पर्यावरण संवर्धन कार्यात सहभाग गरजेचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 10:12 PM2019-04-21T22:12:02+5:302019-04-21T22:12:33+5:30

लंडनला उच्चशिक्षण घेऊन भारतासारख्या देशात काम करण्याचे ठरविले. कारण वन्यजीवांचे संवर्धन हे अतिशय महत्त्वाचे आहे. जीवनात कोणतेही कार्य करताना ते आव्हानात्मक असल्याशिवाय जीवनात आनंद नसतो.

Participation in environmental conservation works | पर्यावरण संवर्धन कार्यात सहभाग गरजेचा

पर्यावरण संवर्धन कार्यात सहभाग गरजेचा

Next
ठळक मुद्देदिशा शर्मा : साकोलीच्या मनोहरभाई पटेल महाविद्यालयात पर्यावरण शास्त्र विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : लंडनला उच्चशिक्षण घेऊन भारतासारख्या देशात काम करण्याचे ठरविले. कारण वन्यजीवांचे संवर्धन हे अतिशय महत्त्वाचे आहे. जीवनात कोणतेही कार्य करताना ते आव्हानात्मक असल्याशिवाय जीवनात आनंद नसतो. म्हणून तरुणांना निराश न होता आपल्या आवडीचे क्षेत्र निवडावे व पर्यावरण वन्यजीवांचे संवर्धन करावे, असे प्रतिपादन पशुवैद्यकीय वन्यजीव अधिकारी डॉ.दिशा शर्मा यांनी केले
साकोली येथील मनोहरभाई पटेल महाविद्यालयात पर्यावरण शास्त्र विषय शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हरीश त्रिवेदी हे होते. व्याख्यानमालेचे प्रमुख वक्ते म्हणून वाईल्ड लाईफ ट्रस्ट आॅफ इंडिया, दिल्लीतर्फे क्षेत्रीय अधिकारी व समाजशास्त्रज्ञ महेंद्र राऊत, क्षेत्रीय पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.दिशा शर्मा व क्षेत्रीय अधिकारी व जीवशास्त्रज्ञ निखील दांडेकर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख वक्त्यांच्या स्वागतानंतर नेचर क्लबचे संयोजक डॉ.एल.पी. नागपूरकर यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी या व्याख्यानमालेचे महत्त्व पर्यावरण शास्त्रीय विद्यार्थ्यांना पटवून दिले व म्हणाले, पर्यावरण व वन्यजीव संरक्षण व संवर्धन अत्यंत महत्त्वाचे आहे. विविध स्तरावर हे कसे करता येते हे स्पष्ट केले तर पर्यावरण व वन्यजीव संवर्धनाचे कायदे व धोरणे लोकांच्या व समाजाच्या हितासाठी आहेत. त्या दिशेने कार्य करताना आपली कार्यशैली व लोकांचे हित या दोन्ही बाजू समतोलपणे सांभाळाव्या लागतात हे स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे वक्ते व क्षेत्रीय अधिकारी महेंद्र राऊत यांनी पर्यावरणशास्त्र शिकताना ते कृतीशील असावे व प्रत्यक्षपणे वेगवेगळ्या जैविक क्षेत्रांचा अभ्यास होणे व पर्यावरणाच्या संवर्धनाचे बारकावे समजून घेणे व शाश्वत कार्यप्रणाली कशी सांभाळावी, यावर भर दिला. विद्यार्थ्यांना आग्रह केला की, नेचर क्लबच्या माध्यमातून विशिष्ट उपक्रमामध्ये सहभागी होऊन सर्वांना हे उत्तमरीत्या शिकता येतो म्हणून सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. यावेळी त्यांनी एक चित्रफित दाखवून वन्यजीव संवर्धनात केलेल्या वैशिष्टपूर्ण कार्याचा आढावा दिला.
कार्यक्रमाचे तिसरे वक्ते निखील दांडेकर यांनी वन्यजीव संवर्धनात नोकरीच्या संधी या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले की, आपण कुठलेही शिक्षण जरी घेत असाल तरी वन्यजीव संवर्धनाच्या विभिन्न स्तरावर तुम्हाला कार्य करण्यासाठी प्रचंड वाव आहे. त्यासाठी शिक्षणाच्या प्रत्येक पातळीवर आपण फावल्या वेळात वेगवेगळ्या संस्थेसोबत कार्य करावे. ज्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो व ज्ञानात वृद्धी होते. तेच आपल्या जीवनात लाभकारी ठरते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हरीश त्रिवेदी म्हणाले की, आजच्या तिन्ही वक्त्यांच्या ज्ञानाचा व कार्यशैलीचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी वन्यजीव संवर्धन या राष्ट्रीय कार्यात मोलाचे योगदान द्यावे व शिक्षणाला अर्थ प्रदान करावा हे स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन अनुष्का सिंग हिने केले. कार्यक्रमाप्रसंगी प्राध्यापकवृंद व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाकरिता डॉ.सी.जे. खुणे, प्रा.अमीत जगीया, डॉ.धार्मीक, गणवीर, गौरव गणवीर, साक्षी जगीया, हेमा सोनवाने, काजल भांडारकर, प्रियांशी थानथराटे यांनी सहकार्य केले.
 

Web Title: Participation in environmental conservation works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.