खेळ नियतीचा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 06:42 PM2018-02-17T18:42:50+5:302018-02-17T18:43:01+5:30

दिवा लावू अंधारात : नियतीने मांडलेला दु:खाचा खेळ किती भयंकर असू शकतो याची कल्पनाही आपण करू शकत नाही. इतक्या महाभयंकर घटना ऊसतोड कामगारांच्या आयुष्यात घडतात. रात्रंदिवस पाचरटात राबणारा, काबाड कष्ट आणि कुपोषणाने काष्ठ झालेला तो जीव सर्व काही नियतीचे आघात सहन करीत असतो. ऐकणार्‍याला आणि बघणार्‍याला ते सहन होत नाही, तर प्रत्यक्ष त्याची अवस्था काय होत असेल?

Game of Destiny | खेळ नियतीचा 

खेळ नियतीचा 

googlenewsNext

- दीपक नागरगोजे

पाटोदा तालुक्यातील थेरला हे गाव. बालाघाटात वसलेले. खडकावर वसलेल्या गावाची शेतीही मुरमाड, खडकाळ आणि डोंगराळ उताराची. गावात पाण्याचा प्रश्न गंभीर. पावसाची वेळेवर बरसात झाली, तर कसेबसे एक पीक पदरात पडते. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. हा मंत्र गावात बर्‍यापैकी माहीत झालेला असल्याने मिळेल ते शिक्षण घेऊन अनेक जणांनी सरकारी नोकर्‍या मिळवलेल्या. भारतीय लष्करात जात अनेक तरुणांनी देशसेवेबरोबरच आपल्या कुटुंबाचाही आर्थिक प्रश्न सोडवला. गावातील इतर कुटुंबे मोठ्या संख्येने ऊसतोडीसाठी वर्षातील सात-आठ महिने पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांवर स्थलांतरित होतात. या गावचे तत्कालीन सरपंच शिवाजी राख हे सामाजिक कार्यकर्ते विमल बिस्वास यांना घेऊन शांतिवनमध्ये भेटायला आले. विमल बिस्वास हे सामाजिक जाणीव आणि वंचित घटकांविषयी प्रेम असणारे कार्यकर्ते. शांतिवनचे उपाध्यक्ष सुरेश जोशी आणि मी लेकरांसोबत गप्पा मारत बसलेलो. हे दोघे आल्यानंतर मुलांपासून बाजूला जाऊन आम्ही बोलत बसलो.

सरपंचांनी थेरल्यातील भीमराव राख यांच्या परिवाराची कथा सांगत तीन मुलांना आधाराची नितांत गरज असल्याचे सांगितले. ही कहाणी ऐकून जोशी काका हादरून गेले. दुसर्‍या दिवशी होम व्हिजिट कर, असे त्यांनी सांगितले. दोन दिवसांनंतर थेरल्यात पोहोचलो. सरपंचांना घेऊन भीमराव यांच्या घराकडे निघालो. गावाबाहेर मुख्य रस्त्यापासून बरेचसे दूर उजाड माळरानावर चार घरांची वस्ती आणि त्या वस्तीत मोजून सहा पत्र्यांचे एक शेड. समोर दिसणारी बरडवजा एक एकर जमीन. तेवढीच या कुटुंबाची स्थावर मालमत्ता. अंगणात भीमरावच्या पत्नी लक्ष्मीबाई आणि घटस्फोटित मुलगी जिजाबाई आमची वाट पाहत बसलेल्या. सूरज, श्रुती आणि शुभांगी ही तीन नातवंडे समोर खेळत होती. आम्ही बसलो आणि बोलू लागलो. घरात असणारे अठरा विश्वे दारिद्र्य दिसत होते. लक्ष्मीबाई बोलू लागल्या, ‘घरावर कर्जाचा डोंगर झाला होता. आयुष्यभर ऊसतोड करूनही बरे दिवस येत नव्हते. अवघी एक एकर माळरानाची जमीन चार दाणेही पदरी टाकत नाही. दोन मुले. त्यातील मुलीचे लग्न झाले. मात्र, सासरच्यांनी तिचा छळ करून माहेरी पाठवले. मुलगा शिवाजी यालाही आम्ही शिकवू शकलो नाहीत. त्याच्यावरही ऊसतोड करण्याचीच वेळ. भीमरावची चिडचिड वाढत होती.

प्रचंड मानसिक ताणतणाव सहन होत नव्हता. एक दिवस दुपारी कसल्यातरी विचाराचे काहूर डोक्यात घेऊन ते घरी आले. जगायचे नाही. दोघांनीही मरायचे, असे म्हणत घरात ठेवलेली रॉकेलची कॅन माझ्या अंगावर ओतली आणि मला पेटवून दिले. आगीच्या वेदना सहन न होणार्‍या. मी ओरडू लागले. जवळ असणारी चार माणसे धावली. रांजणातील पाणी उपसून त्यांनी अंगावर फेकले. विझवून काही वेळातच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तेवढ्यात भीमरावने मला पेटवून दिल्यानंतर पळत जाऊन एका पाण्याने भरलेल्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. मला माणसांनी वाचवले; पण भीमरावला कुणी वाचवू शकले नाही. डॉक्टरांनी माझा जीव वाचवला; पण ८० टक्के भाजलेला माझा देह दुरुस्त करण्यात त्यांना अपयश आले. दोन्ही हात कायमचे अपंग झाले. जिवंत असून नसलेली. संपूर्ण जबाबदारी एकुलता एक मुलगा शिवाजीवर आली. त्यातही नियतीने पुन्हा डाव साधला.

बापाचे कर्ज फेडण्यासाठी पत्नी नंदूबाई आणि लहान तीन लेकरांना घेऊन तो कारखान्यावर गेला. ऊस घेऊन जाण्यासाठी बैलगाडी जुंपत असताना लांब शिंगाच्या खिल्लारी बैलाने शिवाजीच्या पोटात आरपार शिंगं खुपसले. डोक्यावर उचलून जमिनीवर आदळले. घायाळ किडकिडीत शिवाजीचा जागीच मृत्यू झाला. पुन्हा केवढा मोठा प्रसंग आमच्या घरावर...! एवढेच कमी होते की काय कुणास ठाऊक... शिवाजीचा अंत्यविधी झाला. अपंग सासू, घटस्फोटित नणंद, तीन लेकरं या सार्‍यांची जबाबदारी आता पेलवायची कशी...? मुलांना मोठे करायचे कसे...? कर्ज फेडायचे कुणी...?  अशा अनेक विचारांनी भयभीत झालेल्या शिवाजीची पत्नी नंदूबाईने वेगळाच विचार केला. चार वर्षांपूर्वी ती घर सोडून निघून गेली. पुन्हा परत फिरकलीच नाही. आता या संपूर्ण परिवाराची जबाबदारी माझ्यावर आहे. मी अशी अपंग. काय काम करू आणि या लेकरांना काय खाऊ घालू तुम्हीच सांगा. एवढे काय वाईट केले होते आम्ही त्या देवाचे...? का आमच्यावर त्याने ही वेळ आणली...? कुटुंबाची कहाणी सांगत असताना लक्ष्मीबार्इंच्या ओथंबलेल्या डोळ्यांतील अश्रू बघून आम्हा सर्वांच्या डोळ्यांना आपोआप धारा लागल्या. आजीला रडताना पाहून बाजूला खेळत असलेली लेकरे आजीजवळ बसून रडू लागली. किती हे दु:ख. मे महिन्याच्या रखरखत्या उन्हातही आम्ही थंडगार पडलो होतो.

‘या मुलांना आम्ही शाळेत घेऊन जाऊ, त्यांचे पालन-पोषण करू, त्यांना त्यांच्या पायावर उभे करू. पाठवाल का...?’ माझ्या या प्रश्नांवर त्या लगेच हो म्हणाल्या. एकूणच गावाला शिक्षणाचे महत्त्व माहीत असल्याने त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगण्याची गरज पडली नाही. सूरज, शुभांगी, श्रुती या तिन्ही मुलांना पालन-पोषण आणि शिक्षणासाठी दत्तक घेऊन आम्ही शांतिवनला घेऊन आलो. आज सूरज सहावीत, शुभांगी व श्रुती दोघीही तिसरीत शिकत लहानाची मोठी होत आहेत. लेकरांना हसतखेळत मोठी होताना पाहून लक्ष्मीबार्इंच्या चेहर्‍यावर आनंद मावत नाही.
(deepshantiwan99@gmail.com)

Web Title: Game of Destiny

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.