सार्वजनिक बांधकाममध्ये शिवसैनिकांकडून तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 10:11 PM2018-09-19T22:11:15+5:302018-09-19T22:11:37+5:30

स्त्री रुग्णालयासाठी आवश्यक निधीची तरतूद झाल्यानंतरही बांधकाम विभाग प्रक्रिया हेतूपुरस्सर लांबणीवर टाकत असल्याने संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी बुधवारी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर हल्लाबोल करीत तोडफोड केली. कार्यकारी अभियंता उपस्थित नसल्याने त्यांच्या खुर्चीला काळे फासून हार घालण्यात आला. माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात असंख्य शिवसैनिक या कार्यालयावर धडकले होते.

Disrupted public works by Shiv Sainiks | सार्वजनिक बांधकाममध्ये शिवसैनिकांकडून तोडफोड

सार्वजनिक बांधकाममध्ये शिवसैनिकांकडून तोडफोड

googlenewsNext
ठळक मुद्देस्त्री रुग्णालयाचा प्रश्न : अभियंत्याच्या खुर्चीला काळे फासून घातला हार

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : स्त्री रुग्णालयासाठी आवश्यक निधीची तरतूद झाल्यानंतरही बांधकाम विभाग प्रक्रिया हेतूपुरस्सर लांबणीवर टाकत असल्याने संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी बुधवारी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर हल्लाबोल करीत तोडफोड केली. कार्यकारी अभियंता उपस्थित नसल्याने त्यांच्या खुर्चीला काळे फासून हार घालण्यात आला. माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात असंख्य शिवसैनिक या कार्यालयावर धडकले होते.
स्त्री रुग्णालयाच्या बांधकामासंदर्भात शिवसेनेच्या वतीने जिल्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शासनाच्या वेळकाढू धोरणावर संताप व्यक्त करण्यात आला. या बैठकीनंतर दुपारी ३ वाजता माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या उपस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय गाठले. त्याठिकाणी कार्यकारी अभियंता गैरहजर होते. त्यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. परंतु समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाही. त्यामुळे शिवसैनिकांचा संताप अनावर झाला. कार्यकारी अभियंत्यांच्या कक्षात प्रवेश करून शिवसैनिकांनी ठिय्या दिला. अभियंत्यांच्या रिकाम्या खुर्चीला काळे फासून हार घालण्यात आला. तर कार्यकारी अभियंत्यांच्या कक्षाबाहेर असलेल्या आवक जावक केबीनच्या काचा फोडून शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला. या घटनेने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नरेंद्र भोंडेकर भंडाराचे आमदार असताना स्वतंत्र स्त्री रुग्णालय मंजूर करण्यात आले होते. यासाठी भोंडेकर यांनी पाठपुरावा केला होता. या रुग्णालयासाठी ४२ कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला. परंतु रुग्णालय बांधकामाकडे संबंधित विभागाने कायम दुर्लक्ष केले. गत हिवाळी अधिवेशन काळात नरेंद्र भोंडेकर यांच्या पाठपुराव्याने २५ लाख रुपये टोकन निधी उपलब्ध करून दिला. परंतु या रुग्णालयाच्या बांधकामाचे अंदाजपत्रक तयार झाले नाही. शासन सकारात्मक असताना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मात्र दुर्लक्ष केले जात आहे. २८ फेब्रुवारी रोजी शिवसेनेने याच विषयावरून कार्यकारी अभियंत्यांना घेराव घातला होता. परंतु सहा महिन्यानंतरही काहीच कारवाई झाली नाही. त्यामुळे शिवसैनिक संतप्त झाले.
या आंदोलनात शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख लवकुश निर्वाण यांच्यासह जिल्हा व तालुकास्तरीय पदाधिकारी तसेच अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आंदोलन तीव्र करणार
११ लाख लोकसंख्येच्या भंडारा जिल्ह्यात महिलांची संख्या सुमारे साडेपाच लाख आहे. त्यांच्या आरोग्याची समस्या गंभीर असताना रुग्णालयाच्या प्रती बांधकाम विभाग उदासीन आहे. अद्यापही निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली नाही. तात्काळ सुरु झाले नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.

Web Title: Disrupted public works by Shiv Sainiks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.