नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ‘दुसऱ्या स्थानी’ चंद्र म्हणजे धनलाभ पक्का; ‘चांदोबा’चं पत्रिकेतील स्थानमहात्म्य

By देवेश फडके | Published: February 13, 2024 05:11 PM2024-02-13T17:11:03+5:302024-02-13T17:15:07+5:30

Navgrahanchi Kundali Katha: चंद्राच्या स्थितीवरून रास ठरते आणि कुंडलीही तयार केली जाते. जाणून घ्या...

navgrahanchi kundali katha know about significance of moon planet in astrology and chandra graha impact on janm patrika | नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ‘दुसऱ्या स्थानी’ चंद्र म्हणजे धनलाभ पक्का; ‘चांदोबा’चं पत्रिकेतील स्थानमहात्म्य

नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ‘दुसऱ्या स्थानी’ चंद्र म्हणजे धनलाभ पक्का; ‘चांदोबा’चं पत्रिकेतील स्थानमहात्म्य

देवेश फडके.

Navgrahanchi Kundali Katha: सूर्य हा तेज, अक्षय ऊर्जा, प्राणीमात्रांचे जीवन मानला गेला आहे. नवग्रहांच्या मालिकेतील पुढील ग्रह चंद्र हा शीतल, सौम्य आणि पृथ्वीवरील अनेक घटनांचा कारक मानला गेला आहे. अनंत पसरलेल्या ब्रह्मांडात जसे चंद्राला महत्त्व आहे, तसे आपल्या जीवनाशी संबंधित अनेक गोष्टींमध्ये चंद्राचे स्थान विशेष मानले गेले आहे. चंद्राला पृथ्वीचा भाऊ मानले गेले आहे. कवी, गीतकार, शायर यांनी चंद्राचा उपमा म्हणून वापर करत अप्रतिम निर्मिती केलेली पाहायला मिळते. अगदी बालपणी ‘चांदोबा चांदोबा भागलास काय’ किंवा ‘लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई’ या गोड गाण्यांतून चांदोमामाची आपल्याला ओळख होते. त्यानंतर किशोरवयात, तारुण्यात ‘चांद सी मेहबुबा हो मेरी’, ‘चंद्र आहे साक्षीला’ या स्वरुपात चंद्र आपल्याला अधिक जवळचा वाटतो. त्यानंतर ‘रजनीनाथ हा नभी उगवला’पासून ते एखाद्या व्यक्तीला दीर्घायुष्य लाभल्यानंतर ‘सहस्रचंद्रदर्शन’ सोहळ्यापर्यंत जीवनाच्या विविध टप्प्यावर चंद्र आपली सोबत करत असतो. ‘आकाशात सूर्य आणि चंद्र आहेत, तोपर्यंत...’ अशा आशयाचे दाखलेही दिले जातात.   

धार्मिक दृष्टीनेही आपल्याकडे चंद्राला महत्त्व आहे. संकष्ट चतुर्थीला चंद्रोदय झाल्याशिवाय उपवास सोडत नाहीत. मुस्लिम धर्मात ‘ईद का चाँद’ महत्त्वाचा मानला जातो. पृथ्वीवरील भरती-ओहोटी चंद्रावर अवलंबून असल्याचे सांगितले जाते. भौतिक, धार्मिक, खगोलशास्त्रात जसे चंद्राला महत्त्व आहे, तसेच ज्योतिषशास्त्रातही चंद्राला विशेष स्थान आहे. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. पृथ्वीभोवती सुमारे साडे सत्तावीस दिवसात प्रदक्षिणा पूर्ण करतो. रविपासून निघून पुन्हा रविपर्यंत प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी चंद्राला सुमारे साडे एकोणतीस दिवस लागतात. पृथ्वीपासून चंद्राचे अंतर सुमारे २ लक्ष ४० हजार मैल आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्र एका राशीत सुमारे सव्वादोन दिवस असतो. कुंडलीत चंद्राला महत्त्व असून, चंद्रराशीप्रमाणेही कुंडली तयार केली जाते. नवग्रहांमध्ये चंद्र हा शीघ्रगती ग्रह आहे. चंद्र चंचल ग्रह मानला गेला आहे. चंद्रदर्शन झाले, चांदणे पडले की मन उल्हासित होते. रवी हा विश्वाचा आत्मा आहे, तर चंद्र हे मन आहे. चंद्राला मनाचा कारक मानले गेले आहे. “चंद्रमा मनसो जात:” असे वेदवचन आहे. 

नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ग्रहांच्या 'राजा'ला पत्रिकेतही मान; काय परिणाम करतं सूर्याचं 'स्थान'?

भाग्योदय करणारा, मनाचा कारक चंद्र

कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. हस्त, रोहिणी, श्रवण ही चंद्राची नक्षत्रे आहेत. अंकशास्त्रात ‘मूलांक २’चा स्वामी चंद्र आहे. चंद्राचे रत्न मोती आहे. हस्तमुद्रिकाशास्त्रात करांगुलीच्या खालच्या बाजूस मनगटाजवळच्या उंचवट्यावर चंद्राचे स्थान आहे. आठवड्यातील सोमवार या दिवसावर चंद्राचा अंमल आहे. ऋतुंमध्ये वर्षा ऋतु, कालामध्ये मुहुर्तावर चंद्राची सत्ता मानली जाते. चंद्राला सोम, निशाचर, राकेश, शर्वरीश, शशी, शशीधर, उडुपती, रजनीचर, रजनीश अशी काही नावे आहेत. इंग्रजी भाषेत याला ‘मून’ म्हणतात. चंद्र हा मनाचा कारक, गौरवर्णी, शुभ्ररंगाचा, जलतत्वाचा, सत्व-रज गुणी, वात-कफ प्रकृती असणारा ग्रह आहे. चंद्र वायव्य दिशेचा अधिपती आहे. चंद्र हा मातेचा कारक, चंचल, सजल ग्रह आहे. चंद्र भाग्योदय करणारा असून, मोती हे याचे रत्न आहे. चंद्र हा स्त्रियांच्या कुंडलीत आयुष्यकारक ग्रह आहे. सुख-दुःख, लाभ-हानी, मानापमान, मनोभावना, विकार यावर चंद्राचा अंमल आहे. 

चंद्राचे शत्रू ग्रह आणि मित्र ग्रह कोणते?

चंद्रावर तिथी अवलंबून आहेत. समुद्राची भरती-ओहोटी, औषधी वनस्पती यांवर चंद्राच्या किरणांचा परिणाम होतो. कुंडलीत चंद्र बिघडला तर गंभीर आजारांना सामोरे जावे लागू शकते, अशी मान्यता आहे. पाश्चिमात्य ज्योतिषशास्त्रात चंद्राला पत्नीकारक तर रविला पतीकारक मानले गेले आहे. वृषभ रास ही चंद्राची उच्च रास असून, या राशीत तो सर्वोत्तम फले देतो, तर वृश्चिक ही चंद्राची नीच रास असून, या राशीत चंद्र सर्वांत कमी फले देतो, अशी मान्यता आहे. मात्र, अन्य ग्रहांची असलेली चंद्राशी युती, दृष्टी यांप्रमाणे चंद्राची फले वेगवेगळी असू शकतात.  चंद्राचे रवि, बुध हे मित्रग्रह आहेत, तर मंगळ, गुरु, शुक्र आणि शनी यांचेशी समभावाचे नाते मानले गेले आहे. तर राहु हा चंद्राचा शत्रूग्रह मानला गेला आहे. चंद्र हा सृष्टीभोवती फार जलदगतीने प्रदक्षिणा करत असल्याने त्यात आकर्षणशक्ती जास्त आहे. चंद्रापासून सुनफा, अनफा, दुरुधरा, गजकेसरी, अधि, अमला, वसुमती, पुष्कल यांसारखे अत्यंत शुभयोग, तर केमद्रूम, शकट यांसारखे प्रतिकूल तसेच चंद्र-मंगळामुळे मिश्रफलदायी योग तयार होतात. 

नवग्रहांची ‘कुंडली’कथा: सूर्याला पित्याचा दर्जा; कधी प्रेमाने करतो सांभाळ, कधी कठोर होऊन दाखवतो मार्ग

नवग्रहांची ‘कुंडली’कथा या मालिकेतील दुसऱ्या चंद्र ग्रहाच्या लेखातील पहिल्या भागात कुंडलीतील एक ते सहा स्थानावर चंद्र असेल, तर त्याचे जातकावर कसा प्रभाव असू शकतो किंवा जातकाला त्याचे कसे परिणाम मिळू शकतात, हे पाहणार आहोत. तर दुसऱ्या भागात चंद्राशी संबंधित आणखी काही मान्यता, उपाय आणि कुंडलीतील सात ते बारा या स्थानावर चंद्र असेल, तर त्याचा जातकावर कसा प्रभाव असतो, याची माहिती घेणारे आहोत.

१) प्रथम स्थान: कुंडलीतील पहिल्या स्थानाला लग्न स्थान असे संबोधले जाते. यावरून व्यक्तिमत्व, रुप-रंग, शरीर, यशापयश, पूर्वज, सुख-दुःख, आत्मविश्वास, अभिमान अशा गोष्टी पाहिल्या जातात. मेष, वृषभ किंवा कर्क राशीतील पूर्ण चंद्र लग्न स्थानी उत्तम मानला जातो. असा जातक सुस्वरूप, संपन्न, सरळस्वभावाचा व सुखी असतो. परंतु इतर राशीतील किंवा क्षीण चंद्र लग्र स्थानी असेल तर, जातक आळशी, दुर्बल शरीरधारी, हृदयरोगी, राजभय, पशुभय व चोरभय असणारा असतो. आचार- विचाराने पवित्र, स्त्रियांचा आवडता, परंतु कृतघ्न असतो. राजसन्मान मिळतो. व्यवहारचतुर असतो. फिरण्याची आवड असते. क्षीण किंवा दुर्बळ चंद्र असेल तर झोपेत बडबडणे, चालणे व काम करण्याची प्रवृत्ति असते.

२) द्वितीय स्थान: कुंडलीतील दुसरे स्थान धनस्थान मानले जाते. यावरून आर्थिक स्थिती, कुटुंबसौख्य, घराणे, संपत्ती पाहिली जाते. धनस्थानातील चंद्र बहुधा शुभ फले देतो. चंद्र बलवान असेल तर उत्तम फळ मिळेल आणि क्षीण वा कमकुवत असेल तर फल देण्यास असमर्थ ठरतो. या स्थानी सुस्थितीत असलेला चंद्रामुळे जातक आर्थिक दृष्टीने संपन्न व सुखी असतो. वैवाहिक जीवन सुखी असते. अशा जातकावर स्वतःच्या मुलीची किंवा बहिणीची जबाबदारी येते. यासाठी खर्च करावा लागतो. जातक वाचाळ, मिष्ठान्नाची आवड असणारा आणि लोकप्रिय होतो. स्वरुपवान आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा असतो. २९ व्या वर्षी भाग्योदय होतो.

३) तृतीय स्थान: कुंडलीतील तिसरे स्थान मातृस्थान मानले जाते. यावरून भावंडे, शैली, जनसंपर्क, भावंडांकडून मिळणारे सुख अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. या स्थानी असलेल्या चंद्राची बहुधा शुभ फले मिळतात. भावा-बहिणींचे सुख चांगले मिळते. काही मतानुसार या स्थानातील चंद्रामुळे जातकाला भावंडे जास्त असतात. स्वतः जातक संतुष्ट, दयाळू व परोपकारी असतो. पत्नी धर्मात्मा असते. जातक भ्रमणशील असतो. २८ व्या वर्षी किंवा त्यानंतर प्रवासाचा चांगला योग येतो व त्यामुळे फायदा होतो. स्वभाव काहीसा चंचल असतो. 

४) चतुर्थ स्थान: कुंडलीतील चौथे स्थान सुखस्थान मानले जाते. हे मनाचे कारक स्थानही मानले जाते. गृहसौख्य, सासर, वाहनसौख्य, घरातील वस्तु, घराभोवतालचा परिसर, पदवी, मालमत्ता अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. या स्थानी चंद्राची शुभफले मिळतात. लहानपणी विशेष चांगले सुख मिळाले नाही, तरी पुढे जाऊन जातक सुखी व संपन्न जीवन जगतो. राजद्वारी चांगला सन्मान मिळतो. नवे घर मिळते किंवा जातकाचे जन्मानंतर त्याचे वडिल नवीन घर बांधतात. जातक विद्वान व सुशील असतो. पत्नी, संतती व कौटुंबिकदृष्ट्या सुखी असतो. असे असले तरी भावंडांशी पटत नाही, कामुक असतो. कमी वयात लग्न होण्याची शक्यता असते, तसे झाल्यास २२ व्या वर्षी संततीलाभ होतो. पाण्याशी सबंधित व्यवसायात पैसा मिळतो. कृषि, भूमि, वाहन इत्यादी स्थावर संपत्तीचा उपभोग मिळतो.

५) पंचम स्थान: कुंडलीतील पंचमस्थान संततीस्थान मानले जाते. यावरून संततीसुख, प्रेमातील यश, शिक्षण, कलेतील यश, आर्थिक लाभ अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. या स्थानी चंद्र असेल तर जातक चांगल्या बुद्धिचा, चंचल, संतति-सुख असणारा असा असतो. कामेच्छा प्रबळ असते. स्वभावाने सौम्य व भित्रा असतो. राजनैतिक कार्य, बैंकिंगसंबंधी कार्यात चांगले यश मिळू शकते. कुटुंबात लोकांचे चांगले प्रेम मिळते. चंद्र बलवान असेल तर सट्टा, लॉटरीत यश मिळते. विवाह चांगल्या कुटुंबात होतो. विवाहानंतर भाग्योदय होतो. 

६) षष्ठस्थान: कुंडलीतील षष्ठस्थान म्हणजेच सहावे स्थान शत्रूस्थान मानले जाते. यावरून शत्रू, गुप्त शत्रू, शारीरिक व्याधी, मामा, मावशीकडून मिळणारे सुख, नोकर-चाकर, मानसिक वा शारीरिक ताण अशा काही गोष्टी पाहिल्या जातात. या स्थानात चंद्र असलेल्या जातकाचे आरोग्य मध्यम असते. कफ-शीत विकाराने तो त्रस्त असतो. कामेच्छा अधिक असते. शत्रू खूप होतात. जे शत्रू उत्पन्न होतात ते संपतातही. जातकात शत्रू-विनाशक शक्ती एवढी प्रबळ असते की तो मोठ्या शत्रूवर विजय मिळवतो. मातेचे सुख कमी मिळते किंवा तिच्याशी कमी पटते. जातकाच्या मामा-मावशीलाही संततीविषयक चिंता असते. चंद्र क्षीण किंवा पापदृष्ट असता ही फले विशेषत्त्वाने अनुभवास येतात. जातकाला चोराची भीती असते. भावंडांशी फारसे पटत नाही. या स्थानी चंद्र असेल तर चंद्राची दशा-अंतर्दशा साधारण जाते, असे म्हटले जाते.

- सदर कोणत्याही दाव्यांची पुष्टी केली जात नाही. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

Web Title: navgrahanchi kundali katha know about significance of moon planet in astrology and chandra graha impact on janm patrika

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.