धारूरच्या डोंगरात गावरान मेव्याचे वैभव परतणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 06:28 PM2019-02-23T18:28:08+5:302019-02-23T18:36:15+5:30

शेतकऱ्यांनी माळरानावर तब्बल १,६०० झाडे लावली आहेत. 

Gavaran Mewa will return to the mountains of Dharur | धारूरच्या डोंगरात गावरान मेव्याचे वैभव परतणार

धारूरच्या डोंगरात गावरान मेव्याचे वैभव परतणार

googlenewsNext
ठळक मुद्देजलसंधारणामुळे आशेचा किरण  जायभायवाडीत माळरानावर फुलली पुन्हा सीताफळाची झाडे

- अनिल महाजन 

धारूर (जि. बीड) : ऊसतोड कामगारांचे गाव असलेले धारूर तालुक्यातील जायभायवाडी हे सीताफळासाठीही प्रसिद्ध. मात्र, सततच्या दुष्काळामुळे  हे गाव उजाड झाले. आता जलसंधारणाच्या कामातून येथे आशेचा किरण दिसू लागला असून, गावरान मेव्याचे गतवैभव आणण्यासाठी जायभायवाडीच्या शेतकऱ्यांनी माळरानावर तब्बल १,६०० झाडे लावली आहेत. 

अतिदुर्गम भागात आणि डोंगरदरीत असलेल्या जायभायवाडी गावात सीताफळाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत होते. एके काळी याच गावात सीताफळ खरेदी करण्यासाठी बाहेरचे मोठे व्यापारी येत. सीताफळाचा दर्जा आणि आकार पाहून सौदे व्हायचे. परिसरातल्या लोकांना रोजगार मिळायचा. शेतकऱ्यांनाही पैसा मिळू लागला. 

दररोज किमान दोन ट्रक भरून सीताफळे खरेदी करून बाहेरगावचे व्यापारी विक्रीसाठी नेत असत; परंतु मागील सहा- सात वर्षांत निसर्गाने धोका दिला. झाडे पाण्याअभावी वाळून गेली. सीताफळातून मिळणारा आर्थिक स्रोत बंद झाला; पण म्हणून येथील शेतकरी खचले नाहीत. गावातील अशोक महादेव जायभाये, मनोज पंडितराव जायभाये, बाबासाहेब पांडुरंग जायभाये, उपसरपंच डॉ. सुंदर अर्जुन जायभाये आदी शेतकऱ्यांनी प्रत्येकी ४०० (एकूण १,६००) झाडे लावली. विशेष म्हणजे माळरानावर जेसीबीने खड्डे खोदून त्यात रोपे लावली. निसर्गाने साथ दिली, तर येणाऱ्या चार-पाच वर्षांत पहिल्यासारखेच नंदनवन फुलणार, असा विश्वास हे शेतकरी व्यक्त करीत आहेत. 

चौघांपासून प्रेरणा
जून २०१८ मध्ये या चौघांनी झाडे लावलेली आहेत. येत्या दोन वर्षांत वाढणाऱ्या झाडांना फळे लगडणार असून, चांगला भाव मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यांचे पाहून ग्रामस्थही प्रेरणा घेत कष्ट करीत आहेत. येत्या जूनमध्ये थोडी- फार झाडे लावावीत. शेतीला पूरक उद्योग म्हणून सीताफळाची शेती करावी, पुन्हा या उजाड झालेल्या डोंगरावर सीताफळाची शेती करून स्वत:साठी आर्थिक स्रोत उभा करावा म्हणून जलसंधारण चळवळीतून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सधन होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

जलबचतीवर भर :

या शेतकऱ्यांनी बोअरवरून झाडांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला आहे. त्याचबरोबर पाण्याचा अतिवापर होणार नाही, याची दक्षता सर्वांनी घेतलेली आहे. दोन वर्षांपासून जायभायवाडीत जलसंधारणाची जी कामे झालेली आहेत, त्याचा फायदा झाला. बोअर आणि विहिरीतील पाण्याची पातळी वाढली. बंद पडलेले बोअर चालू झाले. प्रत्येक ओढ्यावर सिमेंट बंधारे, लहान लहान ओघळीवर अनघड दगडी बांध, माती बंधारे यासारखे उपचार  केले. तळहाताला फोड येईपर्यंत ग्रामस्थांनी कष्ट केले. त्याचे फळ लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे. 

Web Title: Gavaran Mewa will return to the mountains of Dharur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.