Bhishma Dwadashi 2024: चांगला जन्म मिळाला तसे मरणही चांगलेच यावे म्हणून भीष्माचार्यांनी 'अशी' केली प्रार्थना!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 09:11 AM2024-02-20T09:11:57+5:302024-02-20T09:12:43+5:30

Bhishma Dwadashi 2024: २१ फेब्रुवारी रोजी भीष्मद्वादशी आहे, इच्छामरण मिळवणारे भीष्माचार्य हे पहिले व्यक्तिमत्त्व होते, त्यांना मृत्यूवर अंकुश कसा मिळवता आला ते पाहू!

Bhishma Dwadashi 2024: Bhishmacharya prays as we have good birth and like that wish to get good death! | Bhishma Dwadashi 2024: चांगला जन्म मिळाला तसे मरणही चांगलेच यावे म्हणून भीष्माचार्यांनी 'अशी' केली प्रार्थना!

Bhishma Dwadashi 2024: चांगला जन्म मिळाला तसे मरणही चांगलेच यावे म्हणून भीष्माचार्यांनी 'अशी' केली प्रार्थना!

माघ शुद्ध अष्टमी ही तिथी भीष्माष्टमी म्हणून ओळखली जाते. कारण, या तिथीवर भीष्म पितामहांनी प्राणार्पण केले होते. त्यांच्या स्मरणार्थ हे व्रत केले जाते. एवढेच नाही तर माघ मासातील अष्टमी ते द्वादशी हा काळ भीष्माचार्य यांच्या स्मरणार्थ धर्मशास्त्राने राखीव ठेवला आहे. कारण त्यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व पुन्हा होणे नाही. त्यांनी एकदा शपथ घेतली की ते शब्दापासून बधत नसत, म्हणून त्यांच्या शपथेला भीष्म प्रतिज्ञा असे म्हणतात. मात्र त्यांनी आपली निष्ठा पित्याला दिलेल्या वचनाखातर कौरवांना वाहिली, अधर्माच्या बाजूने लढले, त्यामुळे स्वच्छ चारित्र्य असूनही त्यांचे नाव शत्रूंशी जोडले गेले. त्यांच्या चारित्र्यातून आपण बोध घ्यावा, यासाठी त्यांचे पुण्यस्मरण. यंदा २१ फेब्रुवारी रोजी भीष्म द्वादशी आहे. 

हिंदू पंचांगानुसार एका वर्षात दोन आयन असतात, म्हणजेच वर्षातून दोनदा सूर्याच्या स्थितीत बदल होतो आणि या बदलाला उत्तरायण आणि दक्षिणायन म्हणतात. शास्त्रानुसार सूर्य जेव्हा मकर राशीतून मिथुन राशीत जातो, तेव्हापर्यंतच्या काळाला उत्तरायण म्हणतात. हा कालावधी ६ महिन्यांचा असतो, त्यानंतर सूर्य कर्क राशीतून धनु राशीत जातो, त्या काळाला दक्षिणायन म्हणतात. हा कालावधीही सहा महिन्यांचा आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार एका वर्षात सहा ऋतू असतात. जेव्हा सूर्य उत्तरायणात येतो तेव्हा शिशिर, वसंत आणि उन्हाळा असे तीन ऋतू येतात आणि जेव्हा सूर्य दक्षिणायनमध्ये असतो तेव्हा पावसाळा, शरद ऋतू आणि हेमंत ऋतू असतात.

वैदिक काळात उत्तरायणाला देवयान आणि दक्षिणायनाला पितृयान म्हणतात. मकर संक्रांतीनंतर, माघ महिन्यात, उत्तरायणापासून सर्व शुभ कार्ये सुरू होतात. सूर्य दर महिन्याला आपली राशी बदलत असला तरी ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याचे मकर राशीत जाणे फार महत्वाचे मानले जाते. हे दोन्ही मुख्य ग्रह एका राशीत एका स्थानी असताना त्यांच्या आशिर्वादात आलेले मरण मोक्षदायी ठरते असे म्हणतात. 

तसे असले, तरी मृत्यू आपल्या हाती नाही, परंतु तो चांगल्या पद्धतीने यावा, अशी आपल्या सर्वांचीच इच्छा असते. विशेषत: हिंदू धर्मशास्त्राच्या मान्यतेनुसार दक्षिणायनात मृत्यू येऊ नये अशी प्रार्थना केली जाते. म्हणून पितामह भीष्म यांनीदेखील उत्तरायण सुरू होईपर्यंत मृत्यू लांबवला होता. कारण, त्यांना त्यांच्या पुण्याईमुळे इच्छामरणाचा वर मिळाला होता. 

पितामह भीष्मांची शरपंजरी: 

भीष्माचार्यांना इच्छा असेल, तेव्हाच मरण येईल असा वर मिळाला होता. त्यामुळे युद्धात शिखंडीला पुढे करून अर्जुनाने त्यांच्यावर बाण मारताच ते घायाळ होऊन पडले. त्या वेळी दक्षिणायन होते. अंधाराचे प्राबल्य होते. मात्र उत्तरायणात अंधार कमी कमी होऊ लागतो आणि शुभ कार्याला सुरुवात होते. म्हणून आपल्याला मृत्यू उत्तरायण सुरू झाल्यानंतरच मिळावा, अशी भीष्माचार्यांनी इच्छा प्रगट केली. त्यांच्या इच्छेप्रमाणे अर्जुनाने बाणांची शय्या तयार केली आणि त्यावर पडलेले भीष्माचार्य उत्तरायणाची वाट बघत २८ दिवस शरशय्येवर पडून राहिले. शेवटी उत्तरायणात त्यांनी प्राण सोडले. यावरून एखादा माणूस बरेच दिवस आजारी असून मरायला टेकला असेल आणि त्याचा प्राण जात नसेल, तर तो शरपंजरी पडला आहे असा शब्दप्रयोग रूढ झाला. 

भीष्माचार्यांसारखे आपण पुण्यवान नाही, त्यामुळे इच्छामरणही आपल्या हाती नाही. तो अधिकार आपल्याला ना प्रकृतीने दिला आहे, ना कायद्याने. परंतु चांगले मरण यावे, यासाठी आपण प्रार्थना नक्कीच करू शकतो. आपण म्हणाल, मरण कधी चांगले असते का? हो! ज्याप्रमाणे चांगल्या घरात जन्म व्हावा, असे आपल्याला वाटते, त्याप्रमाणे अनेक यातनांनी, आजारांनी, अपघाताने मृत्यू न येता चटकन बोलावणे यावे आणि आत्म्याला पुढील प्रवासासाठी पटकन सद्गती मिळावी, असे वाटणे, यालाच म्हणतात चांगले मरण! यासाठी पूर्वीचे लोक रोज देवाकडे प्रार्थना करत,

अनासायेन मरणं, विनादैन्येन जीवनम्
देहि मे कृपया कृष्ण, त्वयी भक्तिम् अचंचलाम् 

हे कृष्णा, सोपे मरण दे, जीवनात मला कोणत्याही परस्थितीत दीन अर्थात लाचार बनू देऊ नकोस, तुझ्यावरील भक्ती दृढ राहू दे, एवढेच मला दे कृष्णा, बाकी काही नको!

मृत्यू अटळ आहे, तो कधी ना कधी येणार आहे. इहलोकीचा प्रवास संपवून प्रत्येकाला परलोकात जायचे आहे. तर त्याची तरतूद आपल्याला करून ठेवायला नको का? चांगले, निरोगी, आनंदी, उत्साही आयुष्य जगून शेवटचा प्रवासही चैतन्यमयी प्रकाशाच्या दिशेने व्हावा, हाच उत्तरायणात मृत्यू यावा, यामागील सद्हेतू!

Web Title: Bhishma Dwadashi 2024: Bhishmacharya prays as we have good birth and like that wish to get good death!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.