समाज सुधारणांचे कार्यकर्त्यांसमोर तगडे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 03:50 PM2018-12-19T15:50:09+5:302018-12-19T15:51:46+5:30

सध्या आपण एकविसाव्या शतकाकडे वाटचाल सुरु केली असली असली तरीही समाजात अनेक जाचक अशा रुढी, परंपरा यांना कवटाळून बसलो आहोत. आपण शिक्षणाने पुढारलेले आहोत, असे म्हणत असलो तरीही प्रत्यक्ष कृतीतून ते सिद्ध केले जात नाही. मात्र, अशा अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी काही सामाजिक कार्यकर्ते तळमळीने समाजात कार्य करीत आहेत.

Strong challenge before the workers of social reforms | समाज सुधारणांचे कार्यकर्त्यांसमोर तगडे आव्हान

समाज सुधारणांचे कार्यकर्त्यांसमोर तगडे आव्हान

googlenewsNext
ठळक मुद्देसमाज सुधारणांचे कार्यकर्त्यांसमोर तगडे आव्हानअनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी तळमळ

शोभना कांबळे 

सध्या आपण एकविसाव्या शतकाकडे वाटचाल सुरु केली असली असली तरीही समाजात अनेक जाचक अशा रुढी, परंपरा यांना कवटाळून बसलो आहोत. आपण शिक्षणाने पुढारलेले आहोत, असे म्हणत असलो तरीही प्रत्यक्ष कृतीतून ते सिद्ध केले जात नाही. मात्र, अशा अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी काही सामाजिक कार्यकर्ते तळमळीने समाजात कार्य करीत आहेत.

काही दिवसांपुर्वी खेड तालुक्यातील वेरळ गावातील एका महिलेला अशा अनिष्ट रूढीतून बाहेर काढण्याचे अवघड काम पुणे येथील सामाजिक कार्यकर्त्या नंदिनी जाधव यांनी केले आहे. या गावातील कमल पवार या साठ वर्षीय महिलेला जटामुक्त केले आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्यांना विशेषत: अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांना बळ मिळाले आहे.

आजही अस्तित्त्वात आहेत. अंधश्रद्धेला बळी पडून काही महिला आपल्या डोक्यावर जटा बाळगण्याचे काम करीत आहेत. परंतु अशा महिलांचे प्रबोधन करुन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम पुणे येथील सामाजिक कार्यकर्त्या नंदिनी जाधव यांनी हाती घेतले असून, आज खेड तालुक्यातील वेरळ गावातील कमल पवार (६०) यांची जटेतून सुटका केली आहे. जिल्ह्यात घडलेली ही पहिलीच घटना आहे. सामाजिक कार्यकर्त्या नंदिनी जाधव आणि खेड येथील अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांचे कौतुक करायला हवे.

ग्रामीण भागातच नव्हे तर अगदी शहरी भागातही अशा भोळ्या, अज्ञानी व्यक्तींना फसवून अनेक महाभाग स्वत:चा स्वार्थ साधत असतात. परमेश्वराची भीती अशा लोकांना दाखवून हे लोक भरमसाठ माया गोळा करतात. आपण फसविले जातोय, हे यावेळी या लोकांच्या लक्षात येत नाही. मात्र, ज्यावेळी लक्षात येते, त्यावेळी पुर्णपणे फसवणूक झालेली असते. हल्ली तर ह्यसुशिक्षितह्ण म्हणविले जाणारे लोकही फसतात, ही विशेष दु:खाची बाब. कारण शिक्षणातून ही मंडळी काय शिकतात, हाच संशोधनाचा मुद्दा ठरावा.

अशा लोकांना जागरूक करणाऱ्या अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्यकर्ते किंवा सामाजिक कार्यकर्ते यांना धर्मविरोधी, देवविरोधी ठरवून हेच लोक आपली चांदी करत असतात. खरतर अंधश्रद्धा निर्मुलनाचे कार्य अशा ढोंगी बुवाबाजीविरोधात आहे. गेल्या वर्षीच रत्नागिरीत पर्दाफाश केलेल्या पाटीलबुवाचे प्रताप जनतेसमोर प्रसारमाध्यमांनी उघड केले. यामुळे पाटीलबुवा ह्यजेलह्णबंद होईल, असे वाटत असतानाच, ह्यभक्तांह्णच्या आणि काही अंशी पोलीसांच्याही भक्तीपोटी हा बाबा आज उजळमाथ्याने समाजात वावरतोय. आज शिक्षण घेवूनही आपण ते फोल ठरवतोय. ग्रामीण भागातील लोक जागरूक झाले मात्र, शहरी भागातील काही लोकांच्या डोळ्यावर अजुनही झापड आहे. त्यामुळे अंधश्रद्धा केवळ ग्रामीण भागातच नव्हे तर शहरी भागातही वाढायला लागलीय.

जादूटोणा विरोधी कायदा व्हावा, यासाठी विज्ञानवादी विचारांचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा कित्येक वर्षापासून लढा सुरू होता. देवीला बळी देण्याच्या अघोरी प्रथेला कायमचीच तिलांजली मिळावी, यासाठी अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या माध्यमातून कायम लढा सुरू होता. दुर्देवाने दाभोलकरांच्या हत्येनंतर हा कायदा अस्तित्वात आला. अजुनही अशा अमानवी रूढी जोपासल्या जात आहेत. त्यांचे अस्तित्व रहावे, यासाठी अशा कार्यकर्त्यावर ईश्वरविरोधक असा शिक्का मारला जात आहे.

परंतु हा लढा कुणाच्याही व्यक्तिगत श्रद्धेविरोधातील नसून तो समाजातील काही वृत्ती लोकांच्या भाबडेपणाचा गैरफायदा घेऊन त्यांना जादूटोणा, भानामती आदी प्रकारांत अडकवून त्यांच्याकडून भरमसाठ पैसा कमावत आहेत, अशांविरोधी आहे, हे समजून घेण्याची चिकित्सक वृत्ती आपण कधीच दाखवत नाही.

आज विज्ञानावर आधारित असलेल्या तंत्रज्ञानाने जगात आमुलाग्र क्रांती केली आहे. मात्र, या आधुनिक तंत्रज्ञानाचे आपण शिलेदार अजुनही अंधश्रद्धांच्या गर्तेत अडकलो आहोत. कुणी कितीही देवांची पूजा करावी, हा प्रत्येकाला घटनेने अधिकारच दिला आहे. मात्र, देवतांच्या नावाखाली कुणाची फसवूणक होत असेल, तर तो गुन्हा आहे. म्हणुनच प्रत्येकानेच अंधश्रद्धा विरोधी कायदा म्हणजे नेमके काय, हे समजून घ्यायला हवे. प्रत्यक्षात तशी तसदी कुणी घेताना दिसत नाही. म्हणुनच अशा सामाजिक प्रबोधन चळवळींना अपयशाला सामोरे जावे लागते.

खेड तालुक्यातील वेरळ येथील जटामुक्त झालेल्या कमल पवार यांनीही यातून मुक्त होण्याची तयारी दर्शविली, याबद्दल त्यांचे कौतुक करायलाच हवे. पण आता त्यातून बाहेर पडल्यानंतर त्या याबाबत प्रबोधन करणार, ही विशेष बाब जिल्ह्याच्या सामाजिक सुधारणेतील शुभशकून मानायला हरकत नाही. कारण अजुनही अशा जटा असलेल्या अनेक महिला इतरत्र वावरताना दिसतात. अशा जटा असलेल्या एका महिलेच्या केसांत पालीने अंडी घातली होती.

मात्र, जटांमुळे ते लक्षात आले नाही. त्यातून पुढे त्या महिलेच्या जीवावर बेतल्याची घटना काही वर्षांपुर्वी घडली आहे. त्यामुळे या महिलांना जटांमुळे होणाऱ्या त्वचेच्या आजारातून मुक्तता मिळेलच पण त्यांचे स्वास्थ्यही सुधारेल.
अशा अमानवी प्रथा बंद होणे, ही सामाजिक सुधारणांची गरज आहे. मात्र, वाईटकी नको, म्हणुन सुशिक्षित वर्ग यापासून दूर राहू पाहातो. म्हणुनच चळवळ उभारणारे आणि ती पुढे नेणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी रहाते.

या मानसिकतेमुळेच अशा घटनांना पायबंद घालण्याचे अवघड असे आव्हान सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या मनोबलावर पेलत आहे. मात्र, या घटनेमुळे या अंधश्रद्धा फोफावू नये, यासाठी प्रयत्न करणाऱ्या अंनिसच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होणार आहे. ग्रामीण भागात अशा अनेक महिला अजुनही आहेत. त्यांचे प्रबोधन करण्याचे आव्हान, या घटनेमुळे काहीसे सोपे झाले आहे, इतकेच.
 

 

Web Title: Strong challenge before the workers of social reforms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.