कफन को जेब नहीं होती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 08:24 PM2018-02-20T20:24:14+5:302018-02-20T20:25:22+5:30

अनिवार : मुलीचा जन्म झाल्यास वडिलांना २ महिने २१ दिवस दाढी-कटिंग मोफत व मुलीचे जावळ मोफत. पोस्टाच्या सुकन्या योजनेचे खाते उघडून मुलीच्या खात्यात २८१ रुपये टाकणार. मुलीच्या वडिलांना शाल-श्रीफळ, आईला साडी व मुलीला ड्रेसही देणार. ही कोणतीही सरकारी किंवा तत्सम जाहिरात नसून, सुमित व पूजा पंडित या दाम्पत्याने केलेले एक यशस्वी आवाहन आहे. याचा आजपर्यंत ६३ माता-पित्यांनी लाभही घेतला आहे.

Kafan does not have a pocket ... | कफन को जेब नहीं होती...

कफन को जेब नहीं होती...

googlenewsNext

- प्रिया धारूरकर

मुलगी जगावी, जगवावी, भ्रूणहत्या होऊ नये. तिचे महत्त्व जगाला पटावे, तिच्या जन्माचेही मुलाईतकेच कौतुक व्हावे. मुलींचे प्रमाण वाढावे. तिलाही या जगात सन्मानाने माणूस म्हणून वावरायला मिळावे. या भूमिकेतून ‘स्वागत लेकीचे’ हा प्रामाणिक उपक्रम या दाम्पत्याकडून राबवला जातोय. व्यवसायाने नाभिक असणार्‍या सुमितने त्यांच्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त घरी पार्टीचे आयोजन केले होते. त्यासाठी भरपूर खर्चदेखील केला;  पण सगळ्यांनी नावेच ठेवली. हे बघून त्यांना वाईट वाटले आणि त्यांनी निर्णय घेतला येथून पुढे असे खर्च, असे कार्यक्रम करण्यापेक्षा आपण काही एक सामाजिक ऋण उचलूया. त्यातले ‘स्वागत लेकीचे’ हे पहिले पाऊल.

पूजा सांगत होती, जातीयवाद, मीपणा आणि अहंकाराचे कपडे आम्ही उभयतांनी जाळून टाकले आणि निव्वळ माणुसकीचे वस्त्र परिधान केले व खर्‍या गरजूंसाठी जगण्याचे व्रत घेतले. एकदा पूजाला मुलीच्या बाळंतपणात रक्ताची गरज नसतानाही हॉस्पिटलमध्ये रक्ताची मागणी केली गेली व रक्त तिला न वापरता अन्य रुग्णासाठी वापरले. कारण पुजाला रक्ताची कमतरता नव्हतीच. आपली फसवणूक झाली हे लक्षात आलेच; पण सामान्य रुग्णाची ही होणारी फसवणूक बघून त्यांनी रक्तदान शिबीर घेण्यास सुरुवात केली. रक्तदान शासकीय रुग्णालयच करा, असे आवाहन करण्यासही सुरुवात केली. कारण खाजगी रक्तपेढ्यांमध्ये १,८०० रुपयांत आपले रक्त विकले जाते. रक्ताचाही बाजार होतोय हे निदर्शनास आणून दिले.

औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयातील (घाटी) अनेक गरीब रुग्णांना तर त्यांचा आधार वाटतो. कारण ते दोघे रुग्णांना जेवणाचे डबे देण्यापासून औषधी देण्यापर्यंत सगळी मदत स्वखर्चाने करतात. कधी-कधी तर १५, १६ डबेदेखील करावे लागतात. गाडगेबाबा धर्मशाळेत रोज १०८ केळीचे वाटप करतात. एवढेच नाही तर मध्यंतरी पूजा आणि सुमितने त्यांची मुलगी लक्ष्मीसह ‘म्हैसाळ भ्रूणहत्येच्या निषेधार्थ’ डॉ. खिद्रापुरे यांच्या विरोधात कर्ज काढून आंदोलनही केले होते. स्त्रीभ्रूणहत्येविरोधात पत्रके वाटली होती.

पूजा सांगत होती मुलीसह आम्ही निघतो, जिथे कुठे आम्हाला दाढी-केस वाढलेले, अस्वच्छ अवस्थेतले भिकारी, मनोरुग्ण दिसतात त्यांची हे दाढी-कटिंग करतात. मग आम्ही त्यांना स्वच्छ अंघोळ घालतो. नवीन कपडे घालायला देतो. माणसात आणतो, भीक मागण्यापासून परावृत्त करतो. गरज असेल त्यांना दवाखान्यात पोहोचवतो. औषधी पुरवतो. अशा पद्धतीने त्यांचे ‘स्वच्छ भारत मिशन’ कोणताही गाजावाजा, फोटोशूट, बातम्या याशिवाय चालू असते. हे सारे ऐकताना न राहवून मी विचारलेच हे सारे परवडते कसे, तेही कोणाची मदत न घेता? ती म्हणाली, आमचे जटवाडा परिसरात सलून आहे. आम्ही खूप साधेपणाने राहतो, साधेच खातो, यांना कोणतेही व्यसन नाही; पण हे असे समजतात, की मी आज एवढी दारू प्यायलो त्याचे एवढे रुपये, सिगारेट ओढली त्याचे एवढे पैसे, पुडी खाल्ली त्याचे इतके, असे करून काही पैसे बाजूला काढत राहतात व तो पैसा समाजातील फक्त गरजूंसाठीच वापरतात आणि ते हे पुन: पुन्हा तपासूनही घेतात, की खरंच हे गरजू आहेत ना? कारण गैरफायदा घेणारे, आळशी, सारे काही फुकट मिळवण्याची सवय असणारे अनेक जण अनेक वेळा सापडलेले आहेत. ती म्हणाली, आजची दारू पिणारी, सिगारेट ओढणारी, तंबाखू, पुड्या खाणारी, वेळ वाया घालवणारी पिढी बघून फार वाईट वाटते व यांचा अभिमान वाटतो. ते आई-वडिलांनासुद्धा दरमहा १० हजार रुपये देतात.

आम्ही कोणतीही पूजा, धार्मिक कृत्य करीत नाहीत, मंदिरात जात नाही. मात्र, माणसात देव पाहतो व त्यांचाच आशीर्वाद घेतो. ‘दुनिया में आकर कमाया खूब, क्या हिरे-क्या मोती, लेकीन कफन को जेब नहीं होती’ हे सत्य आम्ही समजलो आहोत. माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांना आम्ही आदर्श मानतो. त्यांचे विचार कृतीत आणतो. आतापर्यंत नागपूर, बुलडाणा, चिखली, औरंगाबाद येथील मिळून एकूण ८८ चेहरे बदलले आहेत. ३६८ बॅग रक्तपुरवठा केला आहे. दोन वर्षांपूर्वी तर स्वत:ची ड्रीमयुगा ही गाडी विकून १,१०० विद्यार्थी, विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप केले. वस्तीशाळांमध्ये, गावागावांमध्ये जाऊन कीर्तन करणे, मुलींच्या शिक्षणाचा जागर करणे अव्याहत चालू असते. अवघ्या २३ वर्षे वयाचे हे दोघे, दोघे मिळून बी.ए. करीत आहेत. दुसरे पिलू येऊ घातले आहे, अशाही अवस्थेत ती अहोरात्र कष्टतेय. कधी कुणाचे पालकत्व, तर कधी अनाथ पालकांचे मानसपुत्र होऊन ते खांदाही देत आहेत. वंचितांचे अश्रू पुसणारे हे या दोघांचे हात बघून ‘दिव्यत्वाची जेथ प्रचीती, तेथे कर माझे जुळती’ म्हणत यांच्या प्रबोधनात्मक विविध कार्यांपुढे नतमस्तक होत मी थांबते.
( priyadharurkar60@gmail.com)

Web Title: Kafan does not have a pocket ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.