कल्याणी चालुक्यनिर्मित ‘लत्तलूर’चे ग्रामदैवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 06:48 PM2018-07-28T18:48:43+5:302018-07-28T18:50:11+5:30

स्थापत्यशिल्पे : आपल्याकडील अनेक प्राचीन राजवंशांनी मोठ्या अभिमानाने स्वत:च्या मूलस्थानाचे बिरुद आपल्या नावांसमोर लावलेले दिसते, जसे की, शिलाहारांचे, तेरवरून तगरपूरवराधिश्वर!  महाराष्ट्रातील महत्त्वाचा राजवंश, राष्ट्रकुट राजे व सौंदत्ती कर्नाटक येथील रट्टराजे स्वत:ची ओळख मराठवाड्यातील लातूर म्हणजेच प्राचीन लत्तलूर वा लत्तनूर, या आपल्या मूलस्थानावरून सांगत, स्वत:ला ‘लत्तलूरपूरवराधिश्वर’ म्हणून घेताना दिसतात. मात्र, प्राचीन लिखित संदर्भ असलेल्या या शहराच्या भौतिक वारशाचा शोध घेणं, हे तितकसं सोपं काम नाही.

Kalyani Chalukya-built 'Lattloor' gramadaivat | कल्याणी चालुक्यनिर्मित ‘लत्तलूर’चे ग्रामदैवत

कल्याणी चालुक्यनिर्मित ‘लत्तलूर’चे ग्रामदैवत

googlenewsNext

- साईली कौ. पलांडे-दातार

आज शहरीकरणाच्या रेट्यात आणि अनास्थेपोटी, लातूरचा वैभवी इतिहास हरवून गेला आहे. त्यातले काही उरले सुरले अवशेष आज मंदिर, शिलालेख आणि मूर्ती स्वरूपात आढळून येतात. मांजरा नदीस्थित लातूरची नोंद बदामी चालुक्य ताम्रपटात रत्नपूर अशीही सापडते. रत्नपूर, रट्टगिरी किंवा रट्टपूर ही नावे, आज हकिनाबाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टेकडीवरून पडले असावे व मूळ वसाहत आज हलली असावी, असे संशोधक हरिहर ठोसरांचे मत आहे. अभिलेखांमधील लातूरची नोंद सातव्या शतकापासून ते तेराव्या शतकापर्यंत सापडते व त्यामध्ये अमोघवर्ष या राष्ट्रकुट सम्राटाचा समावेश आहे. राष्ट्रकुटांच्या अनेक शाखांचे मूळ गाव लातूर असावे, असे अनेक संशोधकांनी नमूद केले आहे; पण राष्ट्रकुट काळातील इतर पुरावे मिळणे आज दुरापास्त आहे. कल्याणी चालुक्य राजा भूलोकमल्ल सोमेश्वर तिसरा याने इ.सन ११२८ साली ‘पापविनाशन’ देवाची स्तुती केल्याचा लेख भूतनाथ मंदिरात कोरला आहे.

लातूरच्या प्राचीन खुणा खऱ्या अर्थाने जिवंत आहेत त्या ग्रामदैवत सिद्धेश्वर रत्नेश्वर  मंदिर समूहाच्या रूपात! मध्य युगातील फरसबंदी तटबंदीतून आपण मंदिराच्या प्रांगणात शिरतो. मंदिर पश्चिमाभिमुख आहे. मंदिरात शिरताच मध्ययुगीन कमानयुक्त भक्कम बांधकाम नजरेस पडते. आज सिद्धेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार झाला असला तरी काही महत्त्वाची कल्याणी चालुक्यकालीन शिल्पे मंदिरात जपली आहेत. तिथल्या १२-१३ शतकातील नागरी शिलालेखात सिद्धेश्वर देवतेला ३६ निवर्तने जमीन दिल्याचा उल्लेख आहे. तसेच, या देणगीवर ब्राह्मण आणि तपस्वी यांचा अधिकार नसेल, असेही नमूद केले आहे. अक्षरे खराब झाल्याने दान दिलेल्या खेड्यांची नावे, निश्चित तिथी कळू शकत नाही.

मंदिरात शिलालेखाबरोबरच हरगौरीचे आणि सप्तमातृकांची उत्कृष्ट शिल्पे ठेवली आहेत. लातूर परिसर मोठ्या संख्येने आढळणारे,आसनस्थ शंकर पार्वतीसहित नंदी, गणेश आणि कार्तिकेय असलेले उत्कृष्ट ‘फॅमिली पोर्ट्रेट’ शिल्प येथे आहे. त्यात पार्वतीचे सिंह वाहनाच्या ऐवजी ‘गोधा’ नावाची घोरपड दाखवल्याने ही मूर्ती उमा महेश्वर आलिंगन मूर्ती न ठरता, हरगौरीची मूर्ती ठरते. हरगौरीच्या हातांमध्ये त्रिशूळ नाग इत्यादीसहित ‘बीजपूरक’ हे सुफलनाचे चिन्ह दाखवले आहे. मूर्तीच्या सुबक शैलीवरून तसेच इतर नक्षीकामांवरून ती निश्चित कल्याणी चालुक्य काळातील ठरते. सप्तमातृका पट्टावर, विणाधर वीरभद्रासोबत ब्रह्माणी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इंद्राणी, चामुंडा व गणेश व त्यांची वाहने सुस्पष्ट कोरली आहेत.

सिद्धेश्वर मंदिराच्या शेजारीच रत्नेश्वर व इतर मध्ययुगीन मंदिरे व समाध्या आहेत. आजचे रत्नेश्वर मंदिर कल्याणी चालुक्य मंदिराचे कोरीव दगड वापरून चौकोनी गर्भगृह उभे केले आहे. दर्शनी भागात, पाच शाखा असलेली द्वारशाखा असून कक्षासनाचे दगड व सूरसुंदरींच्या मूर्ती भिंतीत बसवल्या आहेत. मंदिरात भोगशयनातील शेषशायी विष्णूची भव्य मूर्ती आहे. मूर्तीच्या प्रभावळीत दशावतार अंकित असून विष्णूच्या पोटातून आलेल्या कमळावर ब्रह्मदेव विराजमान आहे, अर्थात विष्णू ‘पद्मनाभ’ आहे! सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिराच्या प्रांगणात एक कल्याणी चालुक्यकालीन बारव आहे. आज तिची अवस्था अत्यंत वाईट आहे, कारण सर्व प्रकारचा कचरा आणि गणपती गौरींचे विसर्जन त्यातच होते. बारावेच्या भिंतींवर चिणून लावलेली असंख्य मूर्ती-शिल्पे बघितली की, मात्र एक संपूर्ण नष्ट झालेल्या कल्याणी चालुक्य मंदिराचे अवशेष विखुरलेले दिसतात. जुन्या मंदिराच्या देवकोष्टांचे पाषाण वापरून प्रत्येकीत एक एक सूरसुंदरीची मूर्ती बसवली आहे. तसेच, उमा महेश्वर आलिंगन मूर्ती, हर गौरी, गणेश, कामदेव, स्त्रीदेवता,शिवलिंगे भिंतीत बसवलेले आहेत. बारवेतील स्तंभयुक्त दालने ही थोड्या प्रमाणात शिल्लक आहेत.

इथल्या सूरसुंदरी, विष्णू लक्ष्मी, भैरव आणि अंधकासूर वधमूर्ती पाहून निलंगा, धारासूर, पानगाव व धर्मापुरी येथील चालुक्य मंदिरांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. आज, सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिर समूहाची व्यवस्था लिंगायत समाजाकडे आहे व ते आस्थेने मंदिराची देखभाल करीत आहेत. ग्रामदैवत म्हणून या मंदिर व देवतांचे महत्त्व लातूरकर जाणताच, पण शहराच्या आराध्याचे मूळ स्वरूप रंगरंगोटी ना करता, परिसर स्वच्छ ठेवून व ऐतिहासिक संदर्भ पुसून न टाकता, जपणे गरजेचे आहे. अनेक राजवंशांचे मूलस्थान ‘लत्तलूर’ जपणे, ही आजच्या सुशिक्षित आणि संवेदनशील लातूरकरांची जबाबदारी आहे!
( sailikdatar@gmail.com )

Web Title: Kalyani Chalukya-built 'Lattloor' gramadaivat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.