MahaVitaran tills in Beed alive! | बीडमध्ये महावितरण टपलयं जिवावर!

ठळक मुद्देतारा लोंबकळल्या, खांबही वाकले

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : शहरात महावितरणच्या हलगर्जीपणामुळे ठिकठिकाणी विजेचे खांब वाकले आहेत, तसेच ताराही लोंबकळल्या आहेत. यामुळे अपघातास निमंत्रण मिळत असल्याचे दिसते. नागरिकांकडून वारंवार लेखी व तोंडी तक्रारी केल्यानंतरही महावितरण याची दुरुस्ती करण्यास उदासिन असल्याचे दिसून येत आहे. शहरातील ही गंभीर परिस्थिती पाहता ‘महावितरण टपलंय जिवावर’ अशीच म्हणण्याची वेळ आली आहे. महावितरण मात्र याची गांभीर्याने दखल घेत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात सर्वत्र वीज पुरवठा विस्कळीत झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी महावितरणच्या वरीष्ठ अधिकाºयांचे कान उपटले होते. त्यानंतर तरी यामध्ये सुधारणा होईल, अशी अपेक्षा होती, परंतु अद्याप यामध्ये काहीच बदल झालेले दिसून येत नाहीत. महावितरण अधिकाºयांच्या हालगर्जीपणाच आता नागरिकांच्या जीवावर बेतण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अपघात घडण्यापूर्वीच अधिका-यांनी सर्व दुरूस्ती करून घेणे गरजेचे आहे.

दरम्यान, शहरातील वाकलेले खांब, लोंबकाळलेल्या तारा दुरूस्तीसह रोहित्रांच्या दुरूस्तीसाठी गुत्तेदार नेमले आहेत. परंतु अधिकाºयांना हाताशी धरून हे गुत्तेदार कामच करीत नसल्याचे दिसते. केलेले कामेही दर्जेदार होत नसल्यानेच शहरातील समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. अधिका-यांनी या समस्यांकडे लक्ष देऊन दुरूस्ती करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
ग्रामीण भागातही यापेक्षा वेगळी स्थिती नाही.

अनेकांच्या शेतांमधून वीजपुरवठा करणारे खांब गेलेले आहेत. हे खांब वाकलेले असून, स्पार्किंगमुळे पीक जळण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.

जुन्या तारा झाल्या जीर्ण
बीड शहरातील बहुतांश भागातील तारा अनेक वर्षांपासून बदलण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे त्या जिर्ण झाल्या आहेत. याचा परिणाम थोडेही वारे आले किंवा पाऊस आला की त्या तुटून पडतात. यामुळे अपघात घडतात. अशा घटना घडल्याची अनेक उदाहरणेही आहेत.

धोकादायक बॉक्स
बीड शहरात अनेक ठिकाणी वीजपुरवठा करणारे वायरचे बॉक्स उघडे आहेत. त्यामुळे अपघातास निमंत्रण मिळत आहे. सहयोनगरात प्रेस लाईन परिसरातील हे त्याचे बोलके छायाचित्र दिसत आहे.

रोहित्रांना पडला वेलीचा विळखा
बीड शहरात ठिकठिकाणी रोहित्रे आहेत. परंतु महावितरणच्या दुर्लक्षामुळे बहुतांश रोहित्रांवर वेलींचा विळखा पाहवयास मिळतो. यामुळे वीजपुरवठ्यात अडचणी येत आहेत. बीड शहरातील कॅनॉल रोड परिसरात या रोहित्रावर अशा प्रकारे वेलींनी विळखा घातलेला आहे.

दुरुस्तीवर कोट्यवधींचा निधी खर्च
यावर्षी मेंटेनन्ससाठी तब्बल साडे बारा कोटी रूपयांचा आराखडा पाठविण्यात आलेला आहे. या आकडेवारी गतवर्षीही दुरूस्तीसाठी कोट्यवधी रूपये खर्च झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कोट्यवधी रूपये खर्चुनही शहरातील परिस्थिती जैसे थे च असल्याचे दिसते. यावरून केवळ गुत्तेदार पोसण्याचे काम महावितरणकडून केले जात असल्याचा आरोप केला जात आहे.

अधिकारी, गुत्तेदारांचे संगणमत !
महाविरणची कामे करण्यास मागील अनेक वर्षांपासून ठरावीक गुत्तेदारच आहेत. त्यांची आणि अधिका-यांची चांगली ओळख असल्याने ते त्यांना बदलत नाहीत. या ओळखीचा फायदा घेत गुत्तेदार दर्जेदार कामे करीत नाहीत. यामुळे अपघात घडतात. अधिकारीही निकृष्ट कामांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जात आहे.

खांब सरळ करण्यास नाही वेळ
शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावरच खांब आहेत. त्यामुळे वाहनांच्या घडकेने अथवा इतर अपघातामुळे ते वाकतात. यामुळे वीज पुरवठ्यात अडथळे येतात. असे असतानाही महावितरण याकडे दुर्लक्ष करते.जुने खांब बदलने तर दुरच परंतु वाकलेले खांब सरळ करायलाही महावितरणला वेळ मिळत नसल्याचा आरोप केला जात आहे.


Web Title: MahaVitaran tills in Beed alive!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.