आपला माणूस- दृष्टीक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 01:04 AM2018-09-11T01:04:05+5:302018-09-11T01:07:32+5:30

आपला माणूस कोण? असे कुणी विचारले तर कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र असे उत्तर कुणीही देईल. कुणी म्हणेल अडचणीच्या काळात मदतीला धावून येतो तो, आणखी कुणाचे यापेक्षा वेगळे मत असू शकेल, पण दूरदेशी गेल्यानंतर किंवा आपले गाव, शहर, जिल्हा सोडून लांब गेल्यानंतर कोणतीही ओळखपाळख नसताना आपल्या..

Your man-look | आपला माणूस- दृष्टीक्षेप

आपला माणूस- दृष्टीक्षेप

Next
ठळक मुद्देमीही तिकडचाच. दानोळीचा, धरणग्रस्त वसाहतीतील राहणारा आहे, विशेषत: मराठा समाजात तरी. यात बदल होईल. त्याचवेळी सर्वांचाच विकास होईल.

- चंद्रकांत कित्तुरे

आपला माणूस कोण? असे कुणी विचारले तर कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र असे उत्तर कुणीही देईल. कुणी म्हणेल अडचणीच्या काळात मदतीला धावून येतो तो, आणखी कुणाचे यापेक्षा वेगळे मत असू शकेल, पण दूरदेशी गेल्यानंतर किंवा आपले गाव, शहर, जिल्हा सोडून लांब गेल्यानंतर कोणतीही ओळखपाळख नसताना आपल्या भागातील कुणी भेटले की तो आपलाच माणूस वाटू लागतो. तो नोकरी-व्यवसाय किंवा अन्य काही कारणाने तेथे राहात असेल तर त्याला आपल्या भागातील कुणी भेटले तर घरचेच कुणीतरी भेटल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसतो. आपली आपुलकीने विचारपूस करून आपल्याला काय हवे, नको याची काळजीही तो घेतो.

हा अनुभव बहुधा सर्वांनाच आला असेल. मलाही तो आला. त्याचे असे झाले. गेल्या आठवड्यात कौटुंबिक कारणासाठी मुंबईला जाण्याचा योग आला. तसे मुंबईला फारसे कधी जाण्याचा प्रसंग मला आलेला नव्हता. काहीवेळा गेलो असलो तरी कामाचे ठिकाण सोडून अन्यत्र कुठे गेलो नव्हतो. त्यामुळे तसा मुंबईत मी नवखाच. सोबत सौ. आणि कन्याही होती शिवाय बॅगा. मुंबई महानगरी, मायावीनगरी म्हणूनच ओळखली जाते. शिवाय तिथे दररोज माणसांचा जणू महासागरच रस्त्यावरून अथवा लोकलमधून धावत असतो.

या महासागरात आपण कुठे चुकू की काय, अशी भीती नवख्या माणसाला वाटणे साहजिकच म्हणावे लागेल. मलाही लोकलनेच प्रवास करावयाचा होता. दुपारी चारनंतर चर्चगेटवरून खारघरला निघालो होतो. त्यामुळे लोकल मध्ये दोन ठिंकाणी बदलावी लागणार होती. मुंबई सेंट्रलला उतरलो. तेथे मुंगीलाही शिरायला जागा नाही अशी म्हणण्यासारखी परिस्थिती होती. त्या गर्दीत घुसलो. तेथेच एक तरुण होता. आमचे बोलणे ऐकून त्यानेच विचारले . कोल्हापूरचे काय? ज्या त्या भागातील भाषेचा एक प्रभाव असतो. त्याचाच हा परिणाम. होय, तुम्ही कसे ओळखलात, अशी विचारणा त्याला केली. तेव्हा तो म्हणाला, मीही तिकडचाच. दानोळीचा, धरणग्रस्त वसाहतीतील राहणारा आहे, असे तो म्हणाला. आमच्यासाठी त्यानेही दोन लोकल सोडल्या. कारण गर्दीतून आत घुसताच येत नव्हते. अखेर दुसºया मार्गे जाण्याचा मार्ग त्याने सांगितला.

आमच्यासाठी तोही त्याच मार्गाने आला आणि आम्हाला आमच्या इच्छितस्थळी पोहोचण्यास मदत केली. त्यावेळी आम्हाला तो भेटला नसता तर त्या गर्दीत आम्ही किती वेळ अडकलो असतो कुणास ठाऊक, पण केवळ आपल्या भागातील, जिल्ह्यातील आहेत म्हणून त्याने मदत केली. त्यामुळेच आमच्यासाठी तो आपला माणूस ठरला. असेच प्रसंग अनेकांच्या बाबतीत घडले असतील. परक्या ठिकाणी अशी मदत करायला अशी आपलीच माणसे पुढाकार घेतात हे खरेच. विभक्त कुटुंबव्यवस्थेमुळे तसेच आजच्या धकाधकीच्या आणि गतिमान युगात एखाद्यासाठी द्यायला एवढा वेळ असतो का? नातेवाईक किंवा पाहुणेमंडळी तेथे आपला पाहुणचार करतातच, पण असे ओळख नसताना झालेल्या मदतीचे मोल खूपच म्हणावे लागेल.

अलीकडे नीतीमत्ता ढासळली आहे असे सर्रास म्हटले जाते, पण लहानपणी आपल्यावर जे संस्कार होतात, जी नीतीमत्ता शिकविली जाते ती आयुष्यभर साथ करते. त्यातूनच मदतीची, परोपकाराची भावना वाढीस लागते. एखादा अडचणीत असेल तर त्याला मदत करण्याऐवजी त्याच्यापासून लांब जाणारेच खूप भेटतात. अशावेळी आपले कोण आणि परके कोण याची ओळख पटते, असे म्हटले जाते. हा अनुभव मुंबईतला असला तरी परदेशात आपल्या देशातील माणूस भेटला की, तो कोणत्याही राज्यातला, प्रांतांतला, जातीचा, धर्माचा असला तरी तो आपलाच वाटतो. कारण देश, मातृभूमी या समान धाग्याने तो आपल्याशी जोडलेला असतो.

उच्च पदावर पोहोचलेले, परदेशात काम करणारे असे अनेक भारतीय आहेत की, ज्यांनी आपल्या गावाकडची माणसेही तिकडे नेली आहेत. त्यांना शिक्षणासाठी, नोकरीसाठी मदत केली आहे. करत आहेत. हे खरे असले तरी प्रश्न असा पडतो की, लांब गेलेली माणसे अशी मदत करतात, पण आपल्याच गावची, भागातील तशी का करत नाहीत. आपला समाज, आपला गाव सुधारावा यासाठी एक होऊन एकमेकांच्या उन्नतीसाठी हातभार का लावत नाहीत. याला काही अपवाद असतीलही, पण कुठेही गेलात तरी सर्रास चित्र असेच दिसते. विशेषत: मराठा समाजात तरी. यात बदल होईल. त्याचवेळी सर्वांचाच विकास होईल.

(लेखक ‘लोकमत’चे उप वृत्तसंपादक आहेत.)
kollokmatpratisad@gmail.com

Web Title: Your man-look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.