Experiencing stress on conservation | संवर्धनात्मकतेवर भर देणारी अनुभुती
संवर्धनात्मकतेवर भर देणारी अनुभुती

संजय करकरे (सहायक संचालक, बीएनएचएस, नागपूर)

महाराष्ट्र पक्षीमित्र संयोजित दुसरे अखिल भारतीय व ३२वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन क-हाड येथे २३ व २४ नोव्हेंबरला उत्साहात पार पडले. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेल्या पक्षीप्रेमींची ही मांदियाळी येथून खूप काही माहितीचा संग्रह करुन आपापल्या प्रांतात परत गेली. केवळ संशोधनात्मक अनुभव सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती संवर्धानात्मकेवर अधिक भर देण्याची एक अनुभुती या संमेलनात जाणवली, हे पक्षीप्रेमींबरोबरच निसर्गप्रेमींसाठी मोठी अभिमानाची बाब म्हणता येईल.

कोणतेही संमेलन, मेळावा म्हटला की मोठी तयारी, थाटबाट, संयोजन हे आलेच. हे तर राज्यभरातील पक्षीप्रेमींना एकत्र करणारे, विचारांचे, अनुभवांचे आदानप्रदान करणारे संमेलन होते. काही अपवाद वगळता सतत ३२ वर्षे हे संमेलन आयोजित होत आहे. १९८२ साली सुरू झालेला हा यज्ञ आजही मोठ्या तेजाने सुरू आहे. ज्येष्ठ पक्षी अभ्यासकांची फौज आता थकली आहे. त्यामुळे हा सर्व पसारा नव्या दमाच्या पक्षीप्रेमींकडे आला असल्याचे लक्षात येत आहे. क-हाड येथील संमेलनात याचे प्रतिबिंब बघायला मिळाले.

किशोर रिठेंसारख्या नव्या दमाच्या, दीर्घ अनुभवाच्या वन्यजीव अभ्यासकाकडे संमेलनाच्या अध्यक्षपदाची धुरा गेल्यावर तर ते अधिक ठळकपणाने जाणवले. रिठे यांनी पक्षी संवर्धनातील नेमक्या बाबींवर बोट ठेवले. केवळ ढिगभर पक्षी संवर्धनाचे अहवाल प्रसिद्ध करण्यापेक्षा ते अधिक लोकाभिमुख होण्याची गरज त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली. संशोधन निबंधामुळे पक्षी प्रजाती वाचतील अथवा त्यांचे संवर्धन होईल, या भ्रमात न राहण्याचा सल्लाही त्यांनी आपल्या भाषणात दिला.

या संमेलनातील विविध सत्रांत अनेक पक्षी अभ्यासक तज्ज्ञांनी आपापले शोधनिबंध, अनुभव, संवर्धन विषयी प्रयत्नांचे सादरीकरण केले. मात्र अनेकांना वेळेचे बंधन पाळणे जमले नाही. जुने अनुभव, जुनेच सादरीकरण केल्याचे काही प्रमाणात दिसून आले. सुरुवात डॉ. सतीश पांडे यांच्या समुद्र किनारपट्टीवरील पक्षीजीवनाच्या सादरीकरणाने झाली. यानंतर अमरावतीच्या तरूण पक्षीप्रेमी सौरभ जवंजाळ (आखूड कानाचे घुबड व त्याच्या खाद्याचा अभ्यास), भाग्यश्री परब व प्रवीण सावंत (सिंधुदूर्गातील पक्षीवैभव) या नवोदितांनी अनुभव सादर केले.

सिंधुदुर्गच्या टिमने काढलेले पक्ष्यांवरील पुस्तकही कौतुकास पात्र ठरणारे आहे. सावंतवाडीचे सहायक वनसंरक्षक सुभाष पुराणीक, बीएनएचएसचे वरिष्ठ संशोधक रजत भार्गव, वरिष्ठ संशोधक वरद गिरी, शरद आपटे यांचे सादरीकरण पोटतिडकीने व अनुभवसंपन्न असे होते. अनुभवाची, अभ्यासाची मोठी शिदोरी असणा-या या अभ्यासकांनी संवर्धनाबाबत घ्यायच्या काळजीवरच कसे दूर्लक्ष होते यावर बोट ठेवले.

संमेलनात बीएनएचएस संस्थेचा सहभाग लक्षणीय ठरला. डॉ. गिरीश जठार, नंदकिशोर दुधे, तुहिना कट्टी, डॉ. राजू कसंबे, रजत गार्भव हे सध्या कार्यत असणारे तर प्रशांत महाजन, वरद गिरींसारखे येथे काम करुन गेलेल्या अभ्यासकांच्या सादरीकरणाने संमलेनाला एक मोठी उंची प्राप्त झाली. जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ सलीम अलींच्या बुक आॅफ इंडियन बर्डस या पुस्तकाचे मराठी रूपांतर या संमेलनात प्रसिद्ध झाले.

पंकज लाड व पराग रांगणेकर यांनी गोव्यातील अनुभवांवर विचार मांडले. या संमेलनात मांडलेल्या अनोख्या अशा छायाचित्रांच्या प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद मिळाला. डॉ. जितेंद्र कागे यांनी या प्रदर्शनाचा लेखाजोखा मांडला.
पक्षीशास्त्र आता अत्यंत प्रगत होत चालले आहे. केवळ पारंपरिक पक्षीनिरीक्षणापुरते न राहता ते आता मोबाईल अ‍ॅप, इबर्ड, कॉमन बर्डपासून विविध मॉनिटरिंगपर्यंत विस्तारत चालले आहे. पक्ष्यांना कडी लावणे आता मागे पडून ‘पीटीटी’पर्यंत विस्तारत आहे. शास्त्रीय निरीक्षणांच्या या जोडीलाच संवर्धन, सिटिझन, सायन्सची भक्कम बाजू मिळत आहे. त्यामुळे येणा-या काळात त्याचे महत्त्व अधिक वाढत जाणार आहे.

देशात केवळ महाराष्ट्रात दरवर्षी नियमीतपणे पक्ष्यांची अशी संमेलने भरत आहेत. त्याहून पुढे जाऊन त्यात प्रादेशिक संमेलनांची भर पडत आहे. भाऊ काटदरे, डॉ. जयंत वडतकर, डॉ. राजू कसंबेंसह अनेक जणांची चमू या प्रादेशिक संमेलनाच्या बाजूने उभी राहत असून त्या संमेलनांची उंची गाठण्यासाठी प्रयत्नशील आहे. कराड जिमखान्याचे पदाधिकारी सुधीर एकांडे, नाना खामकर, हेमंत केंगळे, रोहन भाटे, पापा पाटील यांच्यासह अनेकांचे संमेलनाच्या उत्तम आयोजनासाठी सहकार्य लाभले.

वर्धा-क-हाड सायकल रॅली
वर्धा येथील ज्येष्ठ पक्षी अभ्यासक प्रा. किशोर वानखडे व दिलीप वरखडे यांनी वर्धा ते कºहाडदरम्यान सायकल रॅली काढून एक नवा पायंडा पाडला. पक्षीमित्रांनी सायकलने भटकंती करुन पक्ष्यांच्या अधिवास प्रदुषणमुक्त करावा, यासाठी त्यांनी ही सायकलयात्रा काढली होती.

पक्षी संमेलनात वाघ
गेल्या काही दिवसांपूर्वी पांढरकवड्यात झालेल्या टी १ या वाघीणीच्या मृत्यूबद्दल या संमेलनात विचार मांडले गेले ते वनखात्याचे धडाडीचे अधिकारी सुनील लिमये यांच्याकडून. लिमये उद्घाटन सत्रासोबतच दुस-या दिवशीही संमेलनात उपस्थित राहिले. त्यांनी यावेळी खास त्यांच्या शैलीत मनमोकळेपणे या वाघीणीबद्दलची वनविभागाची भूमिका स्पष्ट मांडली. कवेळ वाघच नाही, तर माळढोक पक्ष्याबद्दल वनविभागाने काय केले हेही त्यांनी सांगितले.

sanjay.karkare@gmail.com
 


Web Title: Experiencing stress on conservation
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.