Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी बीड जिल्ह्यात दोघांच्या आत्महत्येने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 05:57 PM2018-08-04T17:57:00+5:302018-08-04T18:02:48+5:30

मराठा आरक्षणासाठी बीडमध्ये आणखी दोघांनी जीवनयात्रा संपविली. या घटना बीड तालुक्यातील पिंंपळनेर व पाटोदा तालुक्यातील येथे घडल्या.

Maratha Reservation: Two suicides for Maratha reservation in Beed district | Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी बीड जिल्ह्यात दोघांच्या आत्महत्येने खळबळ

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी बीड जिल्ह्यात दोघांच्या आत्महत्येने खळबळ

Next
ठळक मुद्देआतापर्यंत जिल्ह्यात आरक्षणासाठी तीन आत्महत्या झाल्या आहेत. 

बीड : मराठा आरक्षणासाठी बीडमध्ये आणखी दोघांनी जीवनयात्रा संपविली. या घटना बीड तालुक्यातील पिंंपळनेर व पाटोदा तालुक्यातील येथे घडल्या. दरम्यान, चार दिवसांपूर्वीच केज तालुक्यातील विडा येथील अभिजित देशमुख या तरूणाने आरक्षणासाठी जीवन संपविले होते. आतापर्यंत जिल्ह्यात आरक्षणासाठी तीन आत्महत्या झाल्या आहेत. 

शिवाजी तुकाराम काटे (४० रा.पिंपळनेर ता.बीड) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मुळचे पिंपळनेर येथील रहिवाशी असलेले काटे हे पिंपळनेरपासून जवळच असलेल्या बेडूकवाडी शिवारात आपल्या भावाच्या शेतात राहत होते. त्यांना २० गुंठे जमीन आहे. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ते कुटूंबासह शेतात काम करीत होते. कुटूंबिय कामात व्यस्त असल्याचे पाहून काटे हे बाजूलाच असलेल्या तळ्याजवळ गेले. तेथील एका लिंबाच्या झाडाला त्यांनी गळफास घेऊन जीवन संपविले. हा प्रकार नातेवाईकांनी पाहिल्यावर त्यांना तात्काळ पिंपळनेर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारीच अंत्यसंस्कारही करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार अविनाश शिंगटे यांनी त्यांच्या कुटूंबियांची भेट घेतली. 
पाटोदा तालुक्यातील डोंगरकिन्ही येथील कानिफ दत्ता येवले (४५) यांनी शनिवारी दुपारी शेतात जाऊन विष प्राशन केले. हा प्रकार नातेवाईकांनी पाहिल्यानंतर त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. दरम्यान, कानिफ यांचे लहान भाऊ कल्याण यांनी जिल्हा रुग्णालय पोलीस चौकीत जबाब दिला आहे. मुलींचे शिक्षण, लग्न बाकी आहे. त्यातच मराठा आरक्षण मिळत नसल्याने मुलांच्या भविष्याचे काय होईल, या विवंचनेत ते होते. यातूनच त्यांनी जीवन संपविल्याचे त्यांनी जबाबात म्हटले आहे. सायंकाळपर्यंत शवविच्छेदन झाले नव्हते.
काय आहे चिठ्ठीतील मजकूर?
शिवाजी काटे यांच्या खिशात आढळलेल्या चिठ्ठीत ‘मराठा आरक्षणासाठी आज दि. ३ रोजी मी माझे जीवन संपवित आहे. महराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांनी मराठा समाजाचा अंत पाहू नये. आरक्षण द्यावे, एवढीच अंतीम इच्छा आहे’ असा मजकूर आढळला आहे. ही चिठ्ठी सध्या पोलिसांच्या ताब्यात असल्याचे समजते.

 

Web Title: Maratha Reservation: Two suicides for Maratha reservation in Beed district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.