भुजबळांची मध्यस्थी कामी; पवारांनी काढली क्षीरसागर बंधूंची समजूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 04:09 PM2018-10-03T16:09:50+5:302018-10-03T16:11:06+5:30

सभेचे निमित्त साधून पवार ३० सप्टेंबर रोजीच बीड मुक्कामी आले आणि जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची गटातटातील मतभेदात संपूर्णत: विस्कटलेली घडी सुधारण्याचा प्रयत्न केला.

Bhujbal intervened successful; Kshirsagar Brothers understanding of Pawar's decision | भुजबळांची मध्यस्थी कामी; पवारांनी काढली क्षीरसागर बंधूंची समजूत

भुजबळांची मध्यस्थी कामी; पवारांनी काढली क्षीरसागर बंधूंची समजूत

googlenewsNext

- सतीश जोशी 
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यात होणाऱ्या विजयी संकल्प सभांचा शुभारंभ शरद पवारांच्या उपस्थितीत सोमवारी बीडमध्ये झाला. सभेचे निमित्त साधून पवार ३० सप्टेंबर रोजीच बीड मुक्कामी आले आणि जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची गटातटातील मतभेदात संपूर्णत: विस्कटलेली घडी सुधारण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्याच्या राजकारणात वर्चस्व असलेल्या आ. जयदत्त क्षीरसागर आणि बीडचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर बंधुंना पक्षाच्या एका व्यासपीठावर आणून राजकीय चर्चेवर पडदा टाकला. 

गेल्या दीड वर्षांपासून क्षीरसागर आणि माजी मंत्री प्रकाशदादा सोळंके, विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी आ.अमरसिंह पंडित यांच्यातील वाद इतका विकोपाला गेला की, क्षीरसागरबंधूंनी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर आणि पालकमंत्री पंकजा मुंडेंच्या रॉयलस्टोनवर गणपतीबाप्पांची आरती करून बारामतीला संदेश दिला होता. भाजपाचे आ.सुरेश धस, रमेशराव आडसकर यांनीही सोबत राहून त्यांच्या सुरात सूर मिसळला होता. या आरतीने बीड जिल्ह्यात खळबळ माजली. दीड वर्षांपासून राष्ट्रवादीपासून दीडहात लांब राहिलेल्या क्षीरसागर बंधूंनी मधल्या काळात मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याशी जवळीक पाहत हे दोघे भाजपाच्या वाटेवर आहेत, असाच समज जिल्ह्यात झाला होता.

राष्ट्रवादीतून निलंबित केलेल्या माजी मंत्री सुरेश धसांना जिल्ह्यातील नेतेमंडळीच्या नाकावर टिच्चून इतरांच्या मदतीने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत अशक्यप्राय असा विजय मिळवून देत आपली राजकीय ताकद बारामतीला दाखवून दिली होती. केवळ राजकीय अस्तित्वावरून झालेल्या गटबाजीत सुरेश धसांना घालवून पक्षाची ताकद क्षीण केली, याउलट सुरेश धसांसारखा रांगड्या स्वभावाचा आणि सडेतोड हल्ला करणारा मराठा नेता मिळाल्यामुळे भाजपाची ताकद वाढली आणि पंकजा मुंडे बीडच्या राजकारणात अधिक सक्रिय झाल्या. सर्वप्रथम त्यांनी डोईजड ठरू लागलेल्या शिवसंग्रामच्या आ. विनायक मेटेंना एकाकी पाडले. त्यांच्या जवळचा सहकारी राजेंद्र मस्के यांना आगामी बीड विधानसभेच्या भाजपा उमेदवारीचे आश्वासन दिले. प्रकाशदादा सोळंके, धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित यांच्या वक्तव्याला सडेतोड प्रत्युत्तर देण्याची जबाबदारी सुरेश धसांवर सोपवली. त्यामुळे वातावरण अधिकच तापू लागले. या साऱ्या प्रकारास क्षीरसागर बंधुंचीही अप्रत्यक्ष साथ होती. 

जिल्ह्यातीलच काय बारामतीचे धाकटे साहेब अजित पवारांनाही क्षीरसागर बंधू जुमानत नाहीत, हे पाहून शरद पवारांनाच बीड गाठावे लागले. प्रकरण टोकाला गेले आहे, हे त्यांच्याही लक्षात आले होते. आ.छगन भूजबळ आणि आ. जयदत्त क्षीरसागर यांच्यातील सख्य, घनिष्ठता त्यांना चांगलीच अवगत होती. वैचारिक पातळीवर पक्षात मतभेद झाल्यामुळे असेच छगन भूजबळ यांनी नाराज होऊन टोकाची भूमिका घेतली होती. त्यावेळी आ. जयदत्त क्षीरसागर यांनी त्यांची समजूत काढून, मनधरणी करून पक्षात पुन्हा सक्रिय केले होते. अनुभवी पवारांनी हाच फॉर्म्युला बीडसाठी वापरला.

जिल्हा समता मेळाव्याच्या निमित्ताने भुजबळांना बीडला पाठविले. प्रकाशदादा सोळंके, धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित, पुतण्या संदीप क्षीरसागर यांच्या कार्यक्रमाकडे क्षीरसागर बंधूंनी दीड वर्षापासून पाठ फिरवली होती. या मंडळींनाही समता मेळाव्यास निमंत्रित करून त्यांच्यासोबत व्यासपीठावर क्षीरसागर बंधंूनाही एकत्र आणले होते. भुजबळांचा कानमंत्र लागू पडला आणि बंधू कमालीचे सक्रिय झाले. या मेळाव्यापेक्षाही पवारांच्या विजयी संकल्प मेळाव्यास मोठ्या संख्येंनी उपस्थित रहा, असे आवाहन करून जिल्ह्णाला पडलेले राजकीय कोडे सोडवले. केजचे अक्षय मुंदडा यांनीही सभेत भाषण केल्यामुळे आगामी निवडणुकीसंदर्भात त्यांची भूमिकाही स्पष्ट झाली.

क्षीरसागर बंधू सक्रिय झाल्यामुळे अनेकांची पुन्हा कोंडी झाली. बीड विधानसभेचा संभाव्य उमेदवार म्हणून पुतण्या संदीप क्षीरसागरचे नाव पक्षाकडे सूचविले होते, त्यादृष्टीने संदीपने देखील मैदानात उडी घेऊन जनसंपर्क वाढविला होता. यापूर्वीच्या निवडणुकीत त्याचा पत्ता ऐनवेळी कट करून स्वत: काका मैदानात उतरले होते. पुतण्याने ही नाराजी जि.प. आणि न.प.निवडणुकीत बंडखोरी करून व्यक्त केली होती. आताही त्याच्यासमोर प्रशचिन्ह निर्माण झाले आहे. माजी खासदार केशरकाकू क्षीरसागरपासून ते चिरंजीव क्षीरसागर बंधूपर्यंत गोपीनाथराव मुंडे, पंकजा मुंडे यांचे राजकीय सख्य साऱ्या जिल्ह्णाला माहीत आहे. निवडणुकीत दोघांकडूनही मदतीची, सहकार्याची देवाण-घेवाण चालू असते. ही तडजोड पवारांच्या दौऱ्यामुळे थांबेला का?, असाही प्रश्न उपस्थित होतो.

पवारांनी आज जिल्ह्णातील आघाडीचे नेते प्रकाशदादा सोळंकेचे बंधू धैर्यशील सोळंके यांच्या घरी रविवारी रात्री जेवण केले, सोमवारी सकाळी माजी मंत्री शिवाजीराव पंडितांच्या घरी नाष्टा केला. विश्रामगृहावर आ.जयदत्त क्षीरसागर, नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर आणि त्यांच्या समर्थक नेतेमंडळीशी स्वतंत्र चर्चा केली. थोडक्यात काय तर सर्वच प्रमुखांशी चर्चा करून त्यांची समजूत काढली. त्याचा चांगला परिणाम सभेतील वक्त्यांच्या भाषणात दिसला. पक्षीय गटबाजीवर कुणीही एका शब्दाने बोलले नाही, हे शरद पवारांच्या दौऱ्याचे फलित म्हणावे लागेल.

Web Title: Bhujbal intervened successful; Kshirsagar Brothers understanding of Pawar's decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.