मराठवाडा साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी नियोजनबद्ध तयारी सुरू; विविध समित्यांची झाली स्थापना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2017 01:59 PM2017-12-08T13:59:30+5:302017-12-08T14:03:21+5:30

अंबाजोगाई ( बीड )  : येथील योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या प्रांगणात उभारण्यात येणा-या आद्यकवी मुकुंदराज साहित्य नगरीत २४ आणि २५ ...

Marathwada literature begins preparing for the success of the meeting; Establishment of various committees | मराठवाडा साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी नियोजनबद्ध तयारी सुरू; विविध समित्यांची झाली स्थापना

मराठवाडा साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी नियोजनबद्ध तयारी सुरू; विविध समित्यांची झाली स्थापना

googlenewsNext
ठळक मुद्दे३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या तयारीस सुरुवात व्यासपीठाच्या नावांतही ऐतिहासिक संदर्भ सरस्वती पुत्रांचा सन्मान आणि स्मरणहीयेत्या २४ आणि २५ डिसेंबर रोजी होणार संमेलन

अंबाजोगाई (बीड)  : येथील योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या प्रांगणात उभारण्यात येणा-या आद्यकवी मुकुंदराज साहित्य नगरीत २४ आणि २५ डिसेंबर रोजी होणा-या ३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी नियोजनबद्ध तयारी सुरू आहे. या संमेलनात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले असून यासाठी मुख्य सभागृहासह इतर दोन सभागृहांची  निर्मिती करण्यात आली आहे. या तीनही सभागृहांना ऐतिहासिक संदर्भ लक्षात घेवून नावे देण्यात  आल्याची माहिती स्वागताध्यक्ष तथा जि.प.चे शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख, स्वागत समितीचे उपाध्यक्ष अमर हबीब व कार्यवाह दगडू लोमटे यांनी दिली. 

बीड जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने ३९ वे मराठवाडा साहित्य  संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी नियोजनबध्द पध्दतीने आखणी करण्यात येत असून, संमेलनात आयोजित करण्यात येणाºया विविध कार्यक्रमासाठी स्वामी रामानंद तीर्थ सभागृह, सर्वज्ञ दासोपंत सभागृह, भगवानराव लोमटे सभागृह व राम मुकदम खुले व्यासपीठाची  निर्मिती करण्यात आली आहे.

सर्वज्ञ दासोपंत सभागृह,  शंकरबापू आपेगावकर व्यासपीठ
दुस-या सभागृहास मराठीचे आद्यकवी दासोपंत यांचे नाव देण्यात आले आहे. दासोपंत यांनी नाटक, संगीत, कृषी संदर्भात लिखाण केले आहे. मराठी व अन्य भाषेतही त्यांनी शिपू लिखान केले.  हा ऐतिहासिक संदर्भ या सभागृहाला त्यांचे नाव देण्यामागे आहे. या दासोपंत सभागृहातील व्यासपीठाला शंकरबापू आपेगावकर हे नाव देण्यात आले आहे. शंकरबापू आपेगावकर यांचा जन्म केज तालुक्यातील आपेगाव येथे झाला असला तरी त्यांनी अंबाजोगाई ही कर्मभूमी मानून पखवाजाचे शिक्षण येथे घेतले आणि पखवाज वादनाची कला त्यांनी भारतासह सातासमुद्रापार पसरवून अंबाजोगाईचा गौरव केला. याक्षेत्रातील अतुलनीय कार्याबध्दल भारत सरकारने त्यांचा ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरवही केला.

भगवानराव लोमटे सभागृह, शैला लोहिया व्यासपीठ
तिस-या सभागृहास भगवानराव लोमटे सभागृह असे नाव देण्यात आले आहे. हे ३८ वे मराठवाडा साहित्य संमेलन हे बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात येत असून भगवानराव लोमटे हेही अंबाजोगाईचेच भूमिपुत्र असून १९८०  च्या दशकात त्यांनी बीड जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ सभापती म्हणून कार्यभार सांभाळला होता. त्यानंतर ते बीड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून व शिक्षण क्षेत्रासह साहित्य, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रातील केलेल्या कामाचा गौरव म्हणून त्यांचे नाव देण्यात आले आहे.
या सभागृहातील व्यासपीठाला शैला लोहिया व्यासपीठ हे नाव देण्यात आले आहे. प्राचार्या डॉ. शैला लोहिया याही अंबाजोगाईच्याच. मराठी विषयात अध्यापनाचे काम करणा-या शैला लोहिया यांनी साहित्य क्षेत्रातही मोठे योगदान दिले. मराठीतील अनेक पुस्तके आणि कविता संग्रह त्यांच्या नावावर आहेत. साहित्य क्षेत्रातील या योगदानाबद्दल त्यांना राज्य शासनाच्या पुरस्कारासह इतर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. शिवाय मनस्विनी प्रकल्पाची स्थापना करुन महिलांसाठी खूप मोठे काम केले आहे.

राम मुकदम खुले व्यासपीठ
साहित्य संमेलन  परिसरातील चौथ्या खुले व्यासपीठाला राम मुकदम असे नाव देण्यात आले आहे. राम मुकदम यांचा जन्म अतिशय सधन अशा देशपांडे कुटुंबात झाला असला तरी त्यांनी आपले संपुर्ण आयुष्य साहित्य आणि कष्टकº्यांच्या सेवेत घालवले. तरुण वयातच ते काँ.आर.डी. देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली कम्युनिस्ट पक्षाच्या चळवळीत ओढल्या गेले. आणि तरुण वयापासून आयुष्यातील शेवटच्या क्षणापर्यंत लाल कपडे परिधान करुन कम्युनिस्ट पक्षाची विचारधारा जोपासली. यासोबतच कष्टकरी, उपेक्षितांच्या व्यथा त्यांनी आपल्या साहित्य आणि कवितांमधून मांडल्या.  त्यांनी लिहिलेला ‘बेहोष चालतांना’ हा कवितासंग्रह अनेकांच्या मनात घर करुन आहे.  

नवा आदर्श पायंडा : संयोजकांचा ध्यास
येत्या २४ आणि २५ डिसेंबर रोजी होणा-या ३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनात घेण्यात येणा-या जागर दिंडी, ग्रंथ प्रदर्शन, परिसंवाद, कवीसंमेलन, कथाकथन आणि इतर सर्वच कार्यक्रमात वेगळेपण जपण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न संयोजकांकडून करण्यात येत असून हे संमेलन यापुढे आयोजित करण्यात येणाºया साहित्य संमेलनाला एक नवा आदर्श आणि नवा पायंडा निर्माण करुन देणारे ठरेल, असा विश्वास यावेळी स्वागताध्यक्ष राजेसाहेब देशमुख, उपाध्यक्ष अमर हबीब, कार्यवाह दगडू लोमटे आणि  संयोजन समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.

स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे यांची नावे
अंबाजोगाईचे भूमिपुत्र आणि मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अग्रणी लढवय्ये स्वामी रामानंद तीर्थ यांचे नांव मुख्य सभागृहाला देण्यात आले असून यातील व्यासपीठाला बाबासाहेब परांजपे व्यासपीठ हे नाव देण्यात आले आहे. उद्घाटन तसेच समारोपाच्या कार्यक्रमासोबतच इतर महत्त्वाचे कार्यक्रम या व्यासपीठावर होणार आहेत. मराठवाडा स्वातंत्र्यलढ्याचे अग्रणी सेनानी म्हणून स्वामी रामानंद तीर्थ यांचे नाव या सभागृहाला देण्यात आले असून, १९६० च्या दशकात परभणी येथे झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान अंबाजोगाईही कर्मभूमी असलेल्या बाबासाहेब परांजपे यांनी भूषविले असल्यामुळे त्यांचे नाव या व्यासपीठाला देण्यात आले आहे.

आद्यकवी मुकुंदराज साहित्य नगरी
२४ आणि २५ डिसेंबर रोजी होणाºया ३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलन परिसरास आद्यकवी मुकुंदराज साहित्यनगरी हे नाव देण्यात आले आहे. मुकुंदराजांनी मराठी भाषेतला पहिला काव्यग्रंथ ‘विवेकसिंधू’ अंबाजोगाईत लिहिला. पुढे त्यांनी इतर तीन ग्रंथ लिहिले. मराठी कवितेच्या क्षेत्रात आद्यकवी म्हणून मुकुंदराजांचे नाव घेण्यात येते. याशिवाय मराठी साहित्य क्षेत्रातील त्यांच्या अलौकिक योगदानाबद्दल या नगरीला आद्यकवी मुकुंदराज साहित्य नगरी हे नाव देण्यात आले आहे, असे संयोजन समितीच्या वतीने सांगण्यात आले.

Web Title: Marathwada literature begins preparing for the success of the meeting; Establishment of various committees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.