा, अश्लील संदेश पाठवायचे, शेरोशायऱ्या पाठवायच्या असले प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. विशेष म्हणजे पोलिसात तक्रार दाखल करून पुढील सोपस्कार होईस्तोवर या समाजकंटकांचे मोबाईल नंबर बदललेले असतात. बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून हजारो महिलांशी अश्लील चॅटिंग केल्याच्या घटनाही मोठ्या प्रमाणात उघड होत आहेत. ताजे उदाहरण नांदेडचेच आहे. येथील एका सायबर गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली. हा माणूस शेकडो महिलांशी बनावट अकाऊंटद्वारे चॅटिंग करीत होता. महिलांची बदनामी करीत होता.
सोशल मीडियावर महिलांची वेगवेगळ्या पद्धतीने बदनामी करण्याचे प्रकार प्रचंड वाढले आहेत. अनेकदा अशा बदनामीने मग महिलांचा आत्मविश्वास ढासळतो, खच्चीकरण होते. याचा अर्थ महिलांनी किंवा तरुणींनी सोशल मीडियाचा वापरच करू नये, असा अजिबातच नव्हे. पण तो करीत असताना सतर्क मात्र असायला हवे. राज्य महिला आयोगानेही सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने व्हावा यासाठी एक सायबर समिती स्थापन केली आहे. या समितीच्या शिफारशी शासनाला सादर केल्या जातील. त्यानंतर काय निर्णय व्हायचा तो होईल. पण वाढत्या सायबर गुन्ह्यांपासून प्रत्येकालाच स्वत:चा बचाव करता आला पाहिजे.
गेल्या काही वर्षांमध्ये सायबर गुन्ह्यात प्रचंड वाढ झाली असून यावर नियंत्रणासाठी पोलीस विभागाने स्वतंत्र सायबर गुन्हे विभागही स्थापन केला आहे. पण या विभागालाही अशा सायबर गुन्हेगारांवर अंकुश घालण्यात फारसे यश मिळू शकलेले नाही. यासंदर्भातील आकडेवारीनुसार पाचपैकी केवळ एकाच गुन्ह्याचा शोध लागतो, हे लक्षात घेण्यासारखे.
आज आम्ही सोशल मीडियाच्या पार आहारी गेलो आहेत. एवढे की त्यामुळे होणाऱ्या नुकसानाचीही आम्हाला पर्वा राहिलेली नाही किंबहुना तसे भानच आम्हाला नाही. आपल्या आयुष्यातील अगदी लहानसहान प्रत्येक गोष्ट फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅपवर शेअर केल्याशिवाय आम्हाला चैनच नसते. तसेही एखादी गोष्ट फुकटात मिळाली की ती जास्तीतजास्त वापरून घेण्याकडे आमचा कल असतो. आणि आमच्या या प्रवृत्तीचाच मग फेसबुकसारख्या कंपन्या फायदा उचलत असतात. आम्ही जो डेटा फेसबुक, टिष्ट्वटर यासारख्या साईटस्वर टाकतो त्याचे पुढे काय होत असेल याचा विचारही करीत नाही. पण यावरील आमच्या वैयक्तिक माहितीची राजरोसपणे चोरी होतेय.यासंदर्भात अलीकडेच केंम्ब्रिज अ‍ॅनालिटिकाचे प्रकरण उघडकीस आले असतानाच सायबरतज्ज्ञ अ‍ॅड. महेंद्र लिमये यांनीसुद्धा नेटिझन्सना यासंदर्भात सतर्क केले आहे. त्याच्या मते फेसबुक वापरणाऱ्या भारतातील २० कोटी लोकांचा डेटा असुरक्षित आहे. भारतीय डिजिटल निरक्षर असल्याचे त्यांचे म्हणणे मान्य करावे लागेल. तसेच मोबाईलवरून आर्थिक व्यवहार टाळण्याचा सल्लासुद्धा गांभीर्याने घ्यावा लागेल. त्याचे कारण असे की आमच्यापैकी किती जणांना हे माहिती आहे की आपल्या मोबाईलवरील प्रत्येक डेटा अगदी बँक व्यवहार पण फेसबुकला स्टोअर होत असतो. आणि मग या कंपन्या हीच माहिती कोट्यवधी रुपयात विकतात. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की फेसबुक असो वा अन्य कुठलाही सोशल मीडिया ते व्यवसाय करताहेत. समाजकार्य नाही. सोशल मीडियावरील डेटाचा होणारा दुरुपयोग लक्षात घेता त्यावर सरकारी माहितीसुद्धा सुरक्षित नसल्याचा इशारा लिमये यांनी दिला आहे. २०१२ साली शासकीय दस्तावेज सोशल मीडियावर टाकण्याचे एक प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचले होते. त्यावेळी न्यायालयाच्या आदेशानुसार शासनाने सरकारी अधिकाऱ्यांसाठी ई-मेल धोरण तयार केले होते. त्यानुसार सोशल मीडियावर शासकीय माहितीचे आदानप्रदान हे कायद्याचे उल्लंघन ठरते. पण सोशल मीडिया कंपन्यांचे सर्व्हर विदेशात असल्याने या कंपन्या भारतीय कायदे मानण्यास बाध्य नाहीत. अमेरिकेत नऊ इंटरनेट कंपन्यांनी आॅपरेशन प्रिझ्मअंतर्गत भारतासह अनेक देशांची माहिती अमेरिकी गुप्तचर संस्थांना पुरविली होती. हे वास्तव उघड झाल्यावरही भारत सरकार या कंपन्यांविरुद्ध कुठलीही कारवाई करू शकले नव्हते, हे लक्षात घेण्यासारखे आहे. त्यामुळे भूतकाळातील अशा घटनांमधून धडा घेत वेळीच या माध्यमांना आणि त्यांच्या वापराला आवर घालणे नितांत गरजेचे आहे.
एखाद्या नव्या तंत्रज्ञानाचा शोध लागतो तेव्हा त्याच्यासोबत वरदान आणि अभिशाप दोन्ही असतात. समाज माध्यमांच्या बाबतीतही नेमके हेच घडले. या माध्यमांनी ज्ञान आणि माहितीचा अथांग सागरच निर्माण केला. आज अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच या समाजमाध्यमांनी आपल्या विळख्यात घेतले आहे. लाखो करोडे लोक या माध्यमांशी जुळले आहेत. अशात त्यावर प्रसारित होणारे प्रत्येक छायाचित्र, मजकूर आणि घटनांची तीव्र प्रतिक्रिया उमटत असते. विधायक चळवळीत समाजमाध्यमे महत्त्वाची भूमिका वठवू शकतात याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. पण याच समाज माध्यमांचा जेव्हा गैरवापर केला जातो तेव्हा ती किती विघातक ठरू शकतात याचेही अनेक अनुभव आपण अलीकडच्या काळात घेतले आहेत आणि घेत आहोत. त्यामुळे समाज माध्यमांच्या नकारात्मक वापराचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आता आली आहे. विशेषत: ही नकारात्मकता स्वत: सोबतच समाजासाठीही घातक ठरू शकते याची काळजी समाज माध्यमांवर असणाºयांनी घेतली पाहिजे. भूतकाळातील या घटनांमधून धडा घेत वेळीच या माध्यमांना आवर घालणेही तेवढेच गरजेचे आहे. माध्यमांवर नियंत्रणासाठी केवळ कायदा असून चालणार नाही तर या माध्यमांनासुद्धा असे प्रकार घडू नयेत या दृष्टीने प्रभावी देखरेख यंत्रणा कार्यान्वित करावी लागणार आहे. समाज माध्यमांचा वापर देशाचा विकास आणि लोकांना एकमेकांच्या जवळ आणण्यासाठी आहे याचे भान प्रत्येकालाच असले पाहिजे.

 

 

 

Web Title: Who will control social media?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.