रामनवमी उत्सव महाप्रसादातून २० जणांना विषबाधा

By युवराज गोमास | Published: April 18, 2024 09:21 PM2024-04-18T21:21:41+5:302024-04-18T21:26:04+5:30

गणेशपूर येथील घटना : जिल्हा सामान्य रूग्णालय व खासगीत उपचार

20 people poisoned from Ram Navami festival Mahaprasad | रामनवमी उत्सव महाप्रसादातून २० जणांना विषबाधा

रामनवमी उत्सव महाप्रसादातून २० जणांना विषबाधा

भंडारा : शहराला लागून असलेल्या गणेशपूर येथे श्रीरामनवमीनिमित्त गोपालकाला प्रसाद व महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. अन्नातून सुमारे २० जणांना विषबाधा झाली. यात ५ पुरूष व १५ महिलांचा समावेश आहे. यातील १४ जणांवर जिल्हा सामान्य रूग्णालयात तर सहा जणांवर शहरातील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.

गणेशपूर येथील नेहरू वॉर्ड गुरुकुंज कॉलनीतील गणेश मंदिरात स्थानिकांच्यावतीने १७ एप्रिल रोजी श्रीरामनवमी जन्मोत्सवानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसाद अंदाजे तीन ते सहा वाजताचे दरम्यान तयार करण्यात आला. सायंकाळी ७ वाजतापासून १० वाजतापर्यंत महाप्रसाद व प्रसादाचे वितरण करण्यात आले. जवळपास ३०० जणांनी लाभ घेतला. महाप्रसादामध्ये मसालेभात, कढी व जलेबीचा तर प्रसादामध्ये पोहा, रव्याचा शिरा आदीचा समावेश होता.

अशी आहेत रूग्णांची लक्षणे
महाप्रसाद व प्रसाचे सेवन करणाऱ्यांपैकी काहींना रात्री तर काहींना सकाळी त्रास सुरू झाला. यात प्रामुख्याने उलटी, ताप, मळमळ, पातळ शौच व पोट दुखणे आदी लक्षणांचा समावेश आहे.

यांच्यावर सुरू आहेत उपचार
जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू असलेल्यांमध्ये सुरूवरी लेकचंद रूसेश्वरी (१५, रा., घोटमुुंढरी, ता., मौदा), रूषी सुनिल वरखडे (४०), श्रवणी शामराव टेंभुरकर (१९), योगीता भुमेश्वर मडावी (३५), सुनिता सुरेश गोखले (५२), पीयूष भुमेश्वर मडावी (१२), संगिता सुरेश बेलेकर (४४), प्रांजली पुंडलीक बडोले (२५), खुशी संजय कोवे (१३), अर्चना अनिल जावळकर (४९), शालू सुशिल जावळकर (४४), सुरेश महेश्वर गोखले (५७), नंदा तेजराम होरे (४५), शंतनू तेजराम होरे (१७, सर्व रा. विद्यानगर, भंडारा) यांचा समावेश आहे. डॉ. निर्वाण यांच्याकडे भरती असलेल्यांमध्ये अंकीत देशमुख (२०), प्रांजली लोखंडे (२४), निलिमा लोखंडे (४७), स्नेहल लोखंडे (२०), नामदेव लोखंडे (५६), रोहीणी बांते (२६), सर्व रा. गणेशपूर यांचा समावेश आहे.
कोट

अन्नाचे नमूने पाठविले तपासणीसाठी
महाप्रसादातील चारही अन्न नमुने नागपूर येथे तर दोन पाणी नमुने जिल्हा प्रयोगशाळा भंडारा येथे तपासणीकरीता पाठवण्यात आले. अन्नातून विषबाधेचा अंदाज आहे. अहवालानंतर नेमके काय घडले हे निश्चित होईल. या भागांमध्ये रुग्ण सर्वेक्षण तसेच पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे शुद्धीकरण तसेच जनजागृती करण्यात आली आहे.
- डॉ. मिलिंद सोमकुवर, जिल्हा आरोग्य अधिकारी.

सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर
जिल्हा सामान्य रूग्णालयात १४ जण उपचार घेत आहेत. सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. आवश्यक तपासण्या करण्यात आलेल्या आहेत.
- डॉ. दीपचंद सोयाम, जिल्हा शल्य चिकित्सक, भंडारा.

Web Title: 20 people poisoned from Ram Navami festival Mahaprasad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.