The 15-day Ultimatum of the protesters | आंदोलकांचा पालिकेला १५ दिवसांचा अल्टिमेटम

ठळक मुद्देवातावरण तापले : काँग्रेस, शिवसेना, फुटपाथधारकांचा हल्लाबोल

आॅनलाईन लोकमत
भंडारा : अव्वाचा सव्वा गृहकर वाढीवरून भंडारा शहरात राजकीय वातावरण तापले आहे. गृहकर वाढ, अतिक्रमण निर्मूलन या दोन्ही ज्वलंत मुद्यांवर १५ दिवसांच्या आत तोडगा काढावा, अशी मागणी संतप्त मोर्चेकºयांनी केली. वारंवार चर्चा करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करून दाखवा, असा इशारा आंदोलकांनी पालिका मुख्याधिकाºयांना दिला आहे.
काँग्रेस, शिवसेना, फुटपाथ दुकानदार संघटनेने गुरूवारला दुपारी १२ वाजताच्या सुमारास नगर पालिका कार्यालयावर हल्लाबोल केला. यावेळी त्यांना हा अल्टीमेटम देण्यात आला. आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष जिया पटेल, माजी नगरसेवक धनराज साठवणे यांनी केले. सकाळी ११ वाजतापासून पालिका कार्यालयात कार्यकर्ते व नागरिकांची गर्दी वाढू लागली. पोलिसांचा बंदोबस्तही तैनात होता. घोषणाबाजी देत आंदोलकाचे शिष्टमंडळ मुख्याधिकारी अनिल अढागळे यांच्या कक्षात चर्चेसाठी गेले. यावेळी मुख्याधिकाºयांच्या दालनात नरेंद्र भोंडेकर, जिया पटेल, धनराज साठवणे, अ‍ॅड.शशिर वंजारी, डॉ.नितीन तुरस्कर, नगरसेवक शमीम शेख, राजकपूर राऊत, सचिन घनमारे, अजय गडकरी, मिर्झा अख्तर बेग यासह काँग्रेस, शिवसेना व फुटपाथ संघटनेचे सदस्य, कार्यकर्ते उपस्थित होते. चर्चेदरम्यान फुटपाथ दुकान धारकांचे अतिक्रमण निर्मूलनाची प्रक्रिया थांबविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. याशिवाय वाढीव गृहकराच्या बाबत कार्य केलेल्या कर्मचाºयांना येथे पाचारण करून कर कसा वाढविण्यात आला याचा सर्वांसमक्ष जाब विचारा, अशी मागणी करण्यात आली. चर्चेअंती वाढीव गृहकर व अतिक्रमण निर्मूलनाबाबत १५ दिवसात समिती गठित करून निर्णय घेण्यात येईल, असे ठोस आश्वासन मुख्याधिकारी अनिल अढागळे यांनी दिले.
दरम्यान, आंदोलकांनी घोषणाबाजी करीत पालिकेच्या दारावर उभे असलेल्या कार्यकर्ते व नागरिकांना चर्चेदरम्यान झालेल्या आश्वासनाची माहिती दिली. १५ दिवसात आश्वासनांची पुर्तता न झाल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही देण्यात आला.
राष्ट्रवादीची भूमिका संदिग्ध
गुरूवारी झालेल्या हल्लाबोल आंदोलनात काँगे्रस, शिवसेनेने नागरिकांच्या मुद्यावर पुढाकार घेत आंदोलनात उडी घेतली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आजी-माजी नगरसेवक, कार्यकर्ते दिसले नाही. सत्ता भाजपचीच असल्याने त्यांचे नगरसेवक आंदोलनात नसणे ही बाब मनाला पटणारी असली तरी वाढीव गृहकराच्या बाबतीत पालिकेच्या सभेत भाजप नगरसेवकांनी यापूर्वी चांगलाच हल्लाबोल केला होता, हे येथे उल्लेखनीय.


Web Title: The 15-day Ultimatum of the protesters
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.