बालमनावर संस्कार रुजविण्यात बालभारतीचे योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 11:15 PM2017-12-25T23:15:40+5:302017-12-25T23:15:40+5:30

पूर्वीच्या बालभारती पाठ्यपुस्तकातून मिळालेली ज्ञानाची शिदोरी काळानुरूप बदलत गेली. आज नव्या रूपात बालभारतीने संस्कार रुजविण्याची पाऊलवाट निर्माण केली आहे. त्यामुळे बालमनावर मराठी साहित्याचे अंकुर रुजविण्याची मोठी जबाबदारी कवी, लेखक, शिक्षक व अधिकारी यांच्यावर आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून शैक्षणिक उपक्रमासोबत अध्यापनात बदल घडवावेत, असा सूर ‘बालभारतीतील धडे’ या परिचर्चेतून निघाला.

 Child's contribution to child rituals | बालमनावर संस्कार रुजविण्यात बालभारतीचे योगदान

बालमनावर संस्कार रुजविण्यात बालभारतीचे योगदान

googlenewsNext
ठळक मुद्देसाहित्य संमेलनात लेखक, कवी, विद्यार्थी, शिक्षक व अधिका-यांची परिचर्चा

भारत दाढेल ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई :पूर्वीच्या बालभारती पाठ्यपुस्तकातून मिळालेली ज्ञानाची शिदोरी काळानुरूप बदलत गेली. आज नव्या रूपात बालभारतीने संस्कार रुजविण्याची पाऊलवाट निर्माण केली आहे. त्यामुळे बालमनावर मराठी साहित्याचे अंकुर रुजविण्याची मोठी जबाबदारी कवी, लेखक, शिक्षक व अधिकारी यांच्यावर आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून शैक्षणिक उपक्रमासोबत अध्यापनात बदल घडवावेत, असा सूर ‘बालभारतीतील धडे’ या परिचर्चेतून निघाला.

३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनात सोमवारी बाबासाहेब परांजपे व्यासपीठावर लेखक, कवी, विद्यार्थी, शिक्षक व अधिकारी यांनी चर्चेतून बालभारतीचा प्रवास, तसेच शिक्षणातील विविध प्रवाह या विषयावर चर्चा केली. या चर्चेत प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव, केशव खटिंग, प्रकाश भुते, अर्चना पारीख व प्राजक्ता सोनवणे, ऋषिता लाहोटी, प्रसाद मुंडे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

या परिचर्चेची सुरुवात करताना सूत्रसंचालक तृप्ती अंधारे यांनी इंद्रजित भालेराव यांना बालभारती सोबतचा तुमचा प्रवास कसा झाला, हा प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले, पूर्वीच्या व आजच्या बालभारतीचे स्वरूप बदलले आहे. ज्या बालभारतीत भा.रा. तांबे यांची ‘सायंकाळची शोभा’ ही कविता होती, त्या पाचवीच्या पुस्तकात आता माझी ‘बाप’ ही कविता, तर जिथे बालकवींची ‘औदुंबर’ ही कविता होती, तिथे माझी ‘रविवार’ ही कविता अभ्यासाला आहे. त्या बालभारतीतील कविता मला ५० वर्षांनंतरही पाठ आहे. कविता न विसरण्याचे कारण म्हणजे त्या लयबद्ध होत्या. म्हणून विद्यार्थ्यांना ज्या कविता गोड वाटतील, आवडतील, त्याच कविता पुस्तकात असाव्यात. बालभारतीत समाविष्ट झालेल्या कवितेचा आनंद खूप मोठा असतो. मी कवितेवर आणि विद्यार्थ्यांनी माझ्या कवितेवर प्रेम केले, असेही ते म्हणाले.

दरम्यान, विद्यार्थिनी प्राजक्ता सोनवणे हिने आजचे बालसाहित्य वस्तुनिष्ठ आहे का, असा प्रश्न विचारला. त्यावर भालेराव म्हणाले, माझे साहित्य वस्तुनिष्ठ आहे; परंतु बालवयात मुलांना फार मोठे वास्तव सांगायचे नसते. त्यामुळे त्यांंना झेपेल एवढेच वास्तव साहित्यात असावे. ऋषिता लाहोटी हिने तुम्ही शेतकरी कुटुंबात जन्माला आला नसता तर शेतकºयांवर कविता लिहिली असती का, असा प्रश्न विचारला. त्यावर भालेराव यांनी मी जे जगले, भोगले आहे, ते माझ्या कवितेतून मांडले आहे. मी जर शेतकरी कुटुंबात जन्मलो नसतो, तर मला शेतकºयांचे दु:ख कळाले नसते आणि मी शेतकºयांवर कविताही लिहिली नसती.

आजकालची मुले मोबाईलवर अधिक वेळ घालवतात. त्याबद्दलही यावेळी चर्चा करण्यात आली. तृप्ती अंधारे म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी मोबाईलचा संतुलित वापर करून आपले ज्ञान वाढविले पाहिजे. ज्योती कदम यांनी बालसाहित्यिकांची जबाबदारी वाढली असून, योग्य संस्कार करणारे साहित्य लिहिले पाहिजे, असे मत व्यक्त केले.

लेखकांची विद्यार्थ्यांसोबत भेट घडवा
अध्यापनातील बदलाबद्दल केशव खटिंग म्हणाले, बालभारतीतील धडे हा आस्थेचा विषय आहे. आताचे कवी, लेखक विद्यार्थ्यांना पाहण्यास मिळतात. पूर्वी मात्र तसे होत नव्हते. शिक्षकांनी जे अभ्यासक्रमाला लेखक आहेत, त्यांचे साहित्य वाचून अशा लेखकांची भेट विद्यार्थ्यांसोबत घडवली पाहिजे. ज्याप्रमाणे बालभारतीतील धडे बदलतात, अगदी तसेच आपणही अध्यापन पद्धतीतही बदल केले पाहिजेत. शिक्षकांनी बोलीभाषेत कविता शिकवली पाहिजे. पुस्तकांचे सामूहिक वाचन केले पाहिजे, आदी उपक्रमांचीही त्यांनी चर्चा केली.

सात कोटी विद्यार्थ्यांनी पाठ केली ‘बाप’ कविता
प्रा. इंद्रजित भालेराव यांनी आपल्या मनोगतात ‘बाप’ ही कविता सात कोटी पोरांनी पाठ केल्याचे सांगितले. माझी कविता केवळ शाळेतील विद्यार्थीच नव्हे, तर वाडी-वस्ती तांड्यावरची मुलेसुद्धा पाठ करतात, याचे उदाहरणही त्यांनी दिले. यावेळी ‘बाप’, तसेच ‘काट्याकुट्याचा तुडवीत रस्ता’ ‘शिक पोरा शिक, लढायला शिक’ या कविता सादर केल्या. या परिचर्चेला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

Web Title:  Child's contribution to child rituals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.