आश्रमशाळा सौर उर्जेवर आणणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 12:39 AM2018-12-23T00:39:40+5:302018-12-23T00:41:25+5:30

आदिवासी विकास विभागाला शासनाने स्वतंत्र व मोठे बजेट दिले असून या निधीचा उपयोग आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी करण्यात यावा. विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी आदिवासी विभागाच्या सर्व शाळा डिजीटल करण्यात याव्यात.

AshramSala will bring solar energy | आश्रमशाळा सौर उर्जेवर आणणार

आश्रमशाळा सौर उर्जेवर आणणार

Next
ठळक मुद्देचंद्रशेखर बावनकुळे : भंडारा येथे आदिवासी विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धेला प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : आदिवासी विकास विभागाला शासनाने स्वतंत्र व मोठे बजेट दिले असून या निधीचा उपयोग आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी करण्यात यावा. विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी आदिवासी विभागाच्या सर्व शाळा डिजीटल करण्यात याव्यात. आश्रमशाळा सौर उर्जेवर आणण्याचा प्रस्ताव आदिवासी विभागाने त्वरित पाठवावा. या प्रस्तावास निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
आदिवासी विकास विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल भंडारा येथे करण्यात आले. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री बोलत होते.
यावेळी आदिवासी विकासचे अप्पर आयुक्त ऋषीकेश मोडक, जिल्हाधिकारी शांतनू गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू, प्रकल्प अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, सचिन ओंबासे, योगेश कुंभोजवर, जितेंद्र चौधरी, दिगंबर चव्हाण, केशव बावनकर, मोरे, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल व महर्षि विद्या मंदिरच्या प्राचार्या श्रुती ओहाळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आदिवासी विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले.
आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी यावेळी विविध विषयावरील झाकीचे प्रदर्शन करण्यात आले. यात प्रामुख्याने आरोग्य, मतदान जागृती, ताडोबा, पर्यावरण यांचा समावेश आहे. सर्व प्रकल्पातील विद्यार्थ्यांनी पाहुण्यांना मानवंदना दिली. यावेळी खेळाडूंना शपथ देण्यात आली. २ हजार ७०० मुलांनी व ३०० शिक्षकांनी या स्पर्धेत भाग घेतला आहे.
क्रीडा स्पर्धेमधून विद्यार्थ्यांच्या क्रीडा कलागुणांचा विकास होत असून आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्याची संधी प्राप्त होणार आहे, असे पालकमंत्री म्हणाले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये क्षमता निर्माण करुन आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच क्रीडा क्षेत्रातही नैपुण्यप्राप्त करावे, असे पालकमंत्री म्हणाले.
प्रास्ताविक सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी केले.
२२ ते २५ डिसेंबर या कालावधीत आयोजित क्रीडा स्पर्धेसोबतच आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारी व अस्मिता जपणारी हस्तकला प्रदर्शनी, सांस्कृतिक कार्यक्रम, विज्ञान प्रदर्शन व योजनांची माहिती देणारी प्रदर्शनी तसेच व्यसनमुक्ती जनजागृती अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन आदिवासी विभागातर्फे करण्यात आले आहे. या प्रदर्शनीस पालकमंत्र्यांनी भेट दिली.
विभागीय क्रीडा स्पर्धेत नागपूर आदिवासी विकास विभागांतर्गत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली, अहेरी, भामरागड, चंद्रपूर, चिमूर, नागपूर, देवरी व भंडारा अशा आठ प्रकल्पातील १४, १७ व १९ वर्ष वयोगटात मुलांच्या तसेच मुलींच्या क्रीडा स्पर्धा होणार आहेत. यावेळी विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.

Web Title: AshramSala will bring solar energy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा