इंडिया कास्टलेस हवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 12:48 PM2018-10-26T12:48:52+5:302018-10-26T12:50:51+5:30

आज सर्वत्र कॅशलेस इंडियाची गरज प्रतिपादित होत आहे. पण त्याहीपेक्षा कास्टलेस इंडिया होणे गरजेचे आहे.

India should be castless! | इंडिया कास्टलेस हवा!

इंडिया कास्टलेस हवा!

Next

सुरेश बाहेकर
लोेकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: आज सर्वत्र कॅशलेस इंडियाची गरज प्रतिपादित होत आहे. पण त्याहीपेक्षा कास्टलेस इंडिया होणे गरजेचे आहे. जी जात नाही ती जात अशी जातीची व्याख्या केली जाते. जातीने समाजात प्रचंड मोठी व भयानक अशी विषमता तयार केली आहे. ही जातीवाचक विषमता आम्हास वारसाने मिळाली आहे. अगदी फार पूर्वीपासून ती मानवी समुदायात जाणीवपूर्वक निर्माण केली गेली असावी. समाजात पेरल्या गेलेल्या जातीवाचक बीचे आज वटवृक्ष झाले आहेत. त्याची पाळेमुळे समाजात इतकी खोलवर रुजली आहेत की ती खणून काढणे अतिशय दुरापास्त व तेवढेच कठीण होवून बसले आहे. आजच्या या वैज्ञानिक युगात समाजातली जातीवाचक विषमता पूर्णपणे नष्ट व्हायला पाहिजे होती. मात्र आज आम्ही ती अधिक वेगळ्या व तीव्र रुपात पाहतो आहे. सोशलमिडीया सारख्या माध्यमातून समाजात जातीवाचक विषमता अधिक गतीने पेरली जात आहे. आम्ही अधिकाधिक असहिष्णू होत असून आमची संवेदनशीलता हरवून बसलो आहोत. केवळ जातीवाचकच नव्हे तर अशा अनेक विषमतांनी आमचा देश पोखरू लागला आहे. देशात माजलेला विषमतेचा बाजार खूप झाला. तो आता थांबणे गरजेचे आहे.
भारत हा विविधतेचा देश मानल्या जातो, तो त्याच्या भौगोलिक वैविध्यामुळे! सांस्कृतिक वेगळेपणामुळे. खाणे, पिणे, राहणे, नेसणे, वागणे, बोलणे यातील भारता एवढे वैविध्य जगात कुठेच शोधून सापडणार नाही. मात्र हे वैविध्य आमचे बलस्थान होण्याऐवजी ते समाजातील विषमतेला पूरक ठरत आहे. बोलीभाषा, संस्कृती, वेशभूषा, रंग, लिंग, आर्थिक व सामाजिक स्थिती विषमतेला खत पाणी घालत आहेत. देशातील ही विषमता संपवणे काळाची गरज आहे. देशातील अशी विषमता संपली नाहीतर एक दिवस आमचा देश संपून जाईल.

आर्थिक विषमता :
गरीबांना सुविधा नाकारणारा आणि श्रीमंताना सर्व सुविधा विकत घेता येवू शकणारा देश म्हणून ही आम्ही विषमतेला कारणीभूत ठरविले पाहिजे. एकीकडे हजारो कैदी आपली शिक्षा संपल्यावरही जेल मधून सुटण्याची वाट पाहत असतांना संजय दत्तला शिक्षा पूर्ण होवू देण्यापूर्वीच सोडून दिल्या जाते. सलमान खानला एकाच दिवशी शिक्षा सुनावणी होवून दुसऱ्या कोर्टाकडून जामीनही दिल्या जातो. गरीबांना आपलेच पैसे बँकेतून काढण्यासाठी तासनतास रांगेत उभे केले जाते आणि काळा पैसा कमावणारे, बँकेचे कर्ज घेऊन देश सोडणारे विजय मल्ल्यासारखे देशातून सहज पसार होतात. हे केवळ त्यांच्याजवळ पैसा आहे म्हणून शक्य होते. आर्थिक विषमता आज आमच्या देशात अतिशय पाळेमुळे घट्ट करून बसली आहे. केवळ पैसा नाही म्हणून गरीबांना दोन वेळचे जेवण ही नाकारले जाते आणि श्रीमंतांना छोट्या छोट्या कारणांसाठी पार्टी करून अन्नाची नासाडी करण्याची संधी दिली जाते. बुद्धी आणि शारीरिक क्षमता असूनही शिक्षण व नोकरीची संधी केवळ पैसा नसल्याने हिरावून घेतली जाते तर पैसा भरून बौद्धिक क्षमता नसतांनाही व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश मिळतो. आर्थिक विषमतेची अशी अनेक उदाहरणे आमच्या आजूबाजूला पाहायला मिळतात. किंबहुना आम्ही दरदिवशी ती अनुभवत असतो.

सामाजिक विषमता :
देशात व्हीआयपी कल्चर मोठ्या प्रमाणात असून जे जातीने, रंगाने व पैशाने श्रेष्ठ ते मोठे, व्हीआयपी मानण्याची शिकवण आम्हाला नकळत दिली गेली आहे. मोठ्यांचा आला गाडा आणि गरीबांचे झोपडे मोडा, अशी एक म्हण आमच्या भागात प्रचलित आहे. आमच्या व्हीआयपी संस्कृतीचे दुष्परिणाम सांगणारी अनेक उदाहरणे आपणांस माहित असतील. सभा, संमेलने, कार्यक्रम, कार्यशाळा अशा ठिकाणी अशा मोठ्या माणसांना प्राधान्य देणारी संस्कृती म्हणजे व्हीआयपी संस्कृती आहे. माणूस हा खरे तर ज्ञानाने, वयाने व अनुभवाने मोठा असतो. पण आजच्या युगात ज्याच्याकडे पैसा अधिक, तो मोठा मानण्याची पद्धत रूढ झाली असून त्यामुळे ही समाजात विषमता वाढत आहे. मंदिरे खरंतर अशा विषमतेपासून अलिप्त राहावयास हवी होती. पण ज्याच्याकडे अधिक पैसा त्याला व्हीआयपी दर्शन उपलब्ध असणाऱ्या देशात समाजात हे विष किती मोठ्या प्रमाणात वाढले आहे हे अधोरेखित करणारे वास्तव होय.

समाजातील विषमतेचे हे विष नष्ट करण्यासाठी आम्ही आमची शिक्षण पद्धती अधिक सक्षम व समर्थ बनविली पाहिजे. शिक्षणाच्या प्रत्येक टप्यावर समानतेचा पुरस्कार करणारे व विषमतेचे दुष्परिणाम स्पष्ट करणारे पाठ समाविष्ट केले पाहिजे. शिक्षकांनी ते अतिशय तत्परेतेने मुलांपर्यंत पोचविले पाहिजे. ग्लोबल सिटीजनशिप स्वीकारून आम्ही कोणत्याही जाती, धर्म, पंथ वा गटाचे प्रतिनिधीत्व करीत नसून अखिल मानव जातीला पूरक व पोषक असे वातावरण आमच्या वागणुकीतून निर्माण केले पाहिजे. माणुसकीचे तत्वज्ञान पाजाळण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीला महत्व दिले गेले पाहिजे. माणुसकी हाच एकमेव धर्म आणि मानवता हीच आमची वृत्ती झाली पाहिजे.

Web Title: India should be castless!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.