खडकीतील ग्रामसभेत पाणी पेटले

By Admin | Published: March 19, 2017 12:21 AM2017-03-19T00:21:03+5:302017-03-19T00:21:03+5:30

गावातील विहिरीत थेंबभर पाणी नाही. पाणी पुरवठा योजनेची जुनी व नव्याने खोदलेली बोअरवेल्स आतून बुजली. उपसा केल्यानंतरही उपयोगी नाही.

Water in the Gram Sabha of Khadki was burnt | खडकीतील ग्रामसभेत पाणी पेटले

खडकीतील ग्रामसभेत पाणी पेटले

googlenewsNext

जलसंसाधनांच्या विविध कामांना मंजुरी : वनसमिती नव्याने गठित करण्याचा ठराव
करडी (पालोरा) : गावातील विहिरीत थेंबभर पाणी नाही. पाणी पुरवठा योजनेची जुनी व नव्याने खोदलेली बोअरवेल्स आतून बुजली. उपसा केल्यानंतरही उपयोगी नाही. तलाव, विहिरी कोरड्या पडल्याने करायचे तरी काय? अशा आरोप प्रत्यारोपांनी खडकी गटग्रामपंचायतीची ग्रामसभा गाजली.
सभेच्या अध्यक्षस्थानी देवाजी पचघरे होते. यावेळी वनपरिस्थितीकी समिती निष्क्रीय असल्याचा ठपका ठेवीत नव्याने समिती निवडण्याचा ठराव घेण्यात आला. खडकी गावात मागील ५० वर्षात कधी न पडलेला पाण्याचा दुष्काळ आहे. गावात वापरण्याचे पाणीही उपलब्ध नाही. सार्वजनिक पाणी पुरवठ्याची साधने कोरडी पडली आहेत. भूगर्भातील पाण्याची पातळी २० फुटाने खाली गेली. गावासभोवताल बोअरवेल्स खोदण्यात आल्याने व अनिर्बंध पाण्याचा उपसा करण्यात आल्याने गावाला विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
विहिरीतील माती कोरडी पडली आहे. तलावातील पाण्याचा साठा संपण्याच्या मार्गावर आहे. गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकण्याची वेळ आली आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायतने पुढाकार घेत गाळाने बुजलेली पाणी पुरवठा योजनेची बोअरवेल्स मशीनद्वारे उपसा करण्याचा प्रयत्न केला. परंतु २५० फुटापर्यंत उपसा केलेली बोअरवेल्स १२० फुटापर्यंत गाळाने बुजली. दुसरी बोअरवेल्स खोदण्याचा प्रयत्न केला असता पुरेसे पाणी बोअरवेल्सला लागले नाही.
सभेच्या सुरुवातीला करडीचे कृषी पर्यवेक्षक निमचंद्र चांदेवार यांनी जलयुक्त शिवार योजनेत नवेगाव, जांभळापाणी, दवडीपार, पालोरा, खडकी, बोंडे, डोंगरदेव आदी ७ गावांचा समावेश आहे. एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमातही परिसरातील गावाचा समावेश असल्याची माहिती दिली.
ग्रामसभेत तलाव, बोड्यांचे खोलीकरण, नाल्यांचे खोलीकरण, विहिरीतील गाळांचा उपसा, बंधाऱ्यातील साठलेल्या गाळांचा उपसा, आवश्यश तेथे बंधाऱ्याचे बांधकाम, मजगीची कामे आदींचे नियोजन करून ठराव घेण्यात आले. वादग्रस्त वनपरिस्थितीकी समिती संबंधाने दोन गटात वाद झाला. शेवटी विद्यमान समिती बरखास्त करून नव्याने समितीचे गठण करण्याचा ठराव घेण्यात आला.
सभेला सरपंच सारिका धांडे, उपसरपंच क्रिष्णा टेकाम, सर्व ग्रामपंचायत सदस्य करडीचे ठाणेदार प्रभाकर बोरकुटे, कृषी पर्यवेक्षक निमचंद्र चांदेवार, भाजपा तालुका अध्यक्ष बाबूजी ठवकर, सुभाष धांडे, तंमुस अध्यक्ष कातोरे, ग्रामसेविका गोकुळा सानप, कृषी सहाय्यक निखारे, रोजगार सेवक श्रीकृष्ण वरकडे, माजी तंमुस अध्यक्ष रामदास धुर्वे, राजेंद्र पुराम, दिनदयाल मदनकर, तिजारे, धांडे व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Water in the Gram Sabha of Khadki was burnt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.