पाऊस घेऊन आल्या मुक्ताई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 12:35 AM2019-06-30T00:35:35+5:302019-06-30T00:36:29+5:30

संतश्री मुक्ताबार्इंच्या पालखीचे शनिवारी शहरात भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. पालखीमार्गावर उभा रिंगण सोहळा पाहण्याचा अपूर्व आनंद बीडकरांनी घेतला.

Mucutai came with rain | पाऊस घेऊन आल्या मुक्ताई

पाऊस घेऊन आल्या मुक्ताई

Next
ठळक मुद्देसंत मुक्तार्इंच्या पालखीचे बीड नगरीत स्वागत । माळीवेस हनुमान मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी

अनिल भंडारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : मुक्ताबाई, मुक्ताबाई आदीशक्ती मुक्ताबाई, पांडुरंग हरी, विठुनामाचा गजर करत मुक्ताई नगर येथून पंढरपुरकडे निघालेल्या संतश्री मुक्ताबार्इंच्या पालखीचे शनिवारी शहरात भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. पालखीमार्गावर उभा रिंगण सोहळा पाहण्याचा अपूर्व आनंद बीडकरांनी घेतला. शहरातील माळीवेस भागातील हनुमान मंदिराजवळ पालखी पोहचताच वरुण राजानेही हजेरी लावत स्वागत केले.
२७ जून रोजी शहागड येथील गोदावरी नदीत मुक्ताबाई पादुकांना स्नान घातल्यानंतर पालखी सोहळा गेवराईकडे प्रस्थान झाला. तेथे मुक्कामानंतर गुरुवारी २८ जून रोजी गढी येथे पालखीचा पहिला रिंगण सोहळा पार पडला. त्यानंतर श्रीक्षेत्र नामलगाव येथे मुक्काम करुन २९ जून रोजी पालखी सोहळ्याचा बीड शहरात प्रवेश झाला. अभंग, भजन गात पावली खेळत वारकरी विठुनामात दंग होते.
शनिवारी एकादशीमुळे पालखी मार्गावर वारकऱ्यांना फराळाची पाकिटे, राजगिरा लाडू, शाबुदाना चिवडा, फळे, दुध, चहाची व्यवस्था केली होती. मानाच्या अश्वाची पूजा करुन भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. माळीवेस परिसरात हनुमान मंदिरात स्वागताआधी पालखीचा दुसरा रिंगण सोहळा होणार होता. मात्र त्याचवेळी काही भाविकांनी खांद्यावरुन पालखी मंदिरात आणली. तेथे आरती नंतर दर्शनासाठी भाविकांची रांग लागली होती.
यावेळी पालखी सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे, पंजाबराव पाटील, सुधाकर पाटील,लखन महाराज,विशाल महाराज खोले,विजय महाराज खोले,अमोल महाराज,दीपक,महाराज, हनुमान मंदिर विश्वस्त मंडळाचे शांतीलाल पटेल, चंद्रकांत पाटील, विश्वासराव मनसबदार, अ‍ॅड. संपतराव मार्कड, अ‍ॅड. प्रसाद मनसबदार, सुरेश नहार, लक्ष्मणराव जाधव, रमेश पाटील यांच्यासह भाविक उपस्थित होते. रात्री ७ ते १० वेळेत मुक्कामी कीर्तन सेवा झाली. पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला.
पालखी सोहळ्याला ३१० वर्षे
संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याची ३१० वर्ष पूर्ण होत आहेत. ज्या वेळी सुविधांचा अभाव होता, तेव्हा खांद्यावरुन पालखी न्यावी लागत होती. नंतर मात्र लोकश्रयाच्या बळावर सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या.

Web Title: Mucutai came with rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.